अनकॉमन 'कॉमन मॅन'
आज जगप्रसिद्ध व्यंग चित्रकार आर के लक्ष्मण यांची जयंती, त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी आर के लक्ष्मण यांच्यामधील कॉमन मॅन कसा होता. याबाबत जागवलेल्या आठवणी...;
ज्याने ज्याने टाइम्स ॲाफ इंडिया किंवा महाराष्ट्र टाइम्स गेल्या अर्ध शतकात पाहिला, त्या वाचकाला एक वेळ त्या पेपरच्या संपादकांचे नाव आठवणार नाही, पण त्याला आरे के लक्ष्मण व त्याचा 'कॉमन मॅन' मात्र नक्की ठाऊक आहे. दररोज घराघरात सकाळीच पोहोचणाऱ्या कॉमन मॅनचा जन्मदाता लक्ष्मण यांचा आज ९६ वा जन्मदिन. २०१५ साली ते आपल्यातून निघून गेले. पण ज्याण्यापूर्वी त्यांनी प्रत्येकाच्या मनाच्या पटलावर आपली स्वाक्षरी मात्र कायमची मागे ठेवली. लक्ष्मण गेले, तेव्हा मनात दाटून आल्या त्यांच्या शेकडो ह्रद्यआठवणी. त्याच आज पुन्हा सादर करत आहे.
ही गोष्ट १९७८ सालची. वयाच्या २४ व्या वर्षी जुनियर रिपोर्टर म्हणून मी टाइम्स समूहाच्या बोरीबंदरच्या इमारतीत पाऊल ठेवले, तेव्हा त्या इमारतीत भारतीय पत्रकारितेतील थोरामोठ्यांची जणू मांदियाळीच लागलेली होती. खुशवंत सिंह 'विकली' चे संपादक होते, त्यांच्याच शेजारी धर्मवीर भारती 'धर्मयुग' संपादित करत होते, दुसऱ्या मजल्यावर गोविंदराव तळवलकर यांच्या हाती 'महाराष्ट्र टाइम्स' होता. महावीर अधिकारी 'नवभारत टाइम्स'चे तर गिरीलाल जैन 'टाइम्स ऑफ इंडिया'चे संपादक होते. त्याच तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या कोपऱ्यात एका छोट्याशा केबिनमध्ये कुंचला आणि ब्रशचा जादुगार आर. के. लक्ष्मणचा संसार थाटलेला होता.
याच केबिनमधून दररोज भारताचा 'कॉमन मॅन' लाखो घरांत जाऊन करोडो वाचकांना हसवत त्यांचे प्रबोधन करत होता. लक्ष्मणच्या या आगळ्या-वेगळ्या अपत्याशी माझी पहिली भेट केव्हा झाली ते आठवत नाही. इतके मात्र, नक्की की जेव्हापासूनचे स्मरण आहे, तेव्हापासून हा अवलिया माझ्या जीवनात आहेच. या अर्धशतकाहून मोठ्या कालखंडात मी लहानाचा मोठा झालो, माझे रंग-रूप बदलले, पेहराव बदलला, पण हा कॉमन मॅन मात्र, तेव्हा होता तस्साच राहिला. त्याचे अर्धे टक्कल, त्यामागे विस्कटलेले केस, डोळ्यावरचा चष्मा, मिशी, चौकडीचा ढगळ कोट सारे काही तसेच राहिले. 'कसं बोललात!' (इंग्रजीत 'यु सेड इट') मधल्या प्रत्येक प्रसंगात हा अवलिया असायचाच. हा सगळीकडे नेमक्या वेळी कसा पोहोचतो, याचे बालवयात नवल वाटायचे. पुढे कळले, तो 'वाचकांचा प्रतिनिधी' म्हणून वावरतो.
आज 'आम आदमी' या संज्ञेची राजकारणात चालती आहे, पण जेव्हा राजकारण्यांना हा 'आम आदमी' ठाऊक नव्हता, तेव्हापासून लक्ष्मणचा कॉमन मॅन वाचकांना नित्य नियमाने भेटत राहिला. खरं तर हा कॉमन मॅन 'अनकॉमन' होता. टाइम्समध्ये असताना या सर्व नावांबद्दल कमालीचा दबदबा होता. टाइम्सचे संपादक आधी श्यामलाल, पुढे गिरीलाल जैन वगैरे प्रथितयश पत्रकार असले, तरी, टाइम्सवरील दोन हत्तींबरोबर वाचकांना ठाऊक होते, ते लक्ष्मणच. एक दिवस धीर करुन मी लक्ष्मण यांच्या केबिनमध्ये शिरलो. दरवाज्याकडे पाठ करून लक्ष्मण कागदावर ब्रशने व्यंगचित्र चितारत होते. मी तिथेच थबकलो. काही क्षणातच लक्ष्मण यांनी मागे वळून पहिले. जाड फ्रेमच्या चष्म्याच्या वरून त्यांची तीक्ष्ण नजर मला न्याहाळत होती, हे मला एका सेकंदातच जाणवले.
मी भीतभीतच घाईघाईने माझी ओळख करून दिली. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले. त्यांनी खुर्ची फिरवली. समोरच्या खुर्चीवर पाय पसरून ते निवांत बसले. मीही बसलो. मग त्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. लहान मुलांची उत्सुकता आणि खटयाळपणा त्यांच्या शब्दांमध्ये व चेहऱ्यावर होता. त्यांना महाराष्ट्राचे राजकारण, वसंतदादा पाटील, शरद पवार, त्यांचे जुने मित्र बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेकांबद्दल माहिती हवी होती. बोलताना ते स्वतःच अनेक किस्सेही सांगत होते.
मोरारजी देसाई, कन्नमवार यांच्याबद्दल त्यांची शेलकी मते होती. ती ते तितक्याच शेलक्या शब्दांत व्यक्तही करत होते. बोलता बोलता वेळ कसा गेला ते समजलेच नाही. मग अचानक ते म्हणाले, 'मला कार्टून द्यायचे आहे. तू आता जा.' मी दरवाज्याच्या बाहेर जायच्या आत ते पुन्हा जगाकडे पाठ फिरवून व्यंगचित्र काढण्यात दंग झाले होते. पुढे वरचेवर त्यांची भेट होत राहिली. लक्ष्मण कमालीचे मितभाषी होते, तसेच माणसाना टाळण्यातही ते पारंगत होते. त्यामुळे त्यांच्या वाटेला फारसे कोणी जात नसे. माझे सुदैव असे, की ते मला अधून-मधून फोन करून बोलावून घेत. महाराष्ट्रात कोणतीही राजकीय घटना घडली की, त्यांचे बोलावणे यायचे. ते विस्तृत माहिती घेत आणि अनेकदा आपल्यापेक्षा त्यांना अधिक माहिती असे. बोलताना ते अनेक किस्से सांगत आणि मिश्कील हसत.
व्यंगचित्र काढण्यासाठी माणसामधले व्यंग ते आधी टिपत. इंदिरा गांधींचे लांब नाक, लाल बहादूर शास्त्रींची ठेंगू मूर्ती, चंद्रशेखर यांची अस्ताव्यस्त दाढी हे सारे ते टिपत व कागदावर उतरवत. 'मी केवळ शारीरिक नव्हे तर स्वभावाचे व्यंगचित्र काढतो', ते म्हणाले. लक्ष्मण यांचा सहा दशकांचा अनुभव तर दांडगाच. पण त्यांची देश आणि देशाबाहेरील उच्च पातळीवरील नेत्यांशी उठबसही खूप. या सर्व भेटी-गाठी आणि त्यांचे सर्व सूक्ष्म निरीक्षण यांचा त्यांना व्यंगचित्रे रेखाटताना उपयोग होतच राहिला.
यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेस पुनर्प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. नंतर बरेच दिवस इंदिराजींनी त्यांना झुलवत ठेवले होते. त्याविषयीचे व्यंगचित्र रेखाटताना लक्ष्मण यांनी यशवंतराव कुंपणाच्या भिंतीवर बसले आहेत आणि त्यांच्या अंगाला कोळीष्टके लागली आहेत, असे दाखवले. एका ओळीशिवायही हे चित्रण सर्व काही सांगून गेले. 'मी खरोखरच एका माणसावर कोळीष्टके चढलेली माझ्या गावात पहिली होती. मी यशवंतरावांचा चेहरा टाकला इतकेच, असे सांगून ते मिश्कील हसले.
पंडित नेहरूंनी एकदा पंतप्रधानकीबरोबरच अर्थ, गृह, परराष्ट्र अशी अनेक खाती स्वतःकडे ठेवली होती. लक्ष्मण यांचे चित्र होते, नेहरू एकाच वेळी तबला, पेटी, सतार, मृदुंग अशी वेगवेगळी वाद्ये वाजवणाऱ्या वादकाचे. असा वादकही त्यांनी एका वाद्यवृन्दात पहिला होता. सुप्रसिद्ध ब्रिटीश व्यंगचित्रकार डेव्हिड लो हा त्यांचा आदर्श. तोच आदर्श बाळासाहेब ठाकरे यांनीही मानला हे विशेष. ठाकरे आणि लक्ष्मण या दोघांनीही आपापल्या कारकिर्दीची सुरुवात 'फ्री प्रेस जर्नल' मधूनच केली. नंतर लक्ष्मण 'टाइम्स'मध्ये आले तर ठाकरेंनी स्वतःचा 'मार्मिक' सुरु केला. पण दोघांची मैत्री अभेद्य राहिली.
दोघांचे स्वभाव भिन्न, विचारप्रणाली एकमेकांना उभा छेद देणारी. तरीही त्यांची मैत्री मात्र टिकली व वृद्धिंगत होत गेली. काही वर्षापूर्वी ठाकरेंनी पुण्यात जाऊन लक्ष्मण यांची भेट घेतली. वयाची ८० ओलांडलेल्या या दोघा कलावंतानी यथेच्छ गप्पा मारल्या. दोघेही त्या आठवणी नंतर बराच काळ जागवत होते. लक्ष्मण दिसायला, वागायला मवाळ असले तरी ते कमालीचे अभिमानी आणि विशेष म्हणजे निर्भय होते. त्यामुळेच, सत्तेवर कुणीही असो, लक्ष्मण यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यातून कोणालाही सोडले नाही. 'तुम्हाला कधी भीती वाटली नाही का?' ... 'कसली भीती? जास्तीत जास्त कोणी काय करेल, तर मला ठार मारेल. सर्वाना एक दिवस मरायचे आहेच. मग मी त्यांना कशाला घाबरू?', त्यांचा प्रती सवाल.
लक्ष्मण यांना कावळ्याचे अनामिक आणि अनाकलनीय प्रेम होते. ते व्यंगचित्र काढत नसत, तेव्हा कागदावर कावळ्यांची चित्रे रेखाटत बसत. 'टाइम्स'मध्ये नंतर त्यांना प्रशस्त केबिन मिळाली, तेव्हा समोर मोठी खिडकी होती. बाहेर अंजुमन इस्लाम शाळेचे प्रांगण. शाळेच्या आवारातील झाडांवर दिवसभर काव काव चालू असे. लक्ष्मण तासन् तास त्याकडे पाहत राहत. 'तुम्हाला कावळ्यांचे इतके का आकर्षण?', एकदा त्यांना जाता जाता विचारले. 'ते नंतर कधीतरी सांगेन,' लक्ष्मण यांनी उत्तर टाळले. ते 'नंतर' कधीच आले नाही.
मी टाइम्स समुहात 'बॉम्बे टाइम्स'चा संपादक असताना माझ्या कुठल्याशा साप्ताहिक स्तंभासाठी माझ्या फोटोऐवजी कॅरिकेचर वापरायचे ठरले. ते काम अर्थातच लक्ष्मण करणार होते. मी माझे अनेक फोटो घेऊनच त्यांच्या केबिनमध्ये गेलो. पाहतो तर मी पोहोचण्यापूर्वीच लक्ष्मणने मला कागदावर उतरवले होते. मी चकीत झालो. लक्ष्मण मंद हसले. 'तू मला इतकी वर्षे भेटतो आहेस. तुझा फोटो कशाला हवा? लक्ष्मणचे निरिक्षण असे होते. लक्ष्मण गेले. त्यांच्या जाण्याने केवळ निष्णात राजकीय व्यंगचित्रकार गेला, इतकेच नव्हे, तर एक सव्यसाची राजकीय विश्लेषकही काळाच्या पडद्याआड गेला. सर्वात महत्वाचे हे की, 'कॉमन मॅन'चे वडील गेले. तो कायमचा अनाथ झाला. दुर्दैवाने तो दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन होता.
- भारतकुमार राऊत