'कॅाल मी राहुल' इतकी सहजता राजकीय नेत्यांमध्ये असते का..?
मॅक्स वूमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांना राहुल गांधींना भेटण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली. पहिल्या भेटीपेक्षा दुसऱ्या भेटीत आलेला अनुभव हा फार वेगळा होता. दुसऱ्या भेटीत नक्की काय चर्चा झाली? राहुल गांधी यांना नक्की काय जाणून घ्याच होतं? वाचा भाग २ मध्ये...
हॅल्लो, मी प्रियदर्शिनी..
अच्छा तो आप प्रियदर्शिनी हो..
राहुल गांधींनी त्यांची ती परिचित स्मित दिलं आणि आमच्यातील संवाद सुरू झाला. राहुल गांधी यांच्या स्मितामागचं कारण होतं, त्या दिवशी इंदिरा गांधी यांची जयंती होती. आजच्या दिवशीचा हा अलभ्य लाभ होता, असं म्हणत आम्ही दोघे ही हसलो. मला प्रियदर्शिनीच रहायचं आहे, नाव सारखं असलं तरी मी युनिक आहे. यावर त्यांनी दाद दिली. पुढे संवाद वाढवत मी पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. पहिल्या भेटीसाठी मी आठ किलोमीटर धावले होते, आता मला मॅरॉथॉन मध्ये धावण्याचा विश्वास आला होता.
भारत जोडो यात्रा कव्हर करायला जायचा निर्णय नेहमीप्रमाणे अचानकपणे घेण्यात आला. ऑफिसच्या मिटींगमध्ये ठरलं की सगळ्या ब्युरोने भारत जोडो कव्हर करायला जायचंय. एक टीम आधीच रवाना झाली होती. आम्ही वाशिम-हिंगोलीच्या टप्प्यात सामिल झालो. यात्रेत सामील होण्याआधी यात्रा ज्या गावांमधून जाते त्याच्या आसपास च्या गावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी बोलण्याचा ही प्रयत्न केला. भारत जोडो यात्रेचं शेड्युलच असं होतं की पहाटे उठून रात्री पर्यंत काम करायला लागायचं. कामाचं प्लानिंग करायचं काम ही अखंड सुरु होते. यात रात्री कामाचा रिव्ह्यू घेत असतांना अचानक मुद्दा निघाला की, सर्व लोक राहुल गांधीना भेटतायत, आपल्या टीम ला ही बोलवणं आहे, भेटायचं की नाही यावर चर्चा होती तर असं ठरलं की भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. रात्री उशीरा चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच भेट ठरली. भेट होईल की नाही हे पक्कं नव्हतं पण उपस्थित राहण्याचा मेसेज आला.
सकाळी यात्रा सुरु होण्याआधी पंधरा मिनंट ते भेटतील असं सांगण्यात आलं होतं. नेमकं टिम मेंबर मधील काही लोकांना आवरायला उशीर होत होता, तो उशीर लक्षात घेता काही सहकाऱ्यांनी तसच पुढे निघायंच ठरवलं, यात भर की काय मध्ये रस्ताही जरा चुकल्यानं त्यात वेळ गेला. झालं, या सगळ्यात व्हायचं तेच झालं! आम्ही पोहोचलो नि यात्रेला सुरूवात झाली. यात्रेकरुच्या अगदी शेवटच्या टोकाला आम्ही होतो, नी राहुल गांधी अगदी पुढे होते. यात्रा नुकतीच सुरु झालीय तर आपण राहुल गांधी पर्यंत सहज पोहोचू शकतो, असा भाबडा विश्वास मला वाटला. आम्ही हे शेवटचं टोक सोडून पुढे पोहोचण्याचा प्रयत्नात पळायलाच सुरवात केली. मी नी माझे दोन सहकारी सोबत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला प्रचंड गर्दी होती, इतकंच काय रस्त्यावरही चालणं तसं अवघडच होतं.
यातुनही मार्ग काढत आम्ही धावत राहिलो, सहज वाटणारी ती गोष्टी हळूहळू कठिण वाटू लागली. रस्त्यात एकमेकांच्या पायावर पाय देणारी लोकं, घोषणा देत पुढे सरकणारी लोकं, यातून पुढे सरकत अगदी राहुल गांधी पर्यंत कसं पोहोचणार? तिथे पोहोचलो तरीही ठरलेली वेळ निघून गेल्याने काय नी कोण नियोजन करणार ? हा प्रश्न होताच. माझ्या सहकाऱ्यांचा वेग हळूहळू मंदावत चालला होता. त्यामुळे आता काहीही झालं तरी मलाच हे काम करावं लागणार, हे स्पष्ट दिसत होतं. नियोजन काहीही होऊ देत, आता आलोच आहोत तर भेटूनच जाऊयात असं मनाशी ठरवलं होतं. कारण मुळात ज्या प्रश्नावर चर्चा करायची होती त्या प्रश्नांची तीव्रता पोहोचवणं फारच आवश्यक होत.
कोण नियोजन करणार ? काय होणार? असले प्रश्न मनातून काढून टाकले नी मागे वळूनही न बघता मी धावायला सुरवात केली. अरुंद रस्ते दगडं, खड्डे, घसरट झालेललं गवत या सगळ्यांना पायाखाली तुडवत मी यात्रेकरूंना कव्हर करणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यापर्यंत पोहोचले. माझा पळण्याचे वेग बघत इतर यात्रेकरू अधनं-मधनं बाजुला होतं होते. वेगामुळे मी राहुल गांधींच्या समांतर पोहोचू शकले. याला डी झोन म्हणतात. जवळ येताच आतमध्ये कोणी दिसतंय का, हे मी पाहिलं. कारण तिथले पोलिस प्रचंड ताकदीने लोकांना ढकलत होते. त्यातच आकांक्षाने मला पाहिले नी पोलिसांना सांगून मला आत घेतलं. त्यामुळे मी जरा सुटकेचा श्वास घेतला. मात्र तरीही जी परिस्थिती दिसत होती त्यानुसार हे साध्य सहज नाही, याची कल्पनाही आली होती. राहुल यांच्या मागे जवानांचे दुहेरी रांग होती, जी पार करणं जवळ जवळ अशक्य होते. या सर्वात मी धावत होते. लोकांचा प्रचंड रेटा येत होता, त्यातच आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना सुनावलं. लोकांशी असं वागू नका असं त्या सातत्याने सांगतं होत्या.
त्यादिवशी रस्त्यावर काम करण्याची त्यांची ती energy पाहुन सलामच ठोकावा वाटला. खूप वेळ झाला होता, एका मागून एक लोक येत होती, काही भेटत होती तर काही या रेट्यात मागे पडत होती. चालण्याचा वेग मंदावला नव्हताच मात्र हे शक्य कसं करायच हेच डोक्यात सुरु होतं. इतक्यात यशोमती ताईंनी दुहेरी रांगेच्या पार असलेल्या माझ्याकडे वळून पाहिले त्यांनी मला 'प्रिया' म्हणत आवाज दिला. त्यांचा आवाज कानावर येताच माझा वेग वाढला व त्यांना हात देत पुढे झाली. त्यांचा हात हाता येताच मी अलंकार जे राहुल यांच्या अगदी मागे चालत होते त्यांच्या पर्यंत पोहोचली. दुसऱ्याच क्षणी मी राहुल गांधी यांच्या शेजारी उभी होते. हॅल्लो असं म्हणतं राहुल यांनी त्यांचा हाथ माझ्या हातात देत शेकहॅन्ड केला त्याक्षणी केलेली सगळी मेहनत डोक्यातुन पुसून गेली. 'हॅल्लो सर,' या उत्तरावर हलंकच हसतं 'कॅाल मी राहुल' असं ते म्हणाले.
पुढे आमच्यात बराच वेळ संवाद झाला. मी जी काही माहिती देत होते त्या सर्वांनावर त्यांचेही उपप्रश्न तयार होते. अत्यंत शांतपणे त्यांनी सर्व ऐकले, या सर्वात तुम्ही काम करताय याच त्यांनी कौतुक केलं.अल्टरनेट मिडिया म्हणजे समांतर माध्यमांना झेलाव्या लागणाऱ्या समस्यांवर मार्ग काढायला हवा कारण असंख्य युट्यूब चॅनल व अल्टरनेच मिडीयात काम करणाऱ्या लोकांची घरं त्यावर चालतात. सहज डिलीट होणारं पेज यावर अनेक वर्षांची मेहनत असते. प्रश्नांचे गांभीर्य त्यांना कळले असे जाणवतं होते. या दरम्यान बोलतांना माझा हात त्याच्या हाता वर सतत लागत होता. ते टाळण्यासाठी मी जरा दूर होण्याचा प्रयत्न करत होते. माझ्यासाठी हे मुद्दे पोहोचवणं जास्त महत्वाच होतं. या दरम्यान मागे कोणाचा तरी नंबर लागला होताच, मी मागे वळुन बघताच राहुल यांनी मला पुन्हा मुद्द्यांवर आणले. पाच मिनट चालणा-या याचर्चेत कुठलाही पर्सनल संवाद झाला नाही. विषय जरा वेगळा असल्याने त्यांची उत्सुकता नक्की होतीच. आमच्या टिम बद्दलही त्यांनी जाणून घेतलं. माझं बोलणं संपल्यावर निघतांना त्यांनी पुन्हा एकदा शेकहॅन्ड केला.
ही झाली पहिली भेट. हो, मी राहुल गांधी यांना दोनदा भेटले. दुसऱ्या भेटसाठीचं निमंत्रण जयराम रमेश यांनी दिलं होतं. सर्व महिला पत्रकारांना हे निमंत्रण असल्याने सर्वानी जायचं ठरलं तरी गोंधळ झालाच. मग अर्ध्यातून मागे फिरणाऱ्या महिला पत्रकारांना घेऊन कॅाग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा नेट्टा डिसोझा निघाल्या, त्यांचा शब्द टाळणं आम्हा कोणालाही शक्य नव्हतं. या दुसऱ्या भेटीत हॅल्लो मी प्रियदर्शिनी ही माझी ओळख त्यांना एकदम भावली. बाकी भेटीचं कवित्व संपलं जरी असलं तरी राहुल गांधी यांच्या पुढील प्रवासावर आमची बारीक नजर राहणारच आहे. जिथे ते चुकतील तिथे त्यांच्या विरोधात भूमिका घेत राहू. आशा करूया, राहुल गांधी त्यांच्यावरच्या टीकेला असंच खेळकर पणे सामोरे जातील आणि देशात निर्माण झालेली कटुता, द्वेष निवळण्यासाठी प्रयत्न करतील.