लढाई कोरोनयुगातील अस्तित्वाची : प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवीजीवनावर झालेला परिणाम...यात अडकून न राहता 'जो है वो अपना, और बीत गया वो सपना' असंच मानून वैज्ञानिक दृष्टीने व वैद्यकीय दृष्टीने जे योग्य आहे अशा नियमावलीचे पालन कसं कराव... यासंदर्भात प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांचा हा लेख नक्की वाचा...;

Update: 2021-05-02 13:43 GMT

प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. मागील वर्षाने आणि या नूतन वर्षाने ही आपल्याला बरंच काही शिकवलं. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागलेलं कोंदण म्हणजे माणुसकी. या अनेक गोष्टी आपण या काळामध्ये अनुभवतो आहोत.

सर्व काही सुरळीत सुरु असताना एकाएकी चीन मधील वुहानमधून संसर्गजन्य कोरोना विषाणू जगभरात आपलं संक्रमण पसरवत हाहाकार माजवत राहिला. महासत्ता, विकसित, विकसनशील आणि गरीब देशांना ही या अतिसूक्ष्म विषाणूने गुडघे टेकवण्यास भाग पाडले. लॉकडाऊन, कर्फ्यु, आयसोलेशन, रेमडेसिविर, ऑक्सिजन सिलिंडर, क्वारंटाईन, व्हॅक्सिन हे शब्द तळागाळातील जनतेस सुद्धा मुखोदगत झालेत. मरण किती स्वस्त झालंय हे सुद्धा कोरोनाने दाखवून दिलं. या काळात आपापल्या देशातील सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे जीवावर बेतणारी गोष्ट बोटावर निभावून गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे माझ्या दृष्टीने या कोरोना विषाणूने त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला दाखवल्या आहेत. मी जेव्हा या परिस्थितीचा विचार केला, तेव्हा यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला यापैकी मी काही मांडत आहे.

१)लॉकडाऊन (Lockdown):

या महामारीचा प्रादुर्भाव जास्त उद्भवू नये म्हणून ही शृंखला तोडण्यासाठी राबवलेली(ब्रेक द चेन) उपाय योजना आहे. वर्ष २०२०-२१ हे सगळ्यांच्या लक्षात राहणारे वर्ष ठरलं. एक भयंकर महामारी आणि याची सुरुवात जनजीवन विस्कळीत होण्यातून झाली. अनेक जण स्वर्गवासी झाले, अनेक रुग्णांना नरक यातना भोगाव्या लागल्या, अनेक कुटूंबं उध्वस्त झाली.दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक आणि घरातील कुटुंबांची असणारी अगतिकता आणि रुग्णांच्या जीवाची होणारी तगमग यांसारख्या दाहक आठवणी याच काळात मिळाल्या.

लॉकडाऊन या कालावधीमध्ये'Go Corona' थीम्स ची सेलिब्रेशन्सच झाली असेच मी म्हणेन. कारण, यामागे विविध वृत्तवाहिन्यांनी सांगितलेल्या माहितीचा पडताळा न घेता 'Go Corona' म्हणत रस्त्यावर कोरोनारूपी आंदोलने मोर्चे काढल्याप्रमाणे रस्त्यावर गर्दी जमाव जमले होते. आणि लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ झाला होता.

थाळी वाजवून टाळी वाजवून डॉक्टर्स पोलिसांचा उत्साह वाढवणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जी कृती केली तेव्हा आसपास असणारी बालके वृद्धव्यक्ती, रुग्ण पशु-पक्षी यांच्या बाबत आपण अविचारी झालो होतो का? अशी खंत वाटते. निराश झालेली जनता, थकलेले प्रशासन, संकटात असणारी अर्थव्यवस्था, विचलित झालेली शिक्षणव्यवस्था, सर्वसामान्याचे रोजीरोटीचा प्रश्न, ताणतणाव यातून उचलले चुकीचे पाऊल यांसारख्या एक ना अनेक सामाजिक समस्यांना आपण सामोरे जात आहोत.

लॉकडाऊन म्हणजे पुराचे पाणी रोखून धरण्यासाठी बांधलेले तात्पुरते धरण आहे. जनतेला अगदीच अल्प कालावधी देऊन घाईत लादलेली व वाढवत नेलेली अमर्यादित काळासाठी लागलेली निष्क्रियता व कैद यामुळे आर्थिक क्षमता व जगण्याची उमेद उदासीन झाली आहे. यामुळे लॉकडाऊन अल्प प्रमाणात का होईना गैरसोयीचं वाटलं. याउलट लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी देश-विदेशातून येणाऱ्या विमानांची ये-जा सरकारने बंद केले असती तर हा विषाणू फैलावण्याचा वेग निश्चितच कमी झाला असता.

२)चेतना जागृती (Awaking Consciousness):

खरे तर लॉकडाऊन एक प्रकारचा अध्यात्मिक संदेश देते. संसर्गापासून वाचण्यासाठी स्थितप्रज्ञ राहण्याची शिकवण देते. याबरोबरच धन-दौलत शौहरत म्हणजेच जीवन असं मानणाऱ्यांसाठी हा अनुभवाचा काळ आहे. या गोष्टींच्या पलीकडे कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व या गुणांची किंमत लॉकडाऊन ने माणसाला दाखवून दिली. अर्थात व्यवहार वागणूक हालचालीस लॉक केले आणि अवास्तव अपेक्षा डाऊन झाल्या, हा कोरोना ने शिकवलेला सर्वात महत्त्वाचा धडा आहे.

३. भारतीयांची एकता (Unity of Indians):

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्

वर्षं तद भारतं नाम भारती यत्र संस्कृती|

या रमणीय शब्दात ज्या भारत भू चे वर्णन केले आहे. अश्या भारतीयांची एकता व शिकवण जगास दिसून आली. सर्वात प्रथम शेक-हॅन्ड पेक्षा भारतीयांचा नमस्कार सर्वांना महत्त्वपूर्ण वाटला. खरंच भारतीय म्हणून 'कृण्वन्तो विश्व स्थिरम' या उक्तीचा प्रत्यय आणणारी भारतीयांची प्रत्येक प्रेरक क्रिया मग त्यात डॉक्टर्स, संशोधक, पोलीस, औषध निर्माते, शास्त्रज्ञ, कंपनी मालक, समाजसुधारक, एन. जी. ओ. दानशूर व्यक्ती, विविध गोष्टी कमीत कमी त्रासात उपलब्ध करून देणाऱ्या महान व्यक्ती यांचे योगदान पाहिले की ऊर अभिमानाने भरून येतो.आज जेव्हा जग 'त्राहिमाम्.. त्राहिमाम्' विनवणी करत आहे तेव्हा ही भारत आणि भारतीय जगासाठी उभे राहिलेत. एक मदतनीस म्हणून नव्हे तर आचार्य 'चरक 'सांगतात त्यानुसार भूतानुकम्पया अर्थात लोककल्याणासाठी.

व्यायामात लभते स्वास्थ्यं

दीर्घायुष्यं बलं सुखं ।

आरोग्य परम भाग्यं स्वास्थ्यं

सर्वार्थसाधनम् ।।

हा संदेश भारतीयांनी आपल्या ध्यान, प्राणायाम, योगासने सूर्यनमस्कार इत्यादींच्या माध्यमातून जगास दिला. यानुसार साधी राहणी उच्च विचारसरणी चे तत्व आज विश्व व्यापक बनले.

४. विश्व बंधुत्व (Cosmopolitanism):

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम।

उदारचरितानां तु वसुधैव कुटूम्बकम ।।

या उपनिषदामधील चौथ्या अध्यायातील ७१वा श्लोक आपणास विश्वबंधुत्वाची अनुभूती देतो, यामुळेच स्वच्छ-साधी आणि सकारात्मक जीवन प्रणाली विकसित होऊ शकते. 'वसुधैवम कुटुम्बकम' ही उक्ती आजच्या यंत्र युगातील माणूस भौतिक प्रगती करण्याच्या नादात विसरून जात आहे. स्वतःसाठी जगणाऱ्या मानवाची आत्मकेंद्री जीवनशैली या विषाणूच्या जन्मास कारणीभूत होत आहे. मानव आणि निसर्गाशी सलोखा राखलेला नसल्यामुळे कुठल्याश्या जीवजंतू ने आपले आयुष्य झपाट्याने नक्कीच बदललं आहे. कोरोना महामारीने जीवनाचा अर्थ व उद्दिष्ट्ये याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अर्थातच भारताने प्रस्थापित केलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहून जगभरातूनही भारतास सढळ हस्ते मदत होत आहे. म्हणून जगभरातून भारताला मदत रेमडिसिव्हर बनविन्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालावरील निर्यात बंदी अमेरिकेने उठवली, ब्रिटन कडून व्हेंटिलेटर तर फ्रांस कडून ऑक्सिजनची मदत याचीच ही उदाहरणे आहेत.

५. सामाजिक आरोग्य (Social Health):

पायाला भिंगरी लावून फिरणारा माणूस घरकोंबडा झाला असेलही पण त्यामुळे तो कुटुंबात रमू लागला व त्याच्या मानसिक आरोग्यास पुष्टी मिळाली. लॉकडाऊन असल्यामुळे कार्यालयात जाऊन काम न करता work from home असल्यामुळे बरेच जण गावी स्थायिक झाल्याने मुलांना पण मोबाईल गेम यांमधून उसंत मिळाली व अनेक दंतकथा, श्लोक, भक्तिगीते यांचे आजी-आजोबांकडून ज्ञान व संस्कारांचे खजिने मिळाले.

समाजातील भांडणं थांबली, गुन्हेगारी शमली... पोलीस डॉक्टर, एन. जी.ओ. यांसारखी मंडळी देवदूत भासू लागली. सगळीच नव्हे पण काही मंडळी तरी शाकाहारी झाली. अत्यावश्यक सेवांमध्ये दारू, गुटखा, तंबाखू यांना बंदी आली. यामुळे आपसूकच व्यसनाधीनतेस किंचित आळा घातला गेला. वाहने घरात स्थिरावली, जंगल-वने प्रदूषण मुक्त झाली. पिंजऱ्यात माणूस अडकला, पशू-पक्षी मुक्तपणे अंगणात गच्चीवर वावरू लागला. कारखानदारी उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे गंगा सारख्या अनेक नद्या आपोआप स्वच्छ राहू लागल्या. एकंदरीत निसर्ग मोकळा श्वास घेऊ लागला.

६.घराचे घरपण (Importance of joint Family):

असंख्य गोष्टी माणसाला कोरोनाने शिकवल्या. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराचे घरपण विसरलेला माणूस आपल्या घरी आला. लॉकडाऊनमुळे सर्व जण घरी राहू लागले. कारण ज्यांनी त्याला हलक्यात घेतले त्याने अश्या लोकांचा कसलाच भेदभाव न करता थेट परलोकाचे दर्शन घडवले. परिवाराची आता खरी किंमत कळाली, गावाकडील आई आजीची आजारपणी आठवण आली. विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी 'विश्वचि माझे घर' मानून अवघ्या विश्वाला एक कुटुंब मानले. काळानुसार, सोयीनुसार कुटुंबाच्या आकाराची व्याप्ती कमी होत गेली. एकीकडे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.. आपण म्हणतो आणि संयुक्त कुटुंबाअभावी एखाद्या माणसाशी माणसासम वागणे हेच आपण विसरून जातो.

या कोरोना वर्षामध्ये आपण राग, काळजी, उदासीनता यांसारख्या काही अस्मानी-सुलतानी व्याधींना बळी पडत असतो. पण, या बाबींचे व्यवस्थापन न करता भूत व भविष्यात अडकून अजूनच रेस्टलेस होतो. कोणतीच गोष्ट सोपी-कठीण नसते. त्यामुळे तसं भयंकरीकरण व अतिसुलभीकरण न करता योग्य मोजमाप करून त्या सोडवण्यातच आपला खरा 'इमोशनल इंटेलिजन्स' दिसतो. आणि आपला संयुक्त परिवार हा भक्कम करण्यासाठी विनामूल्य, अविरतपणे हातभार लावत असतो.

आदिमानवास कुटुंब, घर याची काळजी नव्हती, एकच आव्हान होते, स्वतः जिवंत राहणे. रोज स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासाठी होते. खरोखरीच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.. या परिस्थितीशी तोंड देत देत दोन गोष्टी आदिमानव शिकला. संकटाविरोधात आक्रमक होणे किंवा संकटापासून पळपुटेपणा दाखवणे किंवा संकट पाहता गलितगात्र होणे. नक्कीच आता आपल्या पुढे अशी जीवशास्त्रीय आव्हाने नाहीत, पण या आव्हानांनी आता मनोसामाजिक स्वरूप धारण केले.

टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन हे शब्द ज्या व्यक्ती एकाकी एकलकोंडे आयुष्य जगत असतात यांच्या साठी परवलीचे शब्द झाले आहेत. अर्थातच मानव निर्मित या शब्दांना माणूस आता जीवन मरणाचा प्रश्न बनवतोय. या भयंकरीकरणात आपल्याला freeze flight पासून fight करण्यास बळ देतो तो आपला संयुक्त परिवार. आयुष्यातील भव्य-दिव्य आव्हानांचे डोंगराएवढे ओझे पेलण्यासाठी भक्कम खांदे या कुटूंबाकडून मिळतात. जीवन जगणे ही क्रिया नसून सुंदर क्रियापद आहे. आपल्याला आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे व आव्हानांना बळी न पडता आव्हानांवर स्वार होण्याचं बळ हे आपलं संयुक्त कुटुंब आपल्याला देत असतं. आपल्या मन:स्वास्थ्याच्या खजिन्याची किल्ली आपल्या हातात ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबाची लाखमोलाची मदत होते.

मागील काही महिन्यांपूर्वीच्या फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर समजतं की सक्तीने लॉकडाऊन आले आणि सगळंच चित्राप्रमाणे स्तब्ध झालं. विशेषतः मानवी आयुष्याला जाणवलेले एकटेपण व हतबलता. स्वतःची 'स्पेस' जपण्यासाठी अनावश्यक स्वातंत्र्याचा हव्यास करताना, खरंच विभक्त कुटुंबाची गरज नसतानाही निरर्थक अहंभावापायी हा पर्याय आपण निवडलेला असतो. या पर्यायामध्ये फक्त एकटेपणाच आपल्या सोबत असतो. क्रोध, गर्व, संकुचित वृत्ती, स्वार्थीपणा या चार भिंती आणि यामध्ये एखाद्या कैद्यासारखे अडकलेलो आपण... मनात असणाऱ्या असंख्य जुन्या,नवीन सुखद दुःखद हास्यास्पद, विनोदी, धीरगंभीर आठवणींचा कल्लोळ मनात माजलेला असतो. हे वादळ मनात शमतंच असं नाही. ते ही त्रासून जातं. स्वतःला शारीरिक मानासिक रोगी मानून व्यक्ती पंगु होत जाते.

जिंदगी से बडी सजा ही नहीं!

और क्या जुर्म है पता ही नहीं !!

कृष्णबिहारी नूर यांची ही गझल अश्याच लोकांसाठी बनलेली असावी असं वाटतं. गुलजार या महान कलाकाराने केवळ तीन मिनिटांच्या गाण्यातच सांगितलं,

हमको मन की शक्ती देना, मन विजय करे।

दुसरों की जय से पहले अपनी जय करे ||

आपण इतरांवर विजय मिळवण्याआधी स्वतःवर जय मिळवण्यात, नियंत्रण मिळवण्यात आपल्याला आपल्या कुटुंबाची मदत होत असते. अर्थात आनंद, कौतुक, धैर्य, दुःख यांसारख्या अनेक गोष्टी एकमेकांशी वाटून घेण्याचं भाग्य कोरोना संकटात आपल्या कुटुंबामुळे आपल्याला मिळतं. आनंद असो दुःख असो गावाकडची माती आणि कुटुंबातील नाती नेहमीच प्रत्येकास गावकडेच खुणावत असतात, हे आज सिद्ध झालेल आहे.

८. अर्थव्यवस्था (Economic Condition):

जागतिक कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे जागतिक बेरोजगारीत कमालीची वाढ झाली आहे. लॉकडाऊन म्हणजे काय? व्यवहारिकदृष्ट्या, लॉकडाऊन म्हणजे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असणे. ह्याचाच अर्थ वस्तू व सेवांचे उत्पादन आणि पुरवठा संपूर्णपणे ठप्प नसला तरी विस्कळीत होणे. विद्यमान मागणीच्या तुलनेत वस्तू आणि सेवा पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात नाहीत. त्याच वेळी, आर्थिक युनिट्स बंद झाल्यामुळे लोक आपली नोकरी व मजुरी गमावतात. याखेरीज लॉकडाऊनमुळे वस्तू खरेदी मंदावल्याने एकूण मागणीवरही विपरित परिणाम होतो. अलीकडच्या काळातील जागतिक अर्थव्यवस्थेमधील मंदीसदृश्य परिस्थिती ही एकतर खालावलेली मागणी अथवा अचानक घडून आलेले पुरवठ्यातील बदल किंवा आर्थिक संकट यामुळे उद्भवलेली आहे.

भारतातही बँकींग क्षेत्र, करोनाचा प्रादुर्भाव होण्याअगोदरच मोठ्या प्रमाणातील अनुत्पादित कर्ज आणि नवीन कर्जांसाठीची घटलेली मागणी ह्या दुहेरी संकटामुळे आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. सोशल डिस्टंसिंगमुळे वस्तू उत्पादनात आणि सेवांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. याचा फटका हॉटेल, रेस्टॉरंट यांसारख्या उद्योगांबरोबर असंघटित घटकास बसला आहे. याच बरोबर कोरोना काळामध्ये कृषी क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. रोजगार, उद्योगधंदे, लघु उद्योग, गृह उद्योग, कारखानदारी, कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र, इत्यादी क्षेत्रातील कामे खोळंबली असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ झाली आहे. चलनाच्या अवमूल्यनामुळे विकसनशील देशांमध्ये चिंतेची लहर बसलेली आहे आहे. एकंदरितच जगभरातून घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील व जगातील अनेक उद्योगधंद्यांवर प्रतिकूल परिणाम झालेला असून प्रतिकूल आपल्या देशाच्या व जगाच्या जीडीपी ने निच्चांक दर्शवला आहे.

९.निसर्गाप्रति आदर व सलोखा (Respect and Hormony with Nature):

स्वतःसाठी जगणाऱ्या मानवाची आत्मकेंद्री जीवनशैली या विषाणूच्या जन्मास कारणीभूत होत आहे. मानव आणि निसर्गाशी सलोखा राखलेला नसल्यामुळे कुठल्याश्या जीवजंतू ने आपले आयुष्य झपाट्याने नक्कीच बदललं आहे. कोरोना महामारीने जीवनाचा अर्थ व उद्दिष्ट्ये याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. क्षणभंगुर आयुष्य असताना देखील आपल्या पृथ्वीमातेचा नायनाट करण्यास निघालेल्या मानवातील विकृतपणा दिसून येतो व त्याचा परिणाम म्हणून निसर्गाने दिलेला धोक्याचा 'रेड सिग्नल' म्हणजे प्लेग, कोरोना सारख्या महामारी. कोरोनादरम्यान भारतात आपण 'अम्फान' व 'निसर्ग' या दोन वादळांचे तडाखे अनुभवले. एकीकडे किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहत होते, तर रेताड प्रदेशात टोळधाडीचे संकट.. हवामान बदलाचा एवढा रुद्रावतार दाखवतच २०२० -२१ वर्षे संपुन गेली आहेत.

निसर्गाला माणसाने खिजगणतीत न धरल्यामुळे कोरोना सर्वांना पुरून उरला आहे. आजकाल सोशल मीडियावर चित्रविचित्र चॅलेंजेस घेतली जातात व दिली जातात. यापेक्षा 'थ्रिलर व डेंजरस चॅलेंज'च्या मानाचे स्थान कोरोनाने आजतागायत कायम ठेवले आहे. निसर्गसंवर्धनासाठी पुस्तके, माहितीपट बनवणं, आंदोलन करणं हे वेळोवेळी होत गेलं. परंतु ,प्रत्येकास निसर्ग आपला विषय वाटत नाही तोपर्यंत यावर ठोस कृती ही होणारच नाही. निसर्गाला आपलं मानून निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने काही ठोस कृती कार्यक्रम आखले पाहिजेत. सोशल मीडियावर सध्या चॅलेंजचा ट्रेण्ड आहे. यामध्ये स्वतः'वन ट्री चॅलेंज' का स्वीकारू नये? शुद्ध हवा, स्वच्छ पाणी यांसारख्या गोष्टीचा प्रमुख स्रोत झाडेच आहेत.

'उद्यानं गृहस्य शोभा वर्धति'

हे ध्यानात घेऊन वन ट्री चॅलेंज हे एक नवनिर्मितीचा आनंद देणारे उदाहरण इथं मी देतो आहे. निसर्गाने एवढा मोठा धडा शिकवूनही मनाचं क्रौर्य संपत नाही. गोव्यातील बेकायदेशीर खाणकाम,केरळ मधील गर्भवती हत्तीणीची शिकार यांसारखी पाशवी वृत्ती आजही माणसात जिवंत आहे. निसर्गापुढे माणूस काहीच नाही असे आयझॅक किहिमकर याने सांगितलं. Nature is God असं आईन्स्टाईन म्हणत. त्यांची कळकळ माणसापर्यंत पोहोचायला हवी. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास-

ज्यांची हृदये झाडांची असतात, त्यांनाच फुले येतात, तेच वाढतात, प्रकाश पितात, ऋतु झेलून घेतात. एकंदरित कोरोना काळात पर्यावरण संवर्धनासाठी अशी झाडांची हृदये असणाऱ्या माणसांची तसेच संयुक्त कुटुंबाची महानता जाणवणाऱ्या विशाल मनाच्या सकारात्मक दृष्टिकोणाची फार फार फार गरज आहे.

'निसर्ग की मानव' या वाक्याला काहीही अर्थ नाही. कारण राहिले तर दोघेही राहणार अथवा कोणीही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आत्ता आपण घरात आहोत, विचार-चिंतन करण्यासाठी आपल्याकडे चिक्कार वेळ आहे. मनात भूतकाळातील खंत बाळगण्यापेक्षा 'लढेल तोच जगेल' हाच उत्क्रांतीवादी सिद्धांत लक्षात ठेवून न डगमगता परत शून्यातून निर्मिती करण्यासाठी, साम्राज्य उभारणीसाठी आपल्याला सुसज्ज व्हायचं आहे.

या महामारीचे जे बळी पडले, त्यांचा हात जरी सुटला असेल तरी त्यांना वचन देऊन जे सोबत आहेत त्यांचा हात मात्र घट्ट पकडून, 'जो है वो अपना, और बीत गया वो सपना' असंच मानून वैज्ञानिक दृष्टीने व वैद्यकीय दृष्टीने जे योग्य आहे अशा नियमावली बनवून त्यांचे पालन आपण करूया. यामध्ये वारंवार हस्तप्रक्षालन कार्यक्रम असो वा सोशल डिस्टंसिंग असो, मास्कचे महत्त्व,वैयक्तिक स्वच्छता, स्वेच्छेने स्वीकारलेले घराबाहेरील निर्बंध याबरोबरच मानसिक सुदृढता, लसीकरण करणे व इतरांना करण्यासाठी प्रेरित करणे, योग्य आहार इत्यादी सर्वोपयोगी तत्वांचा अवलंब करून पुढील काळ सुवर्णमयी बनवूया...

Tags:    

Similar News