मोदींना 'गादीवर' बसवणारा माणूस…
मोदींना देशाच्या पंतप्रधान पदावर नेणारा महाराष्ट्रातील 'तो' माणूस कोण? पंतप्रधान पद मिळाल्यानंतर मोदी या व्यक्तीला विसरले का? कोण आहे ही व्यक्ती... जाणून घ्या श्रीनिवास खंगाटे यांच्या लेखातून;
अतिशयोक्ती आहे का वरील स्टेटमेंटमध्ये.! मोदींचा स्वतःचा करिष्मा जरूर होता. पण अण्णा हजारेंचे दिल्लीतील 'जंतरमंतर वरचे' भ्रष्टाचारविरोधी प्रभावी आंदोलन काँग्रेसला दिल्लीच्या तख्तावरून 'खाली खेचण्यास' निर्णायक ठरले होते हे पांढरे स्वच्छ सत्य आहे.!
अण्णांच्या गांधी टोपीएव्हढे.!
पण ज्यांनी शिडी दिली ते अण्णा कुठे राहिले आणि मोदी कुठल्या कुठे गेले देखील.!
अण्णा हजारे त्यावेळेस दिल्लीत सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे हॉट सेलिब्रेटी होते.
अण्णांच्या त्या व्यासपीठावर जाण्यासाठी भलेभले 'धडपडत' होते...
कोणत्याही व्यासपीठावर न जाणारा आणि उत्तम सामाजिक जाणीव असलेला अभिनेता आमीर खान याला अण्णांच्या जंतरमंतर च्या व्यासपीठावर जाण्याचा मोह आवरला नाही.!
आण्णा हजारे 'सामाजिक सुपरस्टार' झाल्यात जमा होते पण... मराठी माणसाला बहुधा मोठं यश पचवता येत नाही.! शिडीवरून वर गेलेले अण्णा सापाच्या तोंडातून सरसर खाली आले. त्यांचे आणि त्यांच्या चळवळीत असलेल्या सहकाऱ्यांशी मतभेद झाले.!
या आंदोलनाच्या यशाचा फायदा घ्यावा.. राजकीय पक्ष स्थापन करावा अशी अण्णांचे तत्कालीन शिष्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण प्रभूतींचा आग्रह होता आणि तसे करू नये अशी अण्णांची ताकीद होती.!
अण्णांचा स्वभाव रबर तुटून ताणून तुटण्याचा म्हणून प्रसिद्ध होता आणि आजही तसाच आहे.!
विक्रमादित्यासारखा अण्णांनी हट्ट सोडला नाही आणि..हुश्शार भाजपाने अण्णांनी तापवलेल्या तव्यावर सर्वशक्तींनिशी हातोडा हाणला.!
दिल्लीपर्यंत गेलेले अण्णा पुन्हा राळेगणसिद्धीपुरतेच सीमित राहिले.! ९ वर्षांपूर्वी देशाचा 'हिरो' झालेला माणूस... काही वर्षांनी महाराष्ट्राच्याही विस्मरणात गेला.!
अण्णा हजारेंचा असा शक्तिपात का झाला असावा? हा सुद्धा शोध निबंधाचा विषय आहे.
महाराष्ट्रातील अनेकांना मोदी प्रत्यक्ष भेटून गेलेत पण... अण्णा हजारेंना ते हिंग लावून विचारत नाहीत.! ते कशाला त्यांचे पट्टशिष्य अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून दोन टर्म गाजवतायत पण एकेकाळी आपण अण्णा हजारेंचे बोट धरून समाजकारणात आलो याची पुसटशी सुद्धा जाणीव त्यांना राहिली नसावी.!
कृतघ्नतेचा मोठा इतिहास या देशाला आहे.!
पण या सगळ्याला अण्णांचा जिद्दी आणि हट्टी स्वभाव कारणीभूत आहे असं त्यांना जवळून ओळखणारे, मानणारे देखील बोलतात.!
क्षमता असूनही, अण्णा देशाचे दुसरे गांधी होऊ शकले नाहीत.!
एकेकाळी स्वयं माननीय बाळासाहेब ठाकरे ऐन फॉर्मात असतांना भ्रष्ट्राचाराच्या मुद्द्यावरून अण्णांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे राजीनामे घेतले होते. आठवतंय का, शशिकांत सुतार, बबनराव घोलप, शोभाताई फडणवीस वगैरे... एव्हढा अण्णांचा 'दबदबा' होता.
बाळासाहेब अण्णांचा उल्लेख जाहीर सभेत 'वाकड्या तोंडाचा गांधी' असा उपहासाने करत.!
एव्हढी परिणामकारक ताकद ठेवून असलेला एक स्वच्छ, निर्मोही, माजी सैनिक असलेला आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशाचा आदर्श बनत चाललेला खरा सोशल वर्कर काळाच्या ओघात अयशस्वी का झाला.!!
देशात 'माहितीच्या अधिकाराचा कायदा' अण्णांमुळे आला. एव्हढी तरी जाणीव आपण ठेवायला हवी होती.! असो.
हा एकट्या अण्णांचा पराभव नाही. हा भ्रष्टाचाराचा संपूर्ण विनाश व्हावा असा आग्रह असलेल्या देशभरातील सर्वच नागरिकांचा, चळवळींचा पराभव नाही का.!
याचा आज सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.!
एकाच वेळी अनेक शत्रू 'अंगावर' घेऊ नयेत हा अण्णांच्या अपयशातून आलेला धडा आहे.!
अण्णांनी शस्त्रांनी नाही पण... शब्दांनी अनेकांना दुखावले. शरद पवारांवर त्यावेळी दिल्लीत हल्ला झाला असता. एकच मारली का...? अशी अण्णांची तातडीची प्रतिक्रिया होती.!
भले अण्णांचा असेल राग पवारांवर.. पण त्यावेळेला तो 'रडीचा डाव' होता.! कारण त्यावेळेस माननीय शरद पवारांनी 'गांधीगिरी' करून त्यांच्यावर हात उचलणाऱ्याला माफ केले.
आणि गांधींच्या पावलावर चालणारा शिष्य म्हणतोय, की एकच मारली का.!
छोट्या ग्रामीण भागातून अण्णांचा सार्वजनिक म्हणण्यापेक्षा खरोखर सामाजिक म्हणावा असा उत्कृष्ट प्रवास सुरु झाला होता.!
गावांची प्रगती... तेथील भ्रष्ट शासकीय लोकांबद्दल त्यांचा एल्गार... राळेगणसिद्धी या गावाची ख्याती अण्णांनी देशभर पोहोचवली होती.! स्वातंत्र्यानंतर आपले 'हरवलेले' आदर्श शोधणाऱ्या तरुणांना अण्णांच्या रूपाने एक आधार सापडला होता.!
अनेक उत्तम धडाडीचे, तरुण कार्यकर्ते अण्णांशी जोडले गेले होते.!
भ्रष्टाचारात समुद्राच्या गाळाशी गेलेल्या या देशाला समुद्रमंथन करून वर आणण्याचे सामर्थ्य अण्णांमध्ये असू शकते असे शेकडो, हजारोंना वाटले.! अण्णांच्या निमित्तानं कदाचित देश खऱ्या अर्थानं स्वच्छ झालाही असता.!
पण...मी कदाचित स्वप्नरंजन करतोय.!
असो... मोदींनी भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचे काही अंशी प्रयत्न जरूर केले..पण लोकांची बोटे आजही अंबानी आणि अदानींकडे वळतात तेव्हा... खरं काय आणि खोटं काय याचा गोंधळ मनांत उडतो खरा.!! असो.
काही माणसं अशी असतात... जी इतरांना मोठं करतात पण त्यांना स्वतःला मोठं होता येत नाही.! अण्णा हजारे हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व आहे असं मला वाटतं.!
म्हणून आण्णा हजारेंचं कार्य कवडीलमोलाचं आहे असं मी तरी म्हणणार नाही.!
'स्वच्छ प्रशासनाची पणती' त्यांनी पेटवून प्रकाश दाखवला हे कसं विसरता येईल.!
प्रत्येक यशस्वी माणूसच चांगला.. असं मानणारा मी तरी माणूस नाही.! किंबहुना चांगली माणसं फार कमी वेळा यशस्वी होतात असं माझं ठाम मत आहे.!
वयाची ८५ वर्षे पूर्ण करणाऱ्या अण्णांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!! आणि या कलियुगातील गांधीला त्याच्या साधेपणासाठी, स्वच्छ आचरणासाठी आणि त्याच्या आग्रहासाठी मानाचा अखंड मुजरा.!
ता.क. अण्णांनी संकल्प केलेलं लोकपाल विधेयक शेवटपर्यंत आलंच नाही याचं दुःख वाटतं आणि खेद वाटतो.! ते यापुढे कधी येईल अशीही सुतराम शक्यता वाटत नाही.!
(श्रीनिवास खंगाटे)