मैं नहीं तो कौन बे ?

2014 च्या लोकसभा निवडणूकीतच भाजपने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. देशात विरोधी पक्षांना पार नेस्तनाबूत करायचं. देशात विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही? अशी परिस्थिती निर्माण केली जात असतानाच मैं नहीं तो कौन बे? असं म्हणत एक देश जोडणारी यात्रा सुरु झाली आहे. याबद्दलचा गणेश शिंदे यांचा लेख...;

Update: 2022-11-12 03:30 GMT

भारतीय राजकारणात भाजपने सत्तेत येतानाच काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली. देशात विरोधी पक्षाला पार संपवून टाकायचं आणि विरोधकांना खंबीर बनूच द्यायचं नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यातच आम्हाला विरोधकच नाही, मग तुमच्यासमोर पर्याय कोण आहे? असं वातावरण तयार केलं जात आहे. त्यामुळे जनमानसात आम्हीच तो एकमेव पर्याय आहोत, असा दावा केला जात आहे. यापार्श्वभुमीवर ऐ, मैं नहीं तो कौन बे? हे रॅप साँग गाजत आहे आणि राहुल गांधी यांची भारत जोडोच्या माध्यमातून दमदार एन्ट्री झाली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राहुल गांधी यांच्या बद्दल कुत्सितपणे लिहिणारे, त्यांच्या प्रतिमेबद्दल खोटी माहिती पसरवणारी व हजारो कोटी रुपये खर्चून 'पप्पू' ही इमेज निर्माण करणारी सगळी यंत्रणा आज तोंडावर पडली आहे. कारण नागरिकांना धीरोदात्तपणे लढणारा व खंबीरपणाने बोलणारा देशाच्या राजकारणात लीडर मिळाला आहे. जमीनीवर उतरूनसुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे, हे राहुलने ठरवलं आहे.

राहुल गांधी यांच्या बद्दल बोलताना सांगितले जायचं की, ते राजपुत्र आहेत. त्यांना संघर्ष नको आहे. सोबतच त्यांची विलासी अशी प्रतिमा जनमानसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबळ करण्यात आली होती. मात्र जशी भारत जोडो यात्रेची त्यांनी घोषणा केली, व मी कन्याकुमारी ते काश्मीर चालत जाणार, लोकांशी संवाद साधणार! हे जाहीर केलं. त्यानंतर देशातील एक मोठा वर्गाला यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रेवर मजेदार विनोद करण्यात आले. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, राहुल गांधी यांनी मोठा मैलाचा टप्पा पार पाडला आहे. राहुल गांधी यांनी चालताना लाखो लोकांची मनं स्वतःसोबत जोडली आहेत.

भारतीय राजकारणामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथ यात्रेपेक्षा जास्त प्रभावी यात्रा अशी भारत जोडो यात्रेची इतिहासात नोंद घेतली जाईल. कारण रथयात्रेच्या मागे भावना ही धार्मिक द्वेषाची व लोकांमध्ये कलह निर्माण करणारी होती. मात्र ही भारत जोडो यात्रा लोकांच्या मनात प्रेम निर्माण करणारी व राजकीय व्यवस्थेसमोर सामान्य माणसाला बळ देऊन लढण्यासाठी खंबीर करणारी आहे. जेणेकरून सामान्य माणसाला वाटेल की "आम्ही कोणाला घाबरत नाहीत!' आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत.

सध्या देशामध्ये भाजपा सरकार असल्यामुळे व संघाचे प्राबल्य असल्यामुळे लोकांमध्ये संघाबद्दल भीतीची भावना निर्माण झाली आहे. राजकीय पुढारी सुद्धा थेट संघाला अंगावरती घ्यायला घाबरतात. या काळात राहुल गांधी हे एकमेव नेते आहे, जे थेट संघावर टीका करताना दिसतात. त्यांच्यामधील निडरता, आत्मविश्वास आणि सामान्य माणसाबद्दल असणारी तळमळ या यात्रेच्या माध्यमातून दिसून येत आहे. विरोधी पक्ष संपला अशी भूमिका मांडणाऱ्यांना राहुल गांधींनी भारत जोडोच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे की 'मैं नहीं तो कौन बे?'

- गणेश शिंदे

Tags:    

Similar News