"ट्विटर विरुद्ध पॉस्को उल्लंघनासंबंधी FIR आणि बालक सुरक्षा !"
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणपद्धतीने मुलांचं शिक्षण सुरु असताना मुलं फोन addicted तर झालेली नाहीत ना? आपली मुलं फोनवर अभ्यासाव्यतिरिक्त ऑनलाइन काय काय पाहतात? पालक म्हणून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवतात का? मुलांच्या या ऑनलाइन अभ्यासाचा मुलांच्या जडणघडणीवर होणाऱ्या परिणामांचा डॉ. युसूफ बेन्नूर यांनी घेतलेला आढावा...;
गेल्या आठवाड्यात (३० मे २०२१) राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने, बाल लैंगिक शोषणाचे काही ग्रुप लिंक्स आणि फोटो शेयर केल्यासंदर्भात ट्वीटरवर दिल्ली येथे एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणावर बोलत असताना राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांग कांगू यांनी बाल लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा (पॉस्को) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत ट्वीटरवर गुन्हा नोंदवल्याचे म्हटले आहे.
आज मुंबई येथे एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनी गँगरेप केल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली आहे. ह्या घटनेतील पीडित मुलगी आणि मुलांची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेली होती.
पीडित मुलीला 'इन्स्टा'वरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्यावर मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार (गँगरेप)केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीने माहिती दिल्यानंतर पोलिासांनी पोक्सो कायद्यातंर्गत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्यावर्षीसुध्दा लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत 'बॉइज लॉकर रूम' ची घटना उघडकीस आली होती. यातही पोलिसात गुन्हा नोंदवला गेला. बॉइज लॉकर रूम ही घटनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून घडल्याचे समोर आले होते.
कोविडमुळे शाळा ऑनलाइन सुरू झाल्या. कोविडपूर्वीची देशातील किंवा संपूर्ण जगातील बालकांची सुरक्षा म्हणून काळजी घेत असताना, बालकांची सुरक्षा म्हणून त्यांना मोबाईल-इंटरनेटचा वापर करण्यासंदर्भात मर्यादा घातल्या जात होत्या. मुलांनी हट्ट केला तरी मोबाईल किंवा कम्प्युटर त्यांच्या हातात दिले जात नव्हते.
कोविडमुळे सगळीच परिस्थिती पार बदलून गेली आहे. देशातील एक असा वर्ग आहे जो ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेला आहे. या वर्गातील मुलांसाठी पुन्हा शिक्षण सुरू होईल की नाही याबद्दल अनेक प्रश्न आहेत.
दूसरा वर्ग असा आहे जो आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून वेळ प्रसंगी कर्ज काढून मुलांसाठी मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटची सोय उपलब्ध करून देत आहे. यामुळे मुलांचे शिक्षण सुरू आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू म्हणत असतांना ऑनलाइन शिक्षणाचे अनेक प्रयोग होत आहे.
काही शिक्षक खेड्या पाड्यात जाऊन मुलांना शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. काही शिक्षकांनी या तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे.
कोविडने मानवाच्या जीवनाचे चक्र बदलून टाकले आहे. याचा परिणाम मुलांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल किंवा कम्प्युटर हे साधन आता चोवीस तास इंटरनेट सुविधेसोबत उपलब्ध आहेत.
शिक्षकांनी मुलांचे व्हॉटसअप ग्रुप तयार केले आहेत. तसेच मुलांनीही त्यांचे ग्रुप तयार केले आहेत. यातूनच गेल्यावर्षीचा बॉइज लॉकर रूम हा ग्रुप तयार झाला होता. यावर्षी शेजारी राहणार्या काही मुलांच्या गप्पा ऐकत होतो. ही मूल दहावीमध्ये शिकणारी होती. या मुलांनी त्यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला होता. त्याच्या ग्रुपचे नाव त्यांनी (D-SSC) म्हणजे Distraction from SSC असे ठेवले होते.
मुलांना या बद्दल विचारलं तर मुलांनी दिलेल्या उत्तरामुळे समाजकार्य शिक्षक म्हणून, माझ्यासाठी अनेक प्रश्न निर्माण केले. मुलांचे म्हणणे होते की, लॉकडाऊन आहे. ऑनलाइन शाळा आहे. रोज सकाळी स्क्रीनवर डोळे लावून पाहत बसल्याचा वैताग आला आहे. मित्राशी बोलता येत नाही. यातून आईवडील सारखं दहावीच वर्ष म्हणून सतत अभ्यासाला बसवतात. मित्राशी फोनवर बोललो तर कितीवेळ बोलतोस म्हणून रागावतात. म्हणून आम्ही व्हॉटग्रुपवर गप्पा मारतो, एकमेकांना फोटो शेअर करतो.
मुलांच्या गप्पा इथपर्यंत ठीक होतं, पण कशा प्रकारचे फोटो शेअर करतात यावर मुलांनी बोलणं टाळलं होतं. एकजण आम्ही ऑनलाइन अभ्यास करतो. त्यांचे फोटो शेअर करतो असे म्हणाला. हे फोटो कोठून घेतात? हे फोटो पहाण्यासाठी कोणत्या वेबसाइटस सर्च करत असतील. ही खरी धोक्याची सूचना होती.
लहान मुलांच्या बाबतीत सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली चोवीस तास मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे मुलांचा सोशल मीडियावरचा वावर वाढत आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात १५१ एफआयआर हे चाइल्ड पोर्नोग्राफीचे नोंद झाली आहे. यातील ४८ व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. दरवेळी अशा घटना घडल्यावर पीडित व्यक्ति तक्रार करेलच असे होत नाही. तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे.
तंत्रज्ञानाचा वापर आपण स्मार्टपणे करायला शिकले पाहिजे. ऑफलाइन विश्वात आपण जशी आपल्या मुलांची काळजी घेतो. त्यांच्या शाळेची, क्लासेसची, मित्र-मैत्रिणीची, रिक्षा, बस चालकाची माहिती ठेवतो अशाप्रकारे ऑनलाइन विश्वात मुलांचे सोशल मीडियावरील मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-अनोळखी मित्र-मैत्रिणी, मुलांचा "स्क्रीन टाइम", मुलांची ऑनलाइन अक्टिविटी यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
सोशल मीडिया, विविध वेबसाइटस वापरताना यातील सेफ्टी टिप्सचा उपयोग करायला शिकवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर काय शेअर करावे आणि काय करू नये. यातील संभाव्य धोके समजून घेणे गरजेचे आहे. पालकांचे नियंत्रण (पेरेंटल कंट्रोल) अंतर्गत मेनू मधून "प्रायव्हसी अँड सेफ्टी" अंतर्गत' प्रोटेक्ट युअर ट्विट" केल्यानंतर तुमच्या बालकांचे ट्विट पाहता येते, पण याबाबत कितपत बालक ह्या नियमावली संबंधी जागरूक आहेत?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऑनलाइन/ व्हर्चुअल विश्वापेक्षा खरे विश्व अधिक चांगले आणि सुंदर आहे, हे या पिढीलात्यांच्या पद्धतीने पटवून द्यावे लागणार आहे.
-डॉ युसूफ बेन्नूर
( लेखक - समाजकार्य विद्यानिष्ठ व्यक्ती आणि समाजकार्यकर्ते आहेत )