बुद्ध- मनाचा पहिला डॉक्टर
कुणी पटकन उठून बुद्ध होत नाही पण वासना आणि वैराग्य यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन प्रत्येक गोष्ट ती जशी आहे तशीच पाहू शकण्याची आशा आपण नेहमीच बाळगू शकतो, याविषयीचा डॉ. सुरज मिलिंद एंगडे यांचा लेख बुध्द पौर्णिमेनिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.;
" उदास, काळोख्या ढगातून मार्ग काढत भोवतालचे थंडगार वारे भेदत माझे विमान स्कॉटलंडच्या ग्रामीण भागातील रसरशीत वनराईने वेढलेल्या ॲबर्डीन शहराकडे निघाले होते."
"ध्यानसमाधीत बुडून जाण्याची दीर्घ काळापासून उराशी बाळगलेली आस पूर्ण करायची वेळ जवळ आलेली होती. आणि म्हणून सारे कामधाम सोडून स्वतःला जगापासून तोडून घेत मी या अनोळखी प्रदेशात आलो होतो."
" आपला मोबाईलसुद्धा बंद करुन सगळ्या सुधारलेल्या जगाला विसरून जाणे मला खूप आवडते. अशी शांतता मला अतिशय लोभस वाटते आणि तिची ओढ मला लागलेली असते. आता इतक्या वर्षांनी शेवटी मला हे जमले होते."
ध्यानसत्रात ध्यान करत बसलेलो असताना असलेच काही विचार मी मनोमन करत होतो. परंतु वर्तमानाचे भान येताच हे विचार नाहीसे होत. मनातल्या मनात हा लेख मी कितीतरी वेळा लिहिलाय. त्या प्रत्येक वेळी अशा प्रकारच्या कृतीतले - भविष्यकाळातील गोष्टींचे असे वारंवार पूर्वचिंतन करण्यातले वैय्यर्थ माझ्या ध्यानी येत असे. ॲबर्डीन परिसरातील एका मठात मी व्यतीत केलेल्या त्या दहा आनंददायी दिवसांत मला मिळालेला हा सर्वात महत्त्वाचा धडा होता.
आपण एका अत्यंत निराशावादी विश्वात जगत आहोत. जग जसे आहे तसे ते आपण जगत नाही. जीवनाच्या हव्यानकोश्या साऱ्या सुंदर सुंदर वैशिष्ट्यांना सर्वार्थाने न कवटाळता आपण नुसते जगत राहतो. आणखी हवे, आणखी हवेच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात राहतो. आपण चोहो बाजूंनी असे हतबल झालेलो दिसत असताना अभिलाषा, स्वार्थ आणि अज्ञान यातूनच संघर्षांचा पाया घातला जातो या बुद्धाने साक्षात्कारानंतर नोंदवलेल्या निरीक्षणाची आपल्याला प्रचिती येत आहे. धम्म आणि विविध सुत्तांच्या वारंवार केलेल्या पठणामुळे नकारात्मकतेच्या कर्दमात रुतलेल्या मानवतेच्या दारुण अवस्थेचे स्वरूप आपल्याला कळते. मनाला भिववणाऱ्या मरणप्राय मानवी वेदनांबाबत बुद्धाने किती आस्थापूर्वक चिंतन केले होते हे पाली भाषेतील प्रार्थना आणि स्तोत्रे यांच्या श्रवणातून आपल्या निदर्शनास येते.
ते दहा दिवस मी दोघा बुद्ध भिक्खूंची सावली बनून राहिलो. त्यांच्या पवित्र, काटेकोर आणि संवादी जीवनक्रमाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत राहिलो. मूळचे नेपाळी असलेले पूज्य सुजानो आणि श्रीलंकन असलेले पूज्य तथीधामो यांनी मला आपले मानले. केवळ भिक्खूच घालू शकतात तशी आपल्या करुणेची आणि प्रेमाची पाखर त्यांनी माझ्यावर घातली. या पूजनीय भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःशी संवादी होण्याची ही एक महान संधी होती. दिवसातून दोन वेळा केल्या जाणाऱ्या प्रार्थना आणि ध्यान हे या अनुभवातील उत्कर्षबिंदू होते. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी येत.
भिक्खू माध्यान्हानंतर अन्नभक्षण करत नाहीत. ते कधीही आपले अन्न शिजवत नाहीत. दान म्हणून मिळालेले अन्नच तेव्हढे ते सेवन करतात. अर्थात आपल्या अन्नासाठी ते आपल्या अनुयायांवर अवलंबून असत.
खुद्द बुद्धाच्या सूचनांनुसारच ही आचारप्रणाली आखली गेली आहे. भिक्खू होणे म्हणजे नेत्र, कर्ण, जिव्हा, नासिका, मन आणि देह या षडेंद्रियावर सातत्याने ताबा राखणे. आणि असाच ताबा राखण्याचा उपदेश ते इतरांनाही करत असतात.
ध्यानधारणेचे अनेकविध स्तर आहेत. सतिपत्थनसुत्तात बुद्धाने सांगितलेल्या विपश्यना या साक्षी ध्यानचिंतनाचा हेतू केवळ वर्तमानात जगणे आणि त्याचे हरघडी भान राखणे हा आहे. आपले मन सतत भूतकाळातून काही न काही खोदून काढण्याच्या प्रयत्नात तरी असते किंवा मग भविष्यकाळाच्या भ्रमात रमते. यामुळे आपले स्वतःचे आणि आपण प्रत्यक्ष जगत असलेल्या क्षणाचे भान हरपते. निखळ वर्तमानात जगणे हाच जीवनाच्या असुंतलनातून मुक्त होऊन आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र होय. पण वर्तमानात जगणे म्हणजे कसे जगणे? वर्तमानात जगणे म्हणजे या विशिष्ट क्षणी जे घडत आहे त्याचेच पूर्ण भान बाळगत जगणे. आपले मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात भरकटू लागले की दरवेळी त्याला वर्तमानात खेचून आणले पाहिजे आणि या क्षणाचे भान त्याला करुन दिले पाहिजे. ही सवय जोपासून अंगवळणी पाडून घ्यावी लागते. ध्यान, परोपकार आणि कुठल्याही बाबींविषयी 'जाऊ द्या हो' अशी मनाला लावून न घेण्याची वृत्ती यांच्या आधारे ही सवय जोपासता येते. अनिच्च ( अनित्य ) म्हणजे परिवर्तन आणि कोणतीही गोष्ट शाश्वत नसणे ही अपरिहार्य बाब असणे हेच जीवनाचे मूलभूत सत्य आहे. एकदा का हे आपल्या लक्षात आले आणि आत्मचिंतनाद्वारा आपण त्याचा अनुभव घेतला की मग हुरहूर, चिंता, ताणतणाव यांचा सोस उरत नाही. जे अखेरीस बदलणारच आहे त्याला परिपूर्ण करण्याचा आपण उगाच खटाटोप करत असतो. मग व्यर्थ काळजी करत राहण्यात किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे अशा वेड्या अट्टाहासाला काय अर्थ आहे? असा प्रयत्न मुळातच अर्थहीन आहे हे ध्यानात घेणे त्यापेक्षा कितीतरी बरे.
आपण आत्मप्रीती आणि आत्मदक्षता हे शब्द नेहमी ऐकतो. पण वस्तुतः त्याचा अर्थ काय आहे? ती केवळ एखादी अमूर्त कल्पना आहे की खरोखरच आपले मन त्या परिपक्वतेच्या दिशेने आपण विकसित करु शकतो? आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आपला वेळ खर्च करणे हा यासाठी एक अत्यंत परिणामकारक उपाय आहे. यामुळे 'पन्ना' ( प्रज्ञा) या अवस्थेत प्रवेश करणे आपल्याला सुकर जाते. या प्रज्ञावस्थेत आपण भ्रमविरहित स्वच्छ विचार करु शकतो. अनेक मानसिक उपक्रमांची एक मोठी मालिकाच या ठिकाणी असते. हे सारे उपक्रम अंगवळणी पडायला हवेत.
या दहा दिवसात ज्या ज्या बुद्धधर्मीयांना मी भेटलो त्यांत केवळ कर्मकांडांपलिकडचे काही पाहूच शकत नाहीत असे कोणीच नव्हते. ते सारे ध्यानाचे अनुशासन पाळत होते. त्या सर्वांमध्ये मेत्त भावना ( मैत्री भावना, मैत्र) विकसित झालेली होती. मेत्त भावना म्हणजे स्वतःपासून सुरुवात करून सर्वांसाठी प्रार्थना करण्याची आणि स्वतःसह सर्वांप्रती गुणग्राहक आणि स्नेहशील राहण्याची प्रवृत्ती. याचे सारे श्रेय संघाच्या बलशाली प्रेरणेला जाते. अतीव निष्ठेने आणि श्रद्धेने ते याचा पाठपुरावा करत असतात. भारताच्या शेजारच्या राष्ट्रांत यासंदर्भात किती मोठे कार्य केले गेले आहे याची मला या मठाच्या भेटीत निश्चित आणि नेमकी जाणीव झाली. परदेशी लोक पाली या भारतीय भाषेत मंत्रपठण करताना पाहणे मोठ्या समाधानाचे होते. या लोकांनी पालीला आपलीच भाषा मानले होते. भारतीय बुद्धधर्मियांनी काही गोष्टी शिकल्या आणि आपल्याशा केल्या पाहिजेत. जिथे जिथे बौद्ध समाज आहेत त्या विविध देशांमधल्या परस्परमैत्रीचा आणि सहभावाचा बुद्ध हा खंबीर आधार आहे. विसंगती किंवा मतभेद आणि दुसऱ्याचा बरेवाईटपणा आपण ठरवणे याला थारा न देता सामाजिकता आणि अध्यात्म यांनी एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे.
आज खास करुन कोविडने दुःख आणि वेदना यांच्या समान मळभाखाली असंख्य लोकांना एकत्र आणले आहे. मानसिक ताण आणि चिंता यांनी सर्वांना वेढून टाकले आहे. मानसिक ( मेंटल) हा शब्द भारतात फारच टीकेचा धनी बनलाय. मानसिक म्हणजे मनाचे, मनाविषयी. दुसरे तिसरे काही नाही. बुद्ध हाच मनाचा पहिला डॉक्टर होता.
म्हणून बौद्ध आणि बौद्धेतर या दोघांनीही मनाला अग्रक्रम दिला पाहिजे. त्याच्यावरच अधिक काम केले पाहिजे आणि त्याचीच अधिक काळजी घेतली पाहिजे. कुणी पटकन उठून बुद्ध होत नाही पण वासना आणि वैराग्य यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन प्रत्येक गोष्ट ती जशी आहे तशीच पाहू शकण्याची आशा आपण नेहमीच बाळगू शकतो. बरंय तर मग. ध्यानाला जाण्याची वेळ झालीय. भिक्खूने नुकतीच त्याची इशाऱ्याची घंटा वाजवलीय.
(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, 'कास्ट मॅटर्स' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. 'जी क्यु' या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे. लेखकाच्या सहमतीने हे लेख मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत)
लेखक : सूरज येंगडे : suraj.yengde@gmail.com
भाषांतर : अनंत घोटगाळकर
मूळ प्रकाशन: इंडियन एक्सप्रेस 27 जून, 2021