काल झोमॅटोच्या निमित्ताने हिंदू धर्माला ठोकण्याची एक चांगली संधी मिळालीय सर्वांना. डिलीव्हरी बॉय मुस्लीम असल्याने अमित शुक्ल नावाच्या कर्मठ हिंदूने जेवणाची डिलीव्हरी घ्यायला नकार दिला. आपण आपली ऑर्डर रद्द करत आहोत, आणि एका नॉन-हिंदू रायडर कडून डिलिव्हरी घ्यायला तुम्ही मला फोर्स करू शकत नाही असं ट्वीट अमित शुक्ल ने केलं आहे.
माझ्या ओळखीच्या हिंदूंपैकी असा हिंदू मला अभावानेच माहित आहे, अमित शुक्लच्या निमित्ताने अनेकांच्या आतला हिंदू ही जागृत झाला असेल. पण अशा हिंदूंची संख्या कमीच असावी. अशा हिंदूंनी जातव्यवस्थेची जोखडं डॉ. आंबेडकरांनी तोडण्याआधी देशात काय दहशत माजवली असेल याचा अंदाज मी बांधत होतो. डोक्यावर रूळणारी अदृश्य शेंडी देशात सतत अशा पद्धतीचा भेदभाव जागवत आलीय. कधी दलित तर कधी मुसलमान. कधी दगडांनी ठेचलं तर कधी अशा ट्वीट ने. अमित शुक्लचं ट्वीट ही केवळ भावना नाहीय, धर्माचं अतिप्रेम-आग्रह नाही, तर कायद्याने गुन्हा आहे. भारतीयत्वाच्या व्याख्येत अशा हिंदूंना थारा नाही.
झोमॅटोच्या निमित्ताने या देशातील अशा कर्मठ हिंदूंचा विद्रूप चेहरा समोर आलाय. हिंदुत्वाच्या नावाने भडकवणाऱ्या तमाम लोकांपासून चार हात लांब राहा असं आम्ही सतत सांगत असतो ते या मुळेच. या देशाला भारतीय बनवण्याची गरज आहे. भारतीयत्वाचा मार्ग हिंदुत्व किंवा इस्लाम मधून किंवा कुठल्याही धर्मामधून जात नाही. तो मानवतेचा विचार आहे. जात-धर्म-भाषा यांच्या प्युरिटीचा आग्रह का कर्मठपणाकडची वाटचाल आहे, असा विचार माणसाला अतिरेकी बनवतो.
अमित शुक्लने एका गरीब डिलीव्हरी बॉयकडून जेवण घ्यायला नकार दिला. असा विचार करणारा माणूस कशा टाइपचा हिंदू आहे हे पाहण्याची गरज आहे. अमित शुक्लचं ट्वीटरवरचं हँडल आहे. नमो सरकार या नावाने. कालच्या वादानंतर अमित शुक्लने ट्वीटर वरच अकाऊंट प्रायव्हेट केलं.