साहित्य संमेलनातील "कट्टा" म्हणजे कवींची निव्वळ थट्टा, एका कवीची खंत
साहित्य संमेलनांमध्ये भरणाऱ्या कवी कट्टांमध्ये खरंच सर्व कवींना संधी मिळते का, इथे भेदभाव होतो का, यासह कवी संमेलनावर प्रश्न उपस्थित करणारा साहित्यिक लक्ष्मण खेडकर यांचा लेख...;
अखिल भारतीय साहित्य संमेलनातील " कट्टा " ही कवीची उघड उघड थट्टा आहे, स्टेज ,आसन व्यवस्था, निवास ,मानधन , सन्मानचिन्हांसह सगळ्याच बाबतीत काहींचे अतोनात लाड तर काहींना अगदी दुय्यम वागणूक मिळते. स्वतःला कवी म्हणून घेणा-यांनाच जर हे भूषणावह वाटत असेल ,तर त्यात इतरांने काय बोलावं ? साहित्य संमेलनातील कवी संमेलनात होत असलेल्या भेदभावाबाबत परखड विश्लेषण केलं आहे साहित्यिक लक्ष्मण खेडकर यांनी...
अनेकदा मुख्य मंडपातल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनातील कवितेपेक्षा कवीकट्ट्यावरही उत्तमोत्तम कविता सादर होतात, ऐकायला मिळतात, कट्ट्यावरही चांगली कविता आढळण्याची शक्यता अधिक आहे हेसुद्धा मान्य आहे, पण तरीही अखिल भारतीय साहित्य संमेलनातील "कट्टा" ही कवीची उघड उघड थट्टा आहे,असे मला वाटते. स्टेज, आसन व्यवस्था, निवास, मानधन, सन्मानचिन्हांसह सगळ्याच बाबतीत काहींचे अतोनात लाड तर काहींना अगदी दुय्यम वागणूक हे चुकीचंय... स्वतःला कवी म्हणून घेणा-यांनाच जर हे भूषणावह वाटत असेल, तर त्यात इतरांनी काय बोलावं ?साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांना महामंडळांच्या पुढा-यांना एवढचं हवं असतयं ,अगदी फुकटात गर्दी गोळा करता येते, दोन तीन दिवस रात्रंदिवस कट्टा सुरु ठेवला म्हणून सर्वत्र त्यांची फुकटात वाह वाहही होते. त्यांना तेवढचं पाहिजेय, खरं तर गुणवत्ता असूनही ज्यांना कधी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जाण्याची संधी मिळाली नाही अशा जून्या जाणत्या किंवा नव्याने लिहू लागलेल्या दर्जेदार कवी-कवयित्रींसाठी पूर्वीसारखा उगवतीचे रंग वेगैरे किंवा आणखी दुस-या एखाद्या नावाने दर साहित्य संमेलनाला कट्ट्यासाठी हजारोच्या संख्येने कवी ,गझलकार बोलवण्यापेक्षा मोजक्याच तीस पस्तीसजनांना मानाने आमंत्रित करुन त्यांचा यथोचित सन्मान केला जायला हवाय. किंवा मुख्य निमंत्रितात वर्षोनुवर्षे त्याच त्या साहित्यिकांवर वारंवार झुली टाकण्यापेक्षा दरवेळी वेगवेगळ्या साहित्यिकांना ही संधी देण्यात यायला हवीय, एकूण साहित्यांवर, साहित्याच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या माणसांवर निपक्षपातीपणे चर्चा व्हायला हवीय, पण बेरजेच्या आणि मतांच्या राजकारणची आकडेमोड करण्यात मातब्बर असलेल्या परिषदेवर आणि महामंडळावर बसलेल्या ,साहित्यांशी दुरान्वये संबध नसलेल्या पाळीव पदाधिका-याकडून ह्या अशा अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नाहीय , लोकांना शहाणं करणाऱ्या साहित्यिकांनी तरी किमानपक्षी योग्य भूमिका घ्यायला हवीय, चिमुटभर स्वार्थासाठी हुजरेगिरी न करता स्वाभिमानाने ताठ उभं राहावं, कविता, कथा कादंब-यातील शब्दात जसे आहात तसे प्रत्यक्षात वागावं साहित्यिकांकडून एवढीच अपेक्षा आहे. बाकी सरकारी मदतीवर सालाबादप्रमाणे भरणा-या जत्रेत मिरवून घेणा-या तमाम हौवश्या गवश्या पुढा-यांसह साहित्यिक म्हणून बेगड लावून फिरणा-या त्यांच्या चेल्या चेमचांना ही खुप खुप शुभेच्छा ,सुमारांच्या आणि वशिल्याच्या भाऊगर्दीतही सत्व जपणा-या ,गांभीर्याने लिहिणा-या ,बोलणा-या लेखक लोकांना मात्र वंदन...
लक्ष्मण खेडकर