उंबर फळाचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ?
जनावरं आणि माणसं अगदी आनंदाने खाणारे फळ म्हणजे उंबर... या उंबर फळाच्या झाडाचे फायदे काय? जाणून घ्या चिन्ना महाका यांच्याकडून;
उंबर वृक्ष (तोया मर्रा)
उंबराचे झाड खूप मोठे असते. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते. उंबराच्या झाडाला फुलं कधी येतात हे कधीच दिसत नाहीत, असा आदिम समाजात समज आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. फळे गोल चिकूच्या आकाराची असते. उंबराची फळं माणसांसोबत जनावरेही आनंदाने खात असतात. या फळाच्या आत अळी सारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पुर्ण खातांना काहीही वाटत नाही. फळाचे मधून दोन तुकडे केल्यास एक तुकडा दुस-या तुकड्यासोबत घासून खाल्ले तर चव अधिक चांगली येते. उंबराच्या झाडावर पक्षी, किटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते.
उंबर हे त्यांचे खाद्य देखील असते. माकडे या झाडावर बसून निवांत उंबराची फळे खात असतात. गुरे-ढोरे-बकरे उंबराच्या झाडाखाली बसून पिकलेले फळे खाण्यासाठी ते पडण्याची वाट पाहत असतात. औषधी म्हणून या झाडाचा खुप मोठा उपयोग आदिम समाजात होतो. जिथे उंबराचे झाड असते तिथे पाण्याचा स्रोत हमखास असतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.
या झाडाची पाने सिताफळाच्या पानासारखे असून हे झाड दाट सावली देते. उंबराच्या दूधाचा वनऔषधी म्हणून वापर करण्यात येतो. आदीम परिसरात बकरीला व्यवस्थीत दूध आले नसल्यास या झाडाचे दूध काही औषधांसोबत दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते. या व्यतिरिक्त धार्मिक कार्यात, मरण कार्यात या झाडाच्या पानांनी दूध शिंपडून अखेरचा निरोप देण्याचे कार्य केले जाते.
माणसाच्या जबड्याखाली किंवा मानेच्या ठिकाणी गळे-गळाशा आल्यास उंबराच्या झाडाचे दूध पांढ-या कागदावर लेप लावून त्या ठिकाणी लावतात. उंबराचे वृक्ष हे अत्यंत गुणकारी असून या झाडाचे आदिम समुदायात महत्त्वाचे स्थान आहे.
- चिन्ना महाका, हेमलकसा