हा भारत आहे, आजोबा!
अहमदनगर येथील शहाशरीफ दर्गा उघडतो, तेव्हा शेकडो हिंदू भाविक रांगेत दिसतात, शिवापूरच्या हजरत कमर अली दरवेश दर्ग्यासाठी तिथल्या देशमुख महिला उपवास ठेवतात... तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी मुस्लिम पायी चालत येतात... धार्मिक स्थळे उघ़डणं म्हणजे हिंदूत्व नाही... वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा लेख....
धार्मिक स्थळे उघडणे हा मुद्दा हिंदुत्वाचा आहे, हे या आजोबांना कोणी सांगितले असेल बरे? खरे तर हा मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा आहे. हा भारत आहे. इथे ज्याक्षणी प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय होईल, त्या क्षणी मंदिरे उघडतील, तद्वत मशिदी आणि दर्गे उघडतील. चर्च, गुरुद्वारा, अग्यारी उघडतील.
आणि हो, आमच्या अहमदनगर येथील शहाशरीफ दर्गा उघडेल, तेव्हा शेकडो हिंदू भाविक रांगेत दिसतील. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या हजरत कमर अली दरवेश दर्ग्यासाठी तिथल्या देशमुख महिला उपवास ठेवतील. औरंगाबाद- बीड रस्त्यावर डोणगावचा नुरुद्दीन दर्गा, विदर्भातला सैलानी बाबा, अंबडचा सकलादी बाबा, आमच्या करमाळ्याजवळचा आवाटी बाबा दर्गा अशी किती उदाहरणे द्यावीत!
सिल्लोड तालुक्यातल्या भराडीत जामा मशिद आणि मारुती मंदिर तुम्हाला एकाच छताखाली दिसतील तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी मुस्लिम पायी चालत निघतील. पंढरीच्या विठूरायाच्या चरणी कसली जात आणि कसला धर्म? साईबाबा तर कबीरासारखाच - आपल्याच धुंदीत … लेना ना देना, मगन रहना! धर्माविषयी जेवढे बोलाल, तेवढे जास्त धर्मनिरपेक्ष होत जाल, आजोबा तुम्ही! हा भारत आहे, आजोबा!