किरण माने प्रकरण, 'स्टार प्रवाह' ला हेमंत देसाई यांचे परखड सवाल

मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय भूमिका मांडल्याने काढल्याचा माने यांचा दावा खोटा आहे, असे स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी स्टार प्रवाह वाहिनीली काही मुलभूत सवाल परखडपणे विचारले आहेत.;

Update: 2022-01-17 06:10 GMT

अभिनेते किरण माने यांना महिलांशी गैरवर्तन केल्याच्या कारणावरुन मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय भूमिका मांडल्याने काढल्याचा माने यांचा दावा खोटा आहे, असे स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी स्टार प्रवाह वाहिनीली काही मुलभूत सवाल विचारले आहेत.

"किरण माने यांना काढून टाकताना स्टार प्रवाहने विशाखा समिती कायद्यानुसार स्थापन केलेल्या समितीमार्फत व्यवस्थित प्रक्रिया करून, मग हा निर्णय घेतला होता का? माने यांच्या विरुद्ध काही महिला कलावंतांनी गैरवर्तनाच्या लेखी वा प्रत्यक्ष तक्रारी केल्या होत्या का? त्यासंबंधीचे साक्षीपुरावे घेण्यात आले होते का? माने यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती का? हे प्रश्न आहेत. माने यांनी काही चुकीचे केले असेल, तर त्यांची बाजू घेण्याचे काहीच कारण नाही, अशावेळी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु जी काही कारवाई व्हायची, ती नियमानुसार झाली पाहिजे. संबंधित महिला कलावंतांनी चॅनेल वा निर्मात्याकडे तक्रार केली नसेल, तर पोलिसात तरी तक्रार दाखल केली होती का? तशी ती केली असेल, तर त्याची दखल घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली का? हे माझे प्रश्न आहेत.

मालिकेमधून काढून टाकणे न टाकणे हा किरकोळ मुद्दा आहे. माने यांनी गैरवर्तन केले असेल, तर त्यांच्याविरुद्ध खरे तर फौजदारी कारवाईच व्हायला पाहिजे. परंतु त्यांनी काहीही केले नसेल, तर चौकशीपूर्वीच फाशी देणे ही पद्धतही अजिबात योग्य नाही. आज मात्र चॅनेलमुळे ज्यांना खूप कामे मिळत आहेत, भरपूर पैसा व प्रसिद्धी मिळाली आहे, असे लोक चॅनेलच्या बाजूने व अर्थातच माने यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. एखाद्या चॅनेलच्या कृपेमुळे चांदी झालेले कलावंत चॅनेलची चमचेगिरी करतच असतात. तेव्हा त्यांनी या प्रश्नावर काहीही मत दिले, तरी त्याला काहीही अर्थ नाही. विशेष म्हणजे, सजग व प्रतिभाशाली दिग्दर्शक - कलावंत म्हणून ज्यांचा गौरव होतो, असे संबंधित मालिकेचे दिग्दर्शक या प्रकरणात सोयीस्करपणे मौन बाळगून आहेत! मालिकेतून मला का काढून टाकले ते विचारण्यासाठी माने यांनी फोन केला असता, या महाशयांनी तो उचललाच नाही... अशी माणसे पुन्हा सामाजिक जाणीव वा निखळ कलावादी चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वत:चा उदोउदो करून घेत असतात ! काही कलावंत राजकीय पक्षात जाऊन चित्रपट शाखा वगैरेंचे प्रमुख होतात आणि अशा प्रकरणात 'आदेश' मिळताच उघडपणे पक्षपाती भूमिका घेतात. मात्र माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांच्यावर आरोप सुरू झाले, हे लक्षात घेतले पाहिजे, आधी नव्हे. त्यामुळे त्यांच्या राजकीय मतांमुळे ही कारवाई झाली असावी, असा संशय बळावतो आणि हे जर खरे असेल, तर ते अधिक भयंकर आहे. त्याचवेळी माने यांच्यावर ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांनी आता त्याचा पाठपुरावा करून प्रकरण तडीस नेले पाहिजे. माने यांनी काही चुकीची गोष्ट केली असेल, तर मी त्याचे कधीही समर्थन करणार नाही. परंतु ठोस प्राथमिक पुरावे समोर येण्यापूर्वीच त्यांना 'हरामखोर' म्हणणे, 'सोंगाड्या' संबोधणे, हे एखाद्या आक्रस्ताळी 'विचित्रा' नेत्याच करू शकतात!- 

Tags:    

Similar News