संयुक्त महाराष्ट्राला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता?

भाषावार प्रांतरचना ही देशाच्या एकात्मतेला तडा ठरली का? देशाची भाषावार प्रांतरचना संविधानाच्या उल्लंघनाची पहिली पायरी ठरली का? भारतासारख्या अवाढव्य देशाची नवी दिल्ली ही एकमेव राजधानी असणं योग्य आहे का? 'एक राज्य एक भाषा' की 'एक भाषा एक राज्य' ? राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय वाटत होतं यासाठी त्यांच्या 'भाषावार प्रांतरचनेवर विचार' या पुस्तकाचा आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी घेतलेला आढावा!;

Update: 2021-11-27 08:04 GMT

सगळ्यांना संविधान दिनाच्या खरंतर खुप साऱ्या शुभेच्छा! आज सर्वजण संविधान दिवस साजरा करत असतील. 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी बाबासाहेबांनी हे संविधान सभेमध्ये सादर केलं. आजच या पुस्तकाचा फोटो का पोस्ट करतोय हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर हे पुस्तक गेले काही दिवस मी वाचतोय. जसा वेळ मिळेल तसा वाचत होतो आणि ते वाचत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या.

खरंतर भाषावार प्रांतरचना हा माझ्या अगदी जवळचा विषय आहे. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर वाचत होतो, ऐकत होतो; तेव्हापासून भाषावर प्रांतरचना आणि मग गुजरात-महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आहे तो कायम लक्षात राहिला आणि त्यावर मी सतत विचार करत होतो. परंतू या सगळ्या गोष्टींमध्ये एक मात्र मनात कायम होतं की ज्यांनी राज्यघटना लिहिली ते संयुक्त महाराष्ट्र होण्याअगोदर चार वर्षे आधीच निवर्तले. त्यांचे काय विचार असतील? कारण संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे तो काही दोन आणि तीन वर्षापूर्वी पासूनचा नव्हता तर तो 1960 च्याअगोदर जवळपास 15 ते 20 वर्षांपासून सुरू होता. लढा हळूहळू स्वरूप बदलत होता आणि स्वातंत्र्यानंतर त्याची मागणी आहे ती फारच वाढू लागली. प्रत्यक्षरित्या नसले तरी अप्रत्यक्षरीत्या या प्रक्रियेचा भाग स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील होते. भारतीय राजकारणामध्ये त्यावेळेस सक्रीय होते. मग भाषावार प्रांतरचनेवर त्यांचे काय विचार असतील हा गेल्या तीन-चार वर्षापासून माझ्या मनात सतत कुढत राहणार प्रश्न होता.

मग काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनामध्ये हे पुस्तक माझ्या नजरेस पडलं आणि मी ते विकत घेतलं, वाचून काढलं आणि बाबासाहेबांचे भाषावर प्रांतरचने वरचे विचार वाचून विचारांची दिशा थोडीफार बदलली. खरं तर आतापर्यंत मी भाषावार प्रांतरचनेचं समर्थन करत होतो. बाबासाहेबांचे पुस्तक वाचल्यानंतर मी भाषावर प्रांतरचनेचं समर्थन करत नाही. का ते सांगेन पुढे… हा लेख थोडा फार मोठा असेल पण ते मांडणं हे फार महत्त्वाचा आहे.



 

1955 असली बाबासाहेबांच्या या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती निघाली होती आणि त्यावेळेस जर पाहायला गेलं तर ना महाराष्ट्र अस्तित्वात होता ना गुजरात अस्तित्वात होतं. त्यावेळेस अस्तित्वात होतं ते भलंमोठं मुंबई द्विभाषिक राज्य! आता यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसत असेल की हैदराबाद येथील एका सभेतील बाबासाहेबांचे वाक्य आहे किंवा त्यांचे विचार आहेत ते आपल्याला वाचायला मिळत आहेत. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, "भारतातील सर्व भाषिक प्रांतात दुर्दैवी प्रांत जर कोणता असेल तर तो महाराष्ट्र होय. महाराष्ट्र इतरांकडून संपूर्णपणे नागवला गेला. सर्वांनी महाराष्ट्र यांचे यथेच्छ दमन केले. महाराष्ट्रावर गुजराती-मारवाडी यांचे अबाधित वर्चस्व आहे. आता हे वाचल्यानंतर अर्थात कुठल्याही मराठी माणसाच्या मनात रक्त सळसळलं नाही तर नवल! हेच माझंही झालं होतं पण जेव्हा पुस्तक मी वाचलं त्यावेळी थोडीफार विचारांची दिशा जरूर बदलली. हे पुस्तक वाचण्याचा मी आपल्याला नक्कीच सल्ला देईन. हे पुस्तक वाचणे अगोदर नक्कीच या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे जी स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ती जरूर वाचा.




 


थोडक्यात अगदी थोडक्यात या पुस्तकामध्ये काय आहे ते मी सांगतो. खरंतर बाबासाहेबांना भाषावार प्रांतरचना जी केली गेली तीच पटली नाही. त्यांचा असं स्पष्ट मत होतं की या प्रांत रचनेमुळे देशाच्या एकात्मतेला धोका आहे. राज्य पुनर्रचना आयोगाचा हा मूर्खपणा आहे. याचं कारण की त्या वेळेस राज्य पुनर्रचना आयोगाने उत्तरेतलय एका भल्या मोठ्या हिंदी भाषिकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण केलं आणि दक्षिणेकडील राज्यांचं विभक्तीकरण केलं. "उत्तर भारताचे प्राबल्य दक्षिण भारत मान्य करेल काय? असा प्रश्न या पुस्तकामध्ये बाबासाहेब विचारतात आणि या प्रश्नाचे उत्तर शोधताना ते म्हणतात कि उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये कमालीचे अंतर आहे. उत्तर भारत हा प्रतिगामी आहे तर दक्षिण भारत हा पुरोगामी आहे. उत्तर पुराणमतवादी आहे तर दक्षिण बुद्धिप्रामाण्यवादी आहे. दक्षिण शैक्षणिक दृष्ट्या आघाडीवर आहे तर उत्तर पिछाडीवर. संस्कृती दक्षिण भारताची अद्यावत आहे तर उत्तर भारताची प्राचीनतम आहे."

बाबासाहेब म्हणतात, "एक राज्य एक भाषा हा सर्व राष्ट्रांनी अवलंबिलेला जागतिक सिद्धांत आहे." याच्या उदाहरणार्थ जर्मनी फ्रान्स इटली इंग्लंड अमेरिका यासारख्या देशांची उदाहरणे देखील ते आपल्याला देतात. ते म्हणतात "सर्व देशांच्या राज्यघटनेत जर आपण पाहिल्या तर एकच तत्व आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं ते हे की एका राष्ट्राच्या निर्मिती करिता एकच भाषा अवलंबलेली आहे. जिथे एक राज्य एक भाषा हे तत्व अव्हेरले गेले तिथे राष्ट्र धोक्यात आल्याशिवाय राहिलेलं नाही." याच्या उदाहरणार्थ ते ऑस्ट्रेलिया आणि तुर्कस्तान या प्रभावशाली साम्राज्यांच्या पाडावा विषयी बोलतात.

पुस्तक वाचताना मला जाणवलं ती बाबासाहेबांच असं स्पष्ट मत होतं की एका राज्याच्या सीमा जितक्या मोठ्या तितका त्या राज्यातल्या राज्यकारभारावर येणारा दडपण फार मोठं! बाबासाहेबांनी तर या पुस्तकामध्ये अगदी नकाशा सकट जे मोठे प्रांत आहेत त्यांची फोड करून त्यांचे कसे छोटे छोटे प्रांत करता येतील हेच सांगितलंय. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश या भल्यामोठ्या राज्याची त्यांनी तीन विभागात विभागणी केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश! कालांतराने जे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं पण फक्त दोनच भाग उत्तरप्रदेशचे झाले ते म्हणजे उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश! शिवाय ते फक्त उत्तर प्रदेश पर्यंत मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी हीच रचना बिहारची देखील केली, मध्य प्रदेशाची देखील केली आणि त्यानंतर महाराष्ट्राची देखील केली.




 


बिहार आणि मध्यप्रदेश जरा आपण बाजूला ठेऊन महाराष्ट्राचा विचार करूयात. मी या लेखासोबत बाबासाहेबांनी जे महाराष्ट्राचे लहान लहान मुलांना राज्यांमध्ये विभक्तीकरण अपेक्षित केले होते त्या महाराष्ट्राचा नकाशा मी इथे पोस्ट करतोय. या फोटोमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला बाबासाहेबांनी स्पष्ट पणे महाराष्ट्राच्या चार वेगवेगळ्या छोट्या राज्यांमध्ये विभागणी केल्याचं पाहायला मिळेल. एक मुंबई उर्फ महाराष्ट्र नगर राज्य, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र! त्यांनी फक्त या चार प्रांतांची सूचनाच केली नाही तर ठोस अशी कारणं देखील सांगितली. तेव्हाच्या मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळातील विधानसभा सदस्यांच्या संख्येवरून देखील त्यांचे विचार त्यांनी मांडले. इतका सखोल विचार बाबासाहेबांनी या पुस्तकात मांडला आहे.

फक्त भाषावार प्रांतरचनेबद्दलच त्यांनी आपले विचार मांडले नाही तर भारताच्या दुसऱ्या राजधानी बद्दल देखील ते व्यक्त होतात. होय फक्त नवी दिल्लीच नव्हे तर तिच्या व्यतिरिक्त भारताला आणखीन एक राजधानी हवीच शिवाय ती कोणती असावी आणि का असावी हे देखील सकारण स्पष्ट करतात. खरतर हे पुस्तक लिहिले गेले 1954 - 55 साली आणि ते छापले देखील 55 सालीच गेलं. यानंतर 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला. गंमत म्हणजे संयुक्त महाराष्ट्राला बाबासाहेबांचा विरोध होता याचं फक्त एकच कारण होतं ते म्हणजे योग्य राज्यकारभार! जे आपण आजही पाहतोय.




 


दुर्दैवाने 105 हुतात्मे जाहले आणि संयुक्त महाराष्ट्र उदयास आला पण संयुक्त महाराष्ट्राची जर आज आपण अवस्था पाहिली तर ती किती वाईट आहे हे आपल्याला दिसते. आज या संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती किंवा त्याचा औद्योगिक कारभार हा आपल्याला काही निवडक शहरांमध्ये आकसल्याचा दिसून येतो. महाराष्ट्राचे चार भाग किंवा चार राज्यांमध्ये त्याची विभागणी करताना बाबासाहेबांनी जी भीती व्यक्त केली होती तीच आपल्याला आज खरी ठरताना दिसते. मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाड्याचा भाग असेल, पश्चि म महाराष्ट्राचा काही भाग असेल, विदर्भाचा बराचसा भाग असेल जिथे अजूनही एकविसावं शतक उगवलेलच नाही. आजही लोकांना 100 रुपया वर दोन दोन दिवस घालवावे लागतात. लाकडाची मोळी विकूनच पोटाची खळगी भरावी लागते. तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे ही शहरे जणू वेगळा देशच आहेत, एक वेगळे जग आहेत.

असो जास्त खोलात मी काही जात नाही. पण प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावं. काय आहे बाबासाहेबांनी जे विचार मांडले ते ना तत्कालीन राज्य पुनर्रचना आयोगाने लक्षात घेतले ना तत्कालीन सरकारने देखील ते ऐकले. परंतु बाबासाहेबांसारख्या व्यक्तीमत्वाचे विचार आपण जरूर वाचले पाहिजेत. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी त्यांचे विचार अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे असे मला स्वतःला वाटते. बघा हे पुस्तक कुठे मिळत आहे का आणि शक्य असल्यास ते जरूर वाचा.

(टीप : माझ्या मातृभाषेचा, माय मराठीचा विचार हे पुस्तक वाचल्यामुळे मी सोडलेला नाही. परंतु इतर भाषांचा द्वेष करणं काही मला जमणार नाही.)

©शुभम पद्मावती हरेश पाटील

प्रतिनिधी, मॅक्स महाराष्ट्र

Tags:    

Similar News