स्त्रियांवरील अत्याचारामागे जातीय मानसिकता

स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामागे जातीय मानसिकता दडलेली असते. स्त्रिया या शोषितांमधील शोषित घटक असून दलित स्त्रियांचे प्रश्न इतर स्त्रियांपेक्षा वेगळे आहेत. मॅक्स महाराष्ट्र आयोजित जाती तोडा, माणूस जोडा या कार्यक्रमात शाहीर शितल साठे यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी नक्की वाचा…

Update: 2023-06-28 06:47 GMT

जाती अंताच्या क्रांतीचं

कर्ज क्रांतीचं डोईजड झालं

कसं अजून फिटतं नाही व...

एका शाहिराला अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे. जो मुक्ता साळवेला पण अस्वस्थ करत होता आणि आज मलाही अस्वस्थ

करतोय. तो प्रश्न असा आहे.

पिढ्या पिढ्यानी घालून घाला

पिढ्या पिढ्यांनी घालून घाला वं..

कोड जातीचं सुटत नाही व..

कर्ज क्रांतीचं डोईजड झालं.

हे जे जातीचं कर्ज आहे हे फेडण्याचा प्रयत्न ज्या जे जे लोक प्रबुद्ध झाले, ज्या ज्या लोकांना गुलामी कळली, त्या सर्वांनी वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर जाती तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे असं पूर्णपणे निराशेत जाण्याचं पण काही कारण नाही की जाती व्यवस्था जशी होती तशीच आहे. म्हणजे जाती व्यवस्था पण विकसित झालेली आहे आणि जाती अंताचे धडे पण विकसित झालेले आहेत.

ज्यांनी ज्यांनी जाती तोडण्याचा प्रयत्न केला जाती अंताचा लढा विकसित केला. त्यांनी काही प्रयोग आपल्या आपल्या वैयक्तिक पातळीवर केलेले आहेत.

मंगळसूत्र तोडण्याचं आंदोलन केलं.फुल्यांनी स्त्रियांच्या सतीच्या चालीवर आसूड ओढले. केशवपणाच्या विरोधात काम केले. त्याकाळी स्त्रियांना विधवा ठरउन घरामध्ये अ अत्याचार केले जात होते.त्यांच्या मुलांना म्हणजे ब्राम्हण स्त्रियांच्या मुलांना सांभाळण्यासाठीचं वसतिगृह दीडशे वर्षांपूर्वी फुल्यांनी निर्माण केले होते. जाती व्यवस्थेवर घाव घालणारे छोटे छोटे प्रयोग सर्व महामानवांनी आपापल्या आयुष्यामध्ये केलेले आहेत.

मला असं वाटतं की जाती व्यवस्थेचा प्रश्न हा खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त महिला मुक्तीशी जोडलेला आहे. हा प्रश्न महिलांच्या स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर जाती या केवळ समूह आहेत असे डॉक्टर भारत पाटणकरांनी सांगितलं. त्याची उतरंड आहे हे खरेच आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते बाबासाहेब सांगतात बाबासाहेब म्हणतात की “ स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणून जातीची जी उतरंड आहे ती भक्कम केलेली आहे .तिचे जे गट आहेत ते शोषणावर आधारित आहेत. उचनीचतेवर आधारित आहेत. ते घट्ट केलेत म्हणून दलित स्त्रियांना न्यूनगंड असतो की आम्ही दलित आहोत. आम्ही असं दिसतो आमचं नाकंच मोठं आहे आम्ही काळ्याचं आहोत आमच्याकडं कपडेच चांगले नाही. हा न्यूनगंड दिलेलादलेला न्यूनगंड आहे.

उच्च समजल्या जाणाऱ्या स्त्रियांकडे कॉटनचे कपडे असतात. त्या छान दिसतात. त्या गोऱ्या असतात. त्यांच्याकडं त्यांच्या संसाराचा त्यांच्या जातीचा वारसा असतो. यासोबतच त्यांच्यामध्ये जातीचा एक अहंकार आत्मविश्वास असतो. आपल्याला जे आजूबाजूला दिसतं त्या सगळ्यामध्ये जातीची लक्षणं, जातीची झलक आपल्याला दिसत असते. म्हणून महिलांच्या मुक्तीशी जोडलेला अविभाज्य प्रश्न म्हणजे जाती अंताचा प्रश्न.

तो तेवढाच म्हणजे महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण कोणी जर जाती अंताची चळवळ करत असेल आणि केवळ इतर जातींशी संवाद करत असेल आणि जातीतल्या महिलांशी काहीच संवाद करत नसेल आणि जातीतल्या महिलांच्या मुक्तीसाठी काहीही उपक्रम राबवत नसेल तर तो तितक्या प्रखरतेनं जाती अंताकडे जाऊ शकत नाही. म्हणून मी उदाहरण दिलं की हा एक लढा आहे मंगळसूत्र जाहीररीत्या तोडून फेकण्याचा लढा आहे. असे प्रयोग आत्ता होतायेत का? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि असे प्रयोग आता देखील होत असतील तर ते शोधले पाहिजेत. त्याचा अभ्यास करून संकलन केले पाहिजे. मग असा उपक्रम राबवण्यासाठी हा एक महत्वाचा भाग ठरू शकतो.

महिला आंदोलन करत असताना एक वेगळा सूर दलित महिलांकडून नेहमी लावला जातो. तो तितकाच महत्वाचा देखील आहे. की समग्र स्त्रियांचे प्रश्न हे एकसारखे नाहीत. हे दलित महिला नेहमी सांगत असतात. म्हणजे दलित जातीतनं जन्माला आलेल्या महिला सांगतात की आमचं शोषण तिहेरी पातळीवरचं आहे. म्हणजे कसं? तर आम्ही एकतर महिला आहोत, हेच मुळात आमचं चुकलेलं आहे की आम्ही महिला म्हणून जन्माला आलो. दुसरी चूक आहे की आम्ही दलित महिला आहोत. तिसरी चूक आहे की दलित महिला असल्यामुळं आमच्याकडे उत्पादनाची साधनं नाहीत. शिक्षण नसल्यामुळे, पारंपरिक वारसा नसल्यामुळं, घराण्याचा वारसा नसल्यामुळं आमच्याकडे साधनं नाहीत. त्यामुळं आम्ही साधनांनी गरीब आहोत. भौतिक साधनांनी गरीब आहोत.जातीच्या उतरंडीत आम्ही खालचे आहोत. वर्गाच्या उतरंडीत देखील खालीच आहोत. लैंगिकतेनुसार तर सगळ्यात खालच्या स्तरावर आहोत.

ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्रिया तर त्यामध्ये स्त्रिया ह्यांना बघण्याचा दृष्टिकोन एकदमच खालचा आहे. त्यांना जनावरांच्याही पेक्षा ज्यांना हिण मानलं गेलं. याच कुठल्यातरी वर्गात दलित स्त्रिया या मोडल्या जातात. यामुळे दलित स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांचे लढे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची बाजू जाती अंताच्या लढ्यामध्ये फार महत्वाची आहे.

जाती अंताचा लढा लढताना जाती अंताचा लढा हा अविभाज्यपणे पुरुष सत्तेच्या विरोधातलाच लढा आहे. म्हणजे हा ब्राह्मणी पुरुष सत्तेच्या विरोधातला लढा आहे. एखाद्या जाती अंताच्या लढ्यामध्ये जर पुरुषी अहंकाराच्या विरोधातला, पुरुष सत्तेच्या विरोधातला सूर नसेल तर तो तितका प्रभावी ठरणार नाही. अॅ ट्रोसिटीच्या घटना फार लांबची गोष्ट आहे पण भांडणाची सुरूवात तर तुझ्या आईच अमुक... तुझ्या आईचा तमुक... या शिव्यातून होते. घरातलं भावाभावांमधलं आई वडिलांमधलं जे भांडण सुरू होतं तिथूनच तुझ्या आईच्या जनेंद्रियांचाच उद्धार सुरू होतो आणि तुझ्या आईच्या जननेंद्रियांमध्ये अमुक घालीन तमुक घालीन हे करीन ते करीन ही जी शाब्दिक हिंसा आहे ही इतिहासाला आव्हान देणारी स्त्री सत्तेला आव्हान देणारी हिंसा आहे.

स्त्रियांच्याबद्दलची जी घृणा आहे, स्त्री सत्तेची, स्त्री अधिकारांबद्दलची, स्त्रियांच्या लैंगिक संबंधांबद्दलची ही घृणा तुम्हाला दिसून येते. जातीबाबत गावात जे हिंसक स्वरूप आहे ते तुम्ही खैरलांजीत बघितलं आहे. काट्या घातल्या जातात. हे भय सांगताना पण अंगावर काटा येतोय की कुकरमध्ये घातलं जातंय. ही हिंसा फक्त मुस्लिम पुरुषांकडूनच होत आहे असा वाद निर्माण केला जातो. यामध्ये मुस्लिम पुरुषच बघा कशा क्रूर पद्धतीनं मारतायेत. पण तुम्ही सर्वे करा तुम्ही तुमच्या घरात आजीला घेऊन बसा अन आजीला विचारा की गावात अशा किती हिंसा महिलांच्याबद्दल झालेल्या आहेत. त्या सांगतील की माझ्या घरात माझ्या आज्यानं माझ्या आजीला कसं कसं मार सुरूवात केली. घरात कसं कसं मारलं. त्यानंतर गावातल्या घटना विचारा विविध जातीतल्या विविध धर्मातल्या लोकांनी स्त्रियांचा किती धिक्कार केलेला आहे. स्त्रियांचावर अत्याचार करताना हिंसेचा किती अमानवी वापर हा झालेला आहे याची एक नाही अनेक उदाहरणं सापडतील. समाज माध्यमांमुळे , प्रसार माध्यमांमुळे तुम्हाला या बातम्या समजतात. परंतु अशा घटना म्हणजे हिमनागाचं टोक आहे जी हिंसा आपण जी बघतो आहो समाजामध्ये प्रचंड मोठी महिलांच्या बद्दलची हिंसा ही दबलेली आहे.

आता ही हिंसा केवळ सरळ सुरीनं कापूनच होते का? तर मला असे वाटत नाही. सुरीनं कापून होणारी हिंसा हे एक स्वरूप आहे. म्हणजे त्याच्यात मानसिक विकृतीचाही भाग शोधला पाहिजे. केवळ जाती आणि पुरुष सत्ता एवढाच त्याचा जर आपण सामाजिक अर्थ शोधत बसलो तर मला असं वाटतं की आपण कमी पडू. म्हणजे सानेसारखी माणसं जर मांस शिजवत असतील तर त्याच्या जातीच्या त्याच्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्याच्या मानसिकतेचा पण विचार केला पाहिजे की का त्याला असं वाटतंय? का इतक्या घृणास्पद पद्धतीनं मारावंस वाटतंय? याचा पण एक समाजशास्त्रीय , मानसशास्त्रीय अभ्यास व्हायला पाहिजे.

तर ही महिलांबद्दलची जी हिंसा ठोसून ठोसून समाजामध्ये भरलेली आहे. ती तुम्हाला जातीय दंग्यांमध्ये किंवा जाती अत्याचारांमध्ये गावामध्ये जर एखाद्या आणि मराठ्याचं भांडण झालं तर ते पारध्याच्या घरावर हल्ला करुन येतात. ते असं म्हणत नाहीत की माझं पारध्याच्या मुलाशी भांडण झालंय. ते घरात घुसतात. ते पारध्याच्या मुलाच्या बापाला मारतात, भावाला मारतात, आजूबाजूच्या अख्ख्या वस्तीला मारतात. वस्तीतला नुसतं वस्तीतल्या पुरुषांना मारत नाहीत. बायकांना मारतात, नुसतं बायकांना मारत नाहीत तर म्हाताऱ्यांना मारतात.

लहान मुलांना पण मारतात. तुमचं गावात भांडण झालं तरी त्याचे उट्टे ते तुम्ही घरात बायकांना मारून बायकांवर अत्याचार करून येऊन ते संपवणार आहे.

उदाहरण तुम्ही घ्या जर जर गाव अख्खा चालून गेलाय तर त्यात महिलांचा काहीच भूमिका नसेल का ? असं आपण कसं म्हणू शकतो की महिलांची काहीच भूमिका नाही. गावात एवढ्या ज्या महिला होत्या या महिलांची एक मूक संमती, मानसिक गुलामगिरी ही त्या घटनेला मिळालेली आहे. हा सगळा असा गुंता आहे. हे सामाजिक शास्त्र आहे. अंबानीनं फाईव्ह जी नेटवर्क काढलं आणि देशभरामध्ये अंबानीनं फाईव्ह जी नेटवर्क आलं. इतकं सोपं हे नाही. हे मानसिक गोष्टींनी जोडलेलं असल्यामुळं याला समजून घेणं पण तितकंच कठीण आहे. आणि त्याच्यावर कृती कार्यक्रम काढणं पण तितकंच कठीण आहे. ज्याला जेवढं समजलं त्यानं तसा कृती कार्यक्रम काढला आणि समाज पुढं गेला.असं मला एका सोप्या पद्धतीनं सांगावंसं वाटतं.

दुसरं मला असं वाटतं की जातीय अत्याचार हे फक्त जाती अत्याचारच नाही आहेत. ज्याला आपण ऑनर किलिंगच्या घटना म्हणतो. ते प्रेमविवाहातून खून केले जातात. ही केवळ प्रतिष्ठेची हिंसा आहे का? त्याला जाती हिंसेचा संबंध आहे का ? मला असं वाटतं की आम्ही असं मांडत असतो की ऑनर किलिंग ही एक जातीय हिंसाच आहे. आणि त्याच्यामध्ये ती केवळ जातीय हिंसा नाही तर ती धार्मिक हिंसा पण आहे. म्हणजे जातीतील धर्माचे अधिष्ठान आहे. मग धार्मिक दंगलींमध्येच फक्त हिंदू, मुस्लिम, हिंदू, ख्रिस्चन असा असेल तरच त्याला आपण धार्मिक दंगली, धार्मिक, अत्याचार असे आपण म्हणतो जातीय हिंसा ही पण एक धार्मिक हिंसाच आहे. आता मातंग समाजावर जे अत्याचार होत आहेत. फेसबुकवर लिहिलं जातं की बघा बघा तुम्ही ज्या धर्माला मानता त्याच धर्मातले लोक तुमच्यावर अत्याचार करतात. आता एकोणिसाव्या शतकात लिहिलेलं मुक्ता साळवेचा निबंध जर अजून नीट आम्हाला समजला नसेल.आता याच्यामध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. मुक्ता साळवेचा निबंधच नीट पोहोचलेला नाही अजून तर आपण कोण आहोत? म्हणजे आपण आत्ता जे सांगतोय ते तर एकोणिसाव्या शतकात तिनं सांगून ठेवलेलं आहे. की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. ह्याचा अर्थ म्हणजे जाती अत्याचार जेव्हा होत आहेत तेव्हा याचा पुनर्विचार त्या त्या समाजातल्या जातीच्या लोकांनी केला पाहिजे. गावामधले जे अत्याचार होत आहेत. त्याचं मूळ जातीमध्ये, धर्मामध्ये आहे. आणि हे तेवढंच सत्य आहे, म्हणजे ह्या टीका जरी विखारी वाटत असल्या त्या टीकांमध्ये एक सत्यतेचा अंश आहे. याचा विचार मातंग समाजानं करायला पाहिजे असं मला वाटत.

दुसरं असं की आम्ही कलाकार आहोत, आम्ही गाणी म्हणतो, आम्ही काही विचारवंत किंवा आम्ही कुठला लढा उभा केलेला नाही जाती अंताचा पण सगळेजण म्हणतायत म्हणजे वकील पण म्हणतायत की कायद्यानं काय होणार नाही. नुसता कायदा करून काय उपयोग नाही. इतके वर्ष चळवळीत म्हणजे काम केलेले कार्यकर्ते म्हणतायेत की केवळ वरून लादून होणार नाही. आणि आपल्या लोकांना काही संविधानाचंही महत्व अजून कळालेलं कळालेलं नाही.

जे काही हक्क अधिकार मिळालेत त्याचंही महत्व कळालेलं नाही. कारण जेव्हा गरजेतनं एखादी गोष्ट येते तेव्हा त्याचं महत्व कळतं. आता ही काय गरज भारतीय समाजाची की तुम्ही आम्हाला एवढी समता द्या, सामाजिक समता द्या. हे एक दृष्ट्या लोकांनी बाबासाहेबांनी वरून दिलेला कार्यक्रम आहे. आणि जेव्हा तो वरून दिला गेलाय, त्याचं मूल्य कळालेलं नाही समाजाला अजून. त्याचं महत्व कळालेलं नाही. आणि म्हणून नुसता कायदा करून काय होणार नाही हे जे म्हणणं आहे.

हे अगदी बरोबर आहे. केवळ कायद्यानं सामाजिक बदल होणार नाही. कारण लोक मानसिक गुलाम आहेत. म्हणजे बाबासाहेब दुसरंही हे सांगतात की जातिवंत हां जोडलेला घटक आहे. मानसिक बदलाशी जोडलेला घटक त्याचे भौतिक आधार समाजामध्ये आहेत निश्चित आहेत. जमीन आहे, शेती आहे, उद्योगधंदे आहेत, व्यावहारिक संबंध आहेत. जातीचे भौतिक आधार समाजामध्ये निश्चित आहे त्याच्यावर खूप मांडणी झाली आहे. परंतु हे सगळं असताना भौतिक आधारांना धक्के बसत असताना जी लढाई आहे ती दोन पातळीवर करायला पाहिजे आणि महिलांनी म्हणजे महिला मुक्तीचा लढा महिलांचा वेगळा नाही. तो जाती अंताशीच शेवटपर्यंत जोडलेला तो लढा आहे. आणि म्हणून मला हे सांगावसं वाटतं की प्रबोधन होणं गरजेचं आहे. आता प्रबोधन म्हणजे भाषण असं मला वाटत नाही. जे प्रबोधन म्हणजे गीत गाणं असंही मला वाटत नाही. प्रबोधन म्हणजे एखादा सांस्कृतिक जलसा ऐकला आणि लोकं मस्तपैकी बदलली. असं काही होत नाही.ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आणि मुळात जे प्रबोधन करताहेत.त्यांना काय प्रबोधन करायचं आहे? ह्याची जाणीव आहे का? म्हणजे जे उभे राहिलेत समोर तर त्यांना लोकांशी काय बोलायचं आहे? ह्याचं भान त्यांना आहे का? ह्याची खोली त्यांना आहे का? जेवढी खोली करणारे लोकं प्रबोधन करायला उभे राहतील. तेवढं चाक जरा जास्त पुढं जाईल असं मला वाटतंय. आणि ते जर नसेल तर मग अवघड आहे तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकतो. म्हणून केवळ गीत केवळ सांस्कृतिक कार्यक्रम केवळ नाटक, केवळ सिनेमा हे प्रबोधन मला वाटत नाही. लोक दिवसभरामध्ये दहा स्क्रीन प्ले , दहा वेब सिरीज बघतात.आणि ते बघून शेवटी वाट्सप बघून झोपून जातात.

त्यांच्या मनावर त्याचा किती परिणाम होतो ह्याचा एक वेगळा अभ्यास व्हायला पाहिजे मला हे हे ठामपणे सांगावसं वाटतं की तुमच्या कृतीतून केलेलं प्रबोधन तुमच्या जगण्यातून केलेलं प्रबोधन त्याची जर जोड प्रबोधनाला असली आणि तुम्ही जर त्याचं सातत्य टिकवून ठेवलं तर त्या प्रबोधनाला निश्चितपणे अर्थ प्राप्त होतो. तुम्ही तुमच्या एका छोट्याशा गावात काम करत असता तुम्ही वाडीत काम करत असता तुम्ही घरात काम करत असता तुम्ही समाजात तुमच्या कामाची स्पष्टता तुम्हाला आहे का? आणि तुम्ही जे करताय त्याच्याबद्दलची बांधिलकी तुम्हाला आहे का? आणि त्याचं सातत्य तुम्ही ठेवताय का? हे जर असेल तर मला वाटतं की बदल हा निश्चितपणे घडणार आहे.

ज्या महिला गुलामी नाकारून समाजापर्यंत येत आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या क्षेत्राबद्दल बोलतेय मी. ज्या ज्या महिलांना गुलामी कळली आणि त्या कुतोडून येत आहेत. त्यांना अत्याचारांशी संघर्ष करावा लागतोय. किंवा त्यांना अ भेदभावाशी संघर्ष करावा लागतोय. आता ज्या महिलांना गुलामीचं सण वाटतो. ज्या महिलांना गुलामीचं संस्कृती वाटते महिलांना गुलामीचं आभूषण वाटतं. ज्या महिलांना गुलामीचाच उत्सव करावासा वाटतो. तर त्यांचा जास्त अवघड आहे. तर त्यांच्यापर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. आणि ते नुसतं तुम्हाला वरून सांगून होणार नाही.

त्यांच्या आतला आतला आत्मभान जागृत करणार्या चळवळी ह्या कृतीशी जोडून असल्या पाहिजेत. या केवळ प्रबोधनाशी जोडून याचं नातं नसणार आहे. असं मला वाटतं. नाहीतर आता ह्या काळात आपण महाकादेवीपासनं प्रेरणा घेतली नसती. ह्या काळात आपण काही लिहिलेलं नाही सावित्रीबाईंनी काय पुस्तकं लिहिलेलं नाही सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंनी एक काव्य संग्रह लिहिलाय तो स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी लिहिला असेल असं मला वाटते आणि ते काही इंग्रजी भाषेचं महत्व सांगणार सांगण्यासाठी फुल्यांचं त्यांचं नातं सांगण्यासाठी त्यांच्या अभिव्यक्तीसाठी, प्रबोधनासाठी लिहिलेलं नाही, प्रबोधनासाठी काम केलेलं आहे.तर मला असं वाटतं की प्रबोधनाच्या चळवळी ज्या जोपर्यंत कृतीशी जोडल्या जात नाहीत. त्या केवळ थियेटर स्टेज माईक इथपर्यंतच जर मर्यादित राहिल्या तर ही प्रबोधनाची चळवळ ही कृतीशून्य ठरू शकते. प्रबोधनाच्या चळवळी या कृतीशी जोडल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. भयंकर प्रश्न आहेत, प्रश्न तीव्र होत आहेत, महिलांच्या बाबतीतल्या हिंसेचं तर टोक गाठलेलं आहे. या काळात काम करण्याची सगळ्यात चांगली परिस्थिती आहे आता.

आजूबाजूचे वातावरण तुम्ही बघताय. त्याच्यामध्ये तुम्ही कार्यालयापासून , घरापासून कुठेही तुम्ही सुरक्षित नाही. नात्यात सुरक्षित नाहीतर कसलं आलंय कार्यालय अन कुठलं आलंय घर अन रोड. नातं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यात आपण सुरक्षित नाही.

तर मग बाकीचं काय आपण घेऊन बसलोय तर अशा घाणेरड्या अमानवीय अतिशय हिंसक माहोलमध्ये आज आपण सगळे जगात आहोत.

आपल्याला स्मार्ट सिटी पाहिजेत,आपल्याला मेट्रो पाहिजेत आपल्याला सगळ्या अत्याधुनिक सुविधा पाहिजेत म्हणजे हे सगळं अत्याधुनिक पाहिजे बसायला कमोड पाहिजे एकदम आधुनिक हे सगळं पाहिजे फक्त मानवीय मानवीयतेच्या पातळीवर आपण अत्याधुनिक व्हायला तयार नाही. माणुसकी आपली वाढायला तयार नाही. माणुसकीच्या पातळीवर आपले पतन व्हायला लागलेलं आहे. आणि सुविधांच्या पातळीवर आपला विकास व्हायला लागलेला आहे. तो हा जो एक गुंता आपण जगतोय. ह्याचंपण भयंकर कोडं आपल्या समोर आलंय.

संविधान जगायचं, संविधानाचे फायदे घ्यायचे.कायद्यासाठी संविधान आहे, सुरक्षेसाठी संविधान आहे. आणि जेव्हा रूढी परंपरांच्या बाबतीत म्हणजे ज्या जुलमी रूढी परंपरा आहे, त्याच्या बाबतीत जेव्हा बोलायचे विषय तेव्हा नाही बाबा हे धर्माच्यावर आम्ही नाही बोलत, जातीवर आम्ही नाही बोलत.

या अवघड परिस्थितीमध्ये पण जे लोक टिकून काम करतायेत. त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांच्यातली त्यांच्यातला संवाद वाढला पाहिजे आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की दोस्ती जिंदाबाद दोस्तीपासून सुरूवात करूया मैत्रीपासून सुरूवात करूया संवादापासून सुरूवात करूया आणि जेवढं शक्य आहे जसं शक्य आहे तसं आपापल्या पद्धतीनं काम करूया कुणीही महामानव होण्यासाठी जन्माला आलेलं नसतं संत सांगून जातात बुडता हे जग न देखवे डोळा म्हणुनी कळवळा. हा जो कळवळा जो आहे तो आतूनच असला पाहिजे. मला असं वाटतं की तो जपूया संकटाच्या काळामध्ये जाती अत्याचार होत आहेत जे जाती अत्याचार करणारे आहेत किंवा ज्या घरातल्या मुलांकडून किंवा व्यक्तींकडून जाती अत्याचार होत आहेत त्यांच्याशी पण संवाद करण्याच्या प्रक्रिया विकसित झाल्या पाहिजेत.

जा एक शेवटचा मुद्दा सांगते फक्त जाती अत्याचार झाल्यावर सगळे लोक दलित वस्तीत जातात. तिथे गेलंच पाहिजे. पण मला फार कमी उदाहरणं अशी आहेत की जिथून अत्याचार झालाय. त्या वस्तीमध्ये जाऊन आपण संवाद का करत नाही. म्हणजे बुद्धाला लोक सांगत होते की अंगुलीमाल जिकडे आहे तिकडं खून ठरलेला आहे. तिथे जाऊ नको तिकडं लई समस्या आहे. . बुद्ध म्हणला बाबा त्यालाच गरज आहे सांगायची. त्यामुळे मी चाललोय.जाणार, माझा खून झाला तरी चालेल.

पण आता ज्या जातींशी संवाद करण्याची गरज आहे ज्या घटकांशी ज्या हिंसक लोकांशी संवाद करण्याची गरज आहे कोणीही असो व्यक्ती जाती समाज ह्या लोकांशी पण एक संवादाची प्रक्रिया वाढली पाहिजे असं मला वाटतं. आता हे फक्त वाटून उपयोग नाही त्यासाठी कृती करणं आवश्यक आहे. याची जाणीव मला आहे परंतु त्या दिशेनं जायला पाहिजे असं मला वाटतं. समस्त जातीय अत्याचारांच्या घटनांमध्ये जे लढतायेत त्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम जे पीडित आहेत तर त्यांना आत्मभान देण्यासाठी आपण मदत करण्यासाठी त्यांना त्यांच्या दुःख वाटून घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जे जाती अत्याचार करतायेत त्यांनाही मॅकस महाराष्ट्रच्या माध्यमातून जर ते हा व्हिडीओ बघत असतील तर कृपया हिंसेपासून आपण दूर राहा. संवादानं प्रश्न सुटू शकतात तुम्ही बोला तुम्हाला असं वाटत असेल की बोललं पाहिजे. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते विचारले पाहिजेत तर हा संवाद आपल्यासाठी खुला आहे.तेंव्हा तर नक्की संवाद करा.

Tags:    

Similar News