ब्रँड नागराज मंजुळे आणि 'झुंड' चित्रपट – मेघनाद कुळकर्णी

नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमाची चर्चा खूप झाली. पण या सिनेमाच्या माध्यमातून 'नागराज मंजुळे' हा ब्रँड तयार झाला का, या सिनेमाची ताकद काय आणि यातील कच्चे दुवे कोणते, याचे परखड विश्लेषण केले आहे, मेघनाद कुळकर्णी यांनी....

Update: 2022-04-15 10:29 GMT

हिन्दी चित्रपट पब्लिक आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी बहुतेक वेळा बघत आलेले आहे.

पण काही चित्रपट त्याच्या दिग्दर्शकासाठी देखील बघितले जातात. अगदी देव-दिलीप- राज यांच्या जमान्यात देखील गुरुदत्त, बिमल रॉय यांच्यासाठी चित्रपट पहाणारे होतेच. तिसरी मंजिल सारखा चित्रपट लोकांनी शम्मी कपूर साठी नाही तर दिग्दर्शक विजय आनंद यांच्या साठी पहिला. असे दिगदर्शक विषयांची निवड, पटकथा, चित्रीकरण, संकलन, अभिनयाची हाताळणी, चित्रपटाची रचना, यातून चित्रपट क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवून जातात. दिग्दर्शकाची स्वतःची अशी वेगळी शैली लगेच ओळखता येते. बिमल रॉय यांची तरल वास्तववादी शैली, लयी वर केलेलं संकलन, गुरुदत्त यांचे करुणा, ठळक छाया भेद असलेले चित्रीकरण, गाणी, पात्र योजना,

विजायानंद यांचे गाणी संकलनातील हातोटी, त्यांचे 'स्ट्रेट कटस' राजकपूर यांची विषय निवड, शोमनशिप अगदी अलिकडची उदाहरणं द्यायची तर श्याम बेनेगल, मृणाल सेन यांचे 'समांतर' चित्रपट. हृषीकेश मुखर्जी, बासु चटर्जी यांचा सर्वसामान्य नायक, महेश भट्ट यांचे करडी छटा असलेले 'समांतर' विषय मुख्य प्रवाहात घेऊन येणारे चित्रपट, बंन्साली यांच्या चित्रपटा मधील रंगसंगती, अमीर खान, राजकुमार हिराणी यांचा नर्म विनोद, राम गोपाल वर्मा, अनुराग कशय्प यांचे 'स्टार्क' चित्रीकरण, मधुर भंडारकर यांच्या चित्रपटात निवडलेला वेगवेगळा सामाजिक स्तर, झोया अख्तर, अपर्णा सेन, मेघना गुलजार यांच्या चित्रपटातून दिसणारे स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातील बारकावे, अशा अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटातून त्यांची स्वतःची अशी वेगळी शैली उमटलेली दिसते. हे चित्रपट दिग्दर्शकाचे असतात. दिग्दर्शक द्रुक भाषेतून ते 'लिहीत' असतो. आपल्या चित्रपटाचा तो 'ऑतेर' (Auteur म्हणजे Author ) असतो. 'ऑतेर' समीक्षा फ्रेंच दिग्दर्शक त्रुफो याने मांडली. त्याने हिच्कॉक सारख्या मुख्य प्रवाहतील, दिग्दर्शकांच्या शैलीची चिकित्सा केली. तशी चिकित्सा वर नमूद केलेल्या सर्व दिग्दर्शकांबाबत करता येईल. अशी चिकित्सा मनमोहन देसाई व डेव्हिड धवन यांच्या शैलीची देखील होऊ शकते. ( एक विदेशी चित्रपट समीक्षक मनमोहन देसाईच्या चित्रपटना चक्क ' cinema of Absurd' ( theatre ऑफ absurd' च्या लायनीत) समजत होती. धन्य !

नागराज मंजुळेच्या चित्रपटांची चिकित्सा

अशी चिकित्सा नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांची देखील होऊ शकते. आपल्या आजवर केलेल्या मोजक्या चित्रपटातून नागराज मंजुळेनी 'ऑतेर' श्रेणीत नक्कीच पदार्पण केलेलं आहे. ('झुंड' चित्रपट लोक अमिताभ बच्चन साठी नाही तर प्रामुख्याने नागराज मंजुळे या दिग्दर्शका साठी बघतात, हे त्याचं मोठंच यश आहे.) फक्त दिग्दर्शकीय शैली आणि त्याचं ब्रंडिंग यात फरक आहे. कधीकधी तो ठळक असतो तर कधी तो सूक्ष्म असतो. उदा. हिन्दी चित्रपटांचे आंतरप्रवाह असलेले बिमलदा, गुरुदत्त हे शैलिदार दिग्दर्शक होते तर व्ही. शांताराम, मधुर भांडारकर, मनमोहन देसाई, डेव्हिड धवन इत्यादिनी स्वतःचं दिग्दर्शकिय ब्रँडिग केलं होतं असं आपण म्हणू शकतो.


तशाच प्रकारचं ब्रंडिंग नागराज मंजुळे यांचं होत चाललं आहे हे त्यांच्या नुकत्याच आलेल्या 'झुंड' चित्रपटातून जाणवतं. त्याबद्दल आणि 'झुंड' चित्रपटा बाबत इथे बोलायचं आहे.

सकस चित्रपटांची शैली त्याच्या बहुआयामी परिणामावरुन, त्याच्या 'गहिराई' वरुन प्रतीत होते, मनावर ठसते. दिग्दर्शकिय ब्रंडिंग मध्ये अशी 'खोली' अभिजात सकसपणा जाणवत नाही. शांताराम बापूंचे चित्रपट उत्तम होते पण ते सखोल होते असं म्हणता येत नाही. त्यांचे चित्रपट सामाजिक बांधिलकीतून आल्यापेक्षा सामाजिक बांधिलकीवर बेतल्या सारखे वाटतात. (आज तर त्यांच्या चित्रपटात दिग्दर्शनाच्या 'जागा' आल्या की लोक उपहासाने 'डिरेक्शन-'डिरेक्शन म्हणून ओरडतात) मधुर भांडारकर यांनी तर एक एक विश्व बुद्ध्या वाटून घेतले आहे. एक बार, एक नाका, एक फॅशन विश्व, असे विषय ते निवडतात. त्या विश्वाची काही वेगळी जाणीव ते देत नाहीत तर आपले असलेले समजच पुनरस्थापित करतात. नागराज मंजुळे याची वाटचाल अशाच दिशेने चालली आहे असं वाटतं. फक्त त्यांनी निवडलेलं विश्व वेगळं आहे. ते ग्रामीण आहे, वंचितांचं आहे, जातिभेद असलेलं आहे. ही ग्रामीण पार्श्वभूमी त्यांच्या सर्वच चित्रपटाना आहे.परिसर आणि पात्रं निवड हा त्यांच्या शैलीचाच भाग बनून गेलाय. त्यांचे विषय देखील ( शांताराम बापू आणि मधुर भांडारकर याच्या सारखे 'निवडक' असतात. एखाद्या निबंधात निवडून दिल्यासारखे. 'फॅनड्री' चित्रपट डुकरं पकडणाऱ्या आदिवासी जमातीवर, 'सैराट' ग्रामीण जातिभेदावर आणि 'झुंड' झोपडपट्टी मधल्या मुलांवर आहे असं सरळ एकस्तरीय विधान करता येतं. सकस चित्रपटाबाबत असं करता येत नाही. ' पाथेर पांचाली' ' भुवन शोम' कुठल्या विषयावर होते? एक वाक्यात लिहा, जमणार नाही. कारण असे चित्रपट बहुस्तरिय अनुभव देतात. तो मानवी अनुभवच त्या चित्रपटाचं 'सांगणं' असतं. वेगळं भाष्य करावं लागत नाही. नागराज मंजुळेना असं भाष्य करायचं आहे हे सतत जाणवत राहतं. त्यामुळे ते सखोलपणात कमी पडतात. बहुपेडी मानवी ताणेबाणे तर त्यांच्या चित्रपटात बिलकुल दिसत नाहीत. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्याला नेमून दिलेलं काम करत आहे असच वाटत राहतं. ( याचा अर्थ त्यांचे साचे होतात असंही नाही. पण त्यांना इतर मानवी पदर उरत नाहीत हे देखील खरं!) फॅनड्रीमधला जब्या, सैराटचे उच्च-नीच सामाजिक स्तरावरून आलेले नायक-नायिका झुंडमधली झोपडीतली मुलं त्या विश्वाचे प्रतिनिधि वाटतात जिवंत वाटत नाहीत. मंजुळेना पात्रांतून व्यवस्थेवर भाष्य करायचं आहे, भले ते सूक्ष्म असेल, पण करायचं आहे.

असं भाष्य करणं, काहीतरी संदेश देणं आणि तरीही चित्रपट सर्व तांत्रिक बाबतीत उत्तम असणं प्रेक्षकाना नेहेमीच आवडत आलं आहे. असा चित्रपट तमाम पब्लिक 'हटके' समजते. तसंच काहीसं मंजुळेच्या चित्रपटा बाबत झालेलं असणार. त्यांच्या चित्रपटात ग्रामीण पार्श्वभूमी, बैठक दिसते, सांगितली जाते पण मनात खोल ठसत नाही. पात्रांचा आणि परिसराचा वापर केल्यासारखा वाटतो. अनेक कथाना कादंबरीना चित्रपटना ग्रामीण पार्श्वभूमी आहे पण तो त्याचा 'विषय' नाही. उदा. 'माचीवरचा बुधा' या गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीतील बुधा हे एक केवळ ग्रामीण पात्रं नाही तर एक मानवी अवस्था जाणवून देणारा जिवंत माणूस वाटतो. मराठीतलं उदाहरण द्यायचं तर 'श्वास' चित्रपटाचं देता येईल. त्यातील व्यक्तिरेखा सकस आणि बहुपदरी वाटतात. त्यांच्या मानवी भावनांशी प्रेक्षक तादात्म्य पावतो. मंजुळे यांच्या व्यक्तिरेखा पृष्ठ-स्तरिय एक-रेषीय वाटतात. त्यांना इतर पदर नसतात.

नागराजचे चित्रपट वास्तववादी वाटतात का?

नागराज मंजुळे यांचे चित्रपट वास्तववादी असतात असं मानलं जातं. पण त्याच्या चित्रपटाचा घाट वास्तववादी नाही. अनेक वेळा वास्तवाला खटकणाऱ्या अनेक गोष्टी त्यात दिसतात. 'सैराट' मध्ये समुद्रावर किवा नदीकाठी बैठकीत गावाकडे दिसणारा झोपाळा टांगलेला दिसतो तो कुठून आला? सैराटचा नायक एका टेकडीवरून नदीत सूर मारून पोहत पोहत काठावर येतो आणि पळत पळत विहिरीवर येऊन विहिरीत उडी घेतो, कारण नायिका तिथे आहे, प्रश्न पडतो हा सूर त्याने 'पलीकडे' म्हणजे नक्की कुठे मारला? नायकाला नायिका स्वप्नात दिसते तेव्हा तिने शहरी पार्टीत शोभावा असा झगमगित पोशाख केला आहे, नायकाला नायिका आहे तशी, वास्तववादी का दिसत नाही, का तो सिनेवेडा आहे. नायक नायिका पळतात त्या दृश्यात पार्श्वभूमीवर आग लगल्याचे दिसते, ती कुठून आली. अशी दृश्ये नेत्रदीपक असली तरी जाहिरातपटात शोभतात. की त्यांना दिग्दर्शकाची सोय मानायचं? 'सैराट'च्या यशात गाण्यांचा फार मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. गाणी नसती तर चित्रपट इतका यशस्वी झाला असता का शंकाच आहे. नसता चालला! चित्रपट पूर्वार्धात चांगला आहे पण उत्तरार्धात बेकार आहे असं सांगणारे अनेक 'ग्रामीण' प्रेक्षक मला माहीत आहेत. मुळात वास्तववादी चित्रपटात गाणी असावी का हा मुद्दाच आहे. पण हिन्दी चित्रपटांनी तो निकालात काढलाय. हिन्दी चित्रपटात गाणी घर करून बसलीत. (there to stay) गाणी हे हिन्दी चित्रपटांचं वास्तव आहे.

नागराज मंजुळेची दिग्दर्शकीय शैली

मंजुळेकडे वेगळी अशी दिग्दर्शकिय शैली नक्कीच आहे. त्यांचं चित्रीकरण,संकलन, दृश्यं योजना, कॅमेरा अंगल्स संयत अभिनय काढून घेण्याची हातोटी, पटकथेचा बाज यातून त्यांचा असा खास ठसा जाणवतो. हिन्दी किंवा मराठी चित्रपटात दिसणारा भडकपणा ते कटाक्षाने टाळतात. पण हे म्हणजे एखादा चित्रपट बिलकुल वाईट नाही म्हणजे तो श्रेष्ट चित्रपट आहे असं म्हणण्या सारखं आहे. पण हे ही नसे थोडके, अलीकडे इतकं सुध्धा कोणी करत नाही! मंजुळेंची कथन पद्धती/ पटकथा सर्जनशील ना वाटता एखाद्या निबंधासारखी डेझरटेशन सारखी वाटते. अत्यंत उच्च दर्जाचं कॉपीरायटिंग केल्यासारखी वाटते. 'झुंड' चित्रपटातून हे जाणवत राहतं. 'झुंड'ची पटकथा स्वतः मंजुळे यानीच लिहिलेली आहे.

आता आपण 'झुंड' चित्रपटाकडे वळू. चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या स्लम सॉकर उपक्रमापासून प्रेरणा घेऊन केलेला आहे. एका कॉलेजला आणि एका उच्चभ्रू सोसायटीला लागून एक झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतली मुलं मारामऱ्या करतात, चोऱ्या करतात, जुगार खेळतात,नशा करतात. शेजारच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारा विजय हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला एक फुटबॉल कोच (अमिताभ बच्चन) एकदा या झोपडपट्टीतून जात असताना काही मुलांना प्लॅस्टिकच्या बाटलीबरोबर फुटबॉल खेळताना पाहतो. मुलांमधलं टॅलेंट तो हेरतो. त्यांना खरा फुटबॉल खेळायला देतो. वर पैसे देखील देतो. मुलं फुटबॉल मध्ये इतकी रमतात की ती नशापाणी, चोऱ्या-माऱ्या विसरतात, सुधारतात. विजय स्लम-सॉकर लीग स्थापन करतात. देशातल्या झोपडपट्टीतील टीम त्यात खेळतात. त्यातून विजय सर एक नॅशनल टीम बनवतात. या टीमला आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खेळण्याचं निमंत्रण येतं आणि मुलं झोपडपट्टीं कुंपण भेदून स्पर्धेसाठी आकाशात उड्डाण घेतात. अशी ही गोष्ट. विजय बारसे यांच्या सत्य घटनेवर आधारित!

झुंड चित्रपट अभिजात कलाकृती आहे का?

खेळावर आधारित चित्रपट खरं तर उत्तम प्रेरक, (motivational) चित्रपट असतात. त्या त्या खेळाच्या पलीकडचा विचार ते देऊन जातात. 'लगान' मध्ये ब्रिटिश आणि स्थानिक रहिवाशी यांच्यातील क्रिकेट सामना आहे, ' चक दे इंडिया' मध्ये एक हिणावलेला हॉकी प्रशिक्षक महिलांना घेऊन एक आंतरराष्ट्रीय टीम कशी उभारतो त्याची गोष्ट आहे. ' दंगल' चित्रपटात महावीर सिंग फोगट हे आपल्या मुलींना कुस्तीत प्रवीण करून कॉमन वेल्थ स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकून देतात ती सत्य कथा आहे. पुराणकथा, हिन्दी चित्रपट आणि खेळ यांनी अवघा देश बांधून ठेवलेला आहे. खेळाच्या चैतन्याशी प्रेक्षक आपसूक जोडले जातात. चित्रपट प्रचंड लोकप्रिय होतात.( 'दंगल' ने तर आतापर्यंत सर्वाधिक २००० कोटीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं) खेळाच्या पलिकडची पण खेळातून आलेली देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास असा प्रेरणादायी परिणाम हे चित्रपट हे देतात. 'झुंड' देखील त्याला अपवाद नाही. बिघडलेली झोपडपट्टीतील मुलं फुटबॉलच्या निमित्ताने कशी एकत्र येतात आणि झोपडपट्टीच्या मर्यादा ओलांडून परदेशाकडे उड्डाण करतात ही प्रेरणादायी गोष्ट चित्रपट उत्तमरित्या सांगतो. तो एक चांगला चित्रपट आहे पण तरीही अभिजात कलाकृतीची उंची तो गाठू शकत नाही, याची कारणं चित्रपटाची रचना कशी केली, गोष्ट कशी सांगितली, त्यासाठी कुठली तांत्रिक आयुधं वापरली यात आहे. दिग्दर्शक त्याची गोष्ट कशी सांगतो. त्यासाठी पटकथा कशी बांधतो, कलाकारांची निवड कशी करतो,कॅमेरा आणि संकलन तंत्रे कशी वापरतो, संगीताचा आणि आवाजाचा उपयोग कशा प्रकारे करतो यावरून त्याची ओळख ठरते.

कलाकार निवडी बद्दल नागराज मंजुळे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अभिनयाचा कुठलाही अनुभव नसलेले सर्वसामान्य स्तरातून आलेली माणसं नट म्हणून निवडतात. या चित्रपटात त्यांनी झोपडपट्टी मधील मुलांची निवड केली आहे. अशा अननुभवी मुलांकडून उत्तम अभिनय 'काढून' घेण्याची हातोटी नागराज यांच्यात आहे. तो त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीचा अविभाज्य भाग आहे. हा अभिनय नैसर्गिक वाटणं ही त्यांची खुबी आहे.

नागराज मंजुळे यांची 'कच्ची बांधणी'  शैली

आपल्या तंत्रज्ञ संचाशी नागराज यांचं उत्तम 'टयूनिंग' झालेलं दिसतं. आणि हा संच ते सहसा बदलत नाहीत. अनेक मोठ्या दिग्दर्शकांच्या बाबतीत हेच घडल्याचं दिसतं. पटकथा लेखक, कॅमेरामन,संकलक, संगीत दिग्दर्शक हे जेव्हा एकजीव होतात तेव्हा एक उत्तम कलाकृती जन्माला येते. कॅमेरामन तर दिग्दर्शकाचा डोळाच! दिग्दर्शक म्हटला की लगेच त्याचा कॅमेरामन दिसू लागतो. राज कपूर म्हटलं की राधू कर्माकर, गुरुदत्त म्हटला की व्ही. के. मूर्ती 'दिसू' लागतात. 'झुंड' चित्रपटात सुधाकर रेड्डी याक्कान्ति यांनी आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली आहे. मंजुळे यांचे टेडमार्क 'स्टेडीकॅम' शॉटस, कलाकारांना 'फॉलो' करणारे ट्रॅकिंग शॉटस त्यांनी अत्यंत सर्जनशिलरित्या घेतलेले आहेत. नागराज 'लो-अँगल' शॉटस चा अर्थपूर्ण वापर करतात. मुलं ट्रेन वर चोऱ्या करताना, शिड्या चढताना वापरलेले 'लो-अँगल' शॉटस परिणामकारक झाले आहेत. डॉन विमानतळावरील सेक्युरिटीच्या परडित खिशात सापडलेली ब्लेड टाकतो त्या प्रसंगी वापरलेला'लो-अँगल' शॉट आणि 'स्लो-मोशन' अर्थपूर्ण आहे.

मंजुळेना संपूर्ण संकलित चित्रपट पटकथेच्या वेळीच 'दिसत' असावा असं संकलनातून जाणवतं. आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण माहीत असणं हे उत्तम दिग्दर्शकाचं लक्षण आहे. नागराज यांचं गण्याचं टेकिंग उत्फुर्त आहे. मला वाटतं की ते कोरीओग्राफी करत नसावेत. लोकांना नाचायला सांगून जागच्या जागी दृश्य-योजना, शॉट-डिव्हिजन करत असावेत. त्यामुळे ही गाणी नैसर्गिक उर्जेनं भरलेली वाटतात. त्यातील 'रॉ-नेस' कच्ची बांधणी लोकांना आवडून जाते.

नागराज मंजुळे कधी कधी एका वेगळ्याच प्रसंगात व्यक्तिरेखा प्रस्थापित करतात आणि पुढे ते पात्र मुख्य कथेत येतं. दोन मुलांची आई असलेली मुस्लिम तरुणी, आणि जीव देण्यासाठी रेल्वे-लाइन वर उभा असलेला तरुण. मुस्लिम तरुणीची कौटुंबिक पार्श्वभूमी, कलह, एक दोन प्रसंगात आधी येतो, आणि पुढे हीच तरुणी नॅशनल फुटबॉल टीममध्ये सामील होते. जीव देण्यासाठी उभा राहिलेला तरुण एकच दृश्यात दिसतो,तो देखील पुढे फुटबॉल टीमचा भाग होतो. ही 'सांधणी' नागराज उत्तमरित्या करतात.

झुंड चित्रपटा खटकणाऱ्या गोष्टी

या झाल्या चित्रपटातील जमेच्या बाजू. चित्रपटात खटकणाऱ्या गोष्टी देखील आहेत.चित्रपट गोष्ट सांगतो म्हणण्यापेक्षा गोष्ट रचतो म्हणणं जास्त योग्य ठरेल. त्यात सर्जनशील उर्जेपेक्षा कलाकुसरीचा(Craftsmanship) चा भाग जास्त आहे. चित्रपटातील प्रसंग एकमेकातून उलगडत न जाता एकमेकां समोर ठेवल्या सारखे, रचल्या सारखे वाटतात.

• झोपडपट्टीतील मुलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ठसवणे आणि मुख्य कलाकार पडद्यावर प्रस्थापित करणे.

• फुटबॉल कोच विजयसरांचा, अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या जीवनात प्रवेश!

• मुलांचं खरा फुटबॉल घेऊन खेळणं, त्यात प्राविण्य मिळवणं आणि हळूहळू सुधारत जाणं

• कॉलेजच्या फुटबॉल टीमबरोबर सदिच्छा स्पर्धा आणि त्यात विजय.

• व्यवस्थेची झोपडपट्टीवासीयांबद्दलची अनास्था दाखवण्यासाठी फक्त हवी तीच वाक्ये बोलण्यासाठी दिग्दर्शकाने नियुक्त केलेली पात्रं.

• आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलांना येणारे नोकरशाही, पोलिस, एकंदर 'व्यवस्थेचे' अडथळे.

• सर्व अडथळे पार करून झोपडपट्टीतील मुलांनी घेतलेली गगनभरारी

अशा 'मुद्देसूद' टप्प्यात कथेची बांधणी केली आहे. ( एका उत्तम निबंधाप्रमाणे, किंवा अप्रतिम 'कॉपी-रायटिंग' प्रमाणे.)

काही प्रसंग कळीची वाक्ये ठसवण्यासाठी लिहिलेत असं वाटून जातं. उदा. एक प्रसंगात " भारत म्हणजे काय?" असा प्रश्न लहान मुलगा विचारतो तो प्रसंग. त्यात प्रत्येकजण आपली ओळख करून देतो. ही ओळख खरीतर दृष्यातून व्हायला हवी होती, संवादातून नाही. त्यावेळेस एक मुलगा बुलबुल तरंगावर 'सारे जहासे अच्छा' ही धुन वजवतो ते बेतल्यासारखे वाटते. हीच धुन चित्रपटात पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे. ते प्रचारकी वाटतं. किशोर कदम यांनी साकारलेलं कॉलेजच्या फुटबॉल प्रशिक्षकाचं पात्र तर एक प्रतिगामी विरोधाभास दाखवून देण्यासाठी मुद्दाम योजलेलं पात्र वाटतं. तो पूर्ण चित्रपटभर झोपडपट्टी वासियांबद्दल घृणा असेलेलं बोलणं या शिवाय काहीही करत नाही. " ये गंदगी यहा पर मत लाना' " इन लोगोंको तो पैरतले कुचल देना चाहिये "भारत मतलब गड्डी गुदाम" "सब जगह कागज चाहिये.. जिंदा दिखानेके लिये या मुर्दा" " ये लोग क्रिमिनल होते है" अशा आशयाची वाक्यं टप्याटप्यावर पेरून ठेवलेली दिसतात. ती कुठल्याही पात्राच्या तोंडी असती तरी फरक पडला नसता.

अमिताभ बच्चन यांचं कोर्टामधलं भाषण म्हणजे चित्रपटाचं सार मुद्देसूदरित्या सांगण्यासारखं आहे. मुलांचं सक्षमीकरण झालेलं आहे, मुलं सुधारलेली आहेत, खेळात प्रवीण झाली आहेत (मुलं पडद्यावर उत्कृष्ट फुटबॉल खेळतात.) आणि विदेशात खेळण्यास देशाचं प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहेत हे तर आतापर्यंत प्रेक्षकाना कळलंय. ते पुन्हा ठसवण्यासाठी एक लंबे चौडे भाषण आवश्यक होतं का? दुसऱ्या एखाद्या प्रसंगात अधिक तरलपणे, सटलपणे ठसवता आलं नसतं का? तरीही असे कोर्ट प्रसंग नाट्यमय आणि भडक होतात, तसं करणं दिग्दर्शकाने कटाक्षाने टाळलंय, अमिताभ बच्चनकडून संयत अभिनय करून घेतलाय ही जमेची बाजू. अमिताभ बच्चन यांनी खरं तर ते उत्तर आयुष्यात करतात तसाच अभिनय केलाय, फक्त दिग्दर्शकाने त्यांना एक पट्टी कमी 'अंडर-प्ले' करायला लावून आणि त्यांची चावत चावत बोलण्याची लकब कंट्रोल करून ते पात्र सजीव आणि पटण्यायोग्य केलं आहे.

नागराज मंजुळे यांना काय टाळता आले असते?

एक उच्चभ्रू मुलगी झोपडपट्टीवल्याच्या प्रेमात पडते हे भाबडं romanticism टाळता आलं नसतं का? केवळ एक उत्तम खेळाडू म्हणून ही मुलगी त्याची बाजू घेते, त्याची फॅन होते, त्याला सर्व मदत करते हे जास्त वास्तवाला धरून नाही का? ती मुलगी प्रेमात पडून त्याला त्याचे फोटो मोबाइलवर पाठवते हा सुध्दा थिल्लरपणा वाटतो.

सर्वच यंत्रणा: समाज, पोलिस, नोकरशाही वगैरे; नेमून दिलेल्या प्रसंगात खलनायक म्हणून पुढे येतात. त्यांना इतर कंगोरे नाहीतच का? झोपडपट्टीतली मुलं फक्त खेळाच्या संदर्भात पुढे येतात, त्यांचे कौटुंबिक संदर्भ फक्त एक दोन दृष्यात दिसतात.

मुलं साफसफाई करतात तो प्रसंग, आंबेडकर जयंती साजरा करतात तो प्रसंग, घुसडल्या सारखे वाटतात. काहीही संदर्भ, आगापिछा नसताना आंबेडकर जयंतीची गरज होती का? अशाने आंबेडकरवादी लॉबी त्यांना ताब्यात घेण्याची आणि चित्रपटाची आंबेडकरवादी (चित्रपट बाह्य) चिकित्सा करण्याची शक्यता नाही का? कुठल्याही एका गोटाने असा ताबा मिळवणं, तशी संधी चित्रपटाने देणं कितपत योग्य आहे? (का हा प्रसंग फक्त गाण्यासाठी आणि झोपडपट्टीतील मुलं त्याही गदारोळात माणुसकी दाखवून रुग्णवाहीकेस वाट करून देतात हे ठसवण्यासाठी आहे?) खरं तर मंजुळे कुठल्याही गटाची, जातीची, विचारसरणीची कधीही बाजू घेत नाहीत ते फक्त वास्तवावर भाष्य करतात. पण असे प्रसंग चित्रपटात आल्याने त्यांच्या चित्रपटांची चित्रपटबाह्य समीक्षा केली जाते.

चित्रीकरणात आणि संकलनात चित्रपटात नेहेमी वापरलेल्या क्लृप्त्या आहेत. पात्रांची ओळख करून देताना त्या पात्राला 'फीझ' करणं. मुख्य पात्राला ट्रॅकिंग शॉटने फॉलो करणं. स्लो-मोशनचा उपयोग. गाण्यात वापरलेले 'स्टोब्स' पण त्यात अतिरंजितपणा मात्र नाही.

गाणी कुठे येणार ते प्रेक्षकाना आधीच कळतं. प्रत्येक खेळाच्या प्रसंगात एक प्रेरक-गीत येतं.

चित्रपटाच्या शीर्षकगीतातून " बस्ती मे राहेणा है, लेना ना देना है, अशी एक झुंड पुढे येते, ही " किस्मत के मारोकी झुंड आहे. " हमारी बस्ती गटरमे है पर तुम्हारे दिल मे गंद है" असं भाष्य देखील त्यात आहे. " जमानेके लिये तू एक भंगार है.. जलादे ये सारी बेडिया.. लात मार (यावेळी अंकुश गेडामने मारलेली पेले सारखी उलटी किक अप्रतिम आहे.) असं प्रेरणागीत खेळाच्या पार्श्वभूमीवर येतं. प्रत्येकच खेळाच्या पार्श्वभूमीवर असं एक प्रेरणागीत आवश्यक होतं का? त्यामुळे अर्धं लक्ष खेळाकडे आणि अर्ध गण्याकडे असं विचलित होतं.

काही ठिकाणी पार्श्वसंगीत अनावश्यक आहे असं वाटतं. केवळ आवाज असते तरी चालले असते.

पार्श्वसंगीताचा अतिरेक झाला आहे असं वाटत राहातं.

भल्या भल्या दिग्दर्शकाना न कळलेली गोष्ट नागराज मंजुळेंना कळली आहे. कुठे थांबायचं हे त्यांना नेमकं कळलं आहे. तो त्यांच्या शैलीचा एक अविभाज्य भाग आहे. नागराज आपला चित्रपट एका सूचक टप्प्यावर संपवतात. 'झुंड' मध्ये देखील ते आपल्या झोपडपट्टी टीमला आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवत नाहीत, तर ते ' ही भिंत ओलांडण्यास मनाई आहे" असं लिहिलेल्या भिंतीवरून त्यांचं विमान उड्डाण घेतं इथे चित्रपट थांबवतात. ही दिग्दर्शकाने मुद्दाम निर्माण केलेली जागा आहे पण तो एक उत्तम शेवट देखील आहे.

नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' वर अनेक लोकांनी भरभरून लिहिलेलं आहे. या लेखात फक्त काय खटकतं ते लिहिलेलं आहे, ते फक्त आस्वादक खिलाडू वृत्तीने घ्यावे.

चित्रपट चांगला असला तरच काही खटकतं. (मनमोहन देसाईच्या चित्रपटात काहीही खटकत नाही.) "ऑतेर' श्रेणीत नागराज मंजुळेनचं पदार्पण झालंय. त्यांचा ब्रॅंड न होवो या सदित्छा!


Similar News