दारू पिण्याची तीव्र इच्छा होणे हाच आजार आहे : डॉ. रुपेश पाटकर

"डॉक्टर, काय सांगू तुम्हाला! ही दोन दिवस गायब होती. काल संध्याकाळी घरी आली. दोन दिवस ती कुठे होती, कुणासोबत होती हे काहीही ती सांगत नाहिये. एरवी देखील ती घरातून काही कामासाठी म्हणून बाजारात जाते आणि तीन चार तास परततच नाही. बाजार आमच्या पासून दोन तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे एवढा वेळ तिला का लागतो हे समजत नाही. विचारले तर काही सांगत नाही. कारण नसताना देखील बाजारात जाते. मी विचारले की भयंकर चिडते. तिला अलीकडे शांत झोप येत नसल्याचे ती म्हणतेय. तेच निमित्त सांगून तिला तुमच्याकडे आणलेय." वाचा मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या अनुभवातील मनाचा एक खेळ...

Update: 2023-01-08 08:32 GMT

या गोष्टीला आता दहा-बारा वर्षे झाली. आपल्या पंचवीस वर्षांच्या कन्येला घेऊन तिची आई माझ्या ओपीडीत आली होती. त्यांचा नंबर आल्यावर मुलीला घेऊन आत न येता रिसेप्शनीस्टला सांगून आई एकटीच आत आली. ती एकटीच आत आली हे पाहून तिच्या मुलीला 'भ्रम विकृती' असावी असा विचार माझ्या मनात आला. मुलीला आपण आजारी आहोत असे वाटत नसावे आणि म्हणून तिला कदाचित दुसरेच कारण सांगून माझ्याकडे आणले असावे. मुलीला आपण आजारी आहोत हे पटतच नसेल तर ती मी दिलेली औषधेदेखील घेणार नाही. त्यामुळे मला तिला ड्रॉप्स द्यावे लागतील जे तिची आई तिला जेवणात मिसळून देऊ शकेल आणि एकदा तिला आजाराबाबत इनसाइट आली ( म्हणजे आपल्याला आजार आहे आणि त्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे याची जाणीव झाली) की मग तिला गोळ्या देता येतील असे मी मनातल्या मनात ठरवू लागलो. मी असा विचार करतो, ना करतो इतक्यात बारीक आवाजात तिची आई म्हणाली, "डॉक्टर, काय सांगू तुम्हाला! ही दोन दिवस गायब होती. काल संध्याकाळी घरी आली. दोन दिवस ती कुठे होती, कुणासोबत होती हे काहीही ती सांगत नाहिये. एरवी देखील ती घरातून काही कामासाठी म्हणून बाजारात जाते आणि तीन चार तास परततच नाही. बाजार आमच्या पासून दोन तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे एवढा वेळ तिला का लागतो हे समजत नाही. विचारले तर काही सांगत नाही. कारण नसताना देखील बाजारात जाते. मी विचारले की भयंकर चिडते. तिला अलीकडे शांत झोप येत नसल्याचे ती म्हणतेय. तेच निमित्त सांगून तिला तुमच्याकडे आणलेय." तिच्या आईने असे सांगताच माझ्या मनात आले की ही एखाद्या 'सेक्स स्कँडल' मध्ये तर अडकली नसेल ना? कोणी तिला ब्लॅकमेल तर करत नसेल ना? वेश्याव्यवसायात तर नाही ना कोणी तिला ढकलले असेल? आणि असे असेल तर मग त्यात माझा रोल काय? मी असा विचार करत असताना ती आत आली.

"डॉक्टर, मला अलीकडे शांत झोप येत नाही. आधी मनात सतत विचार येत राहतात. पहाटे केव्हातरी झोप लागते. तीपण शांत नाही, काहीतरी वाईट स्वप्ने पडतात आणि जाग येते. शिवाय बहिणीला सकाळी कामावर जायचे असते, त्यामुळे ती पहाटे उठते. तिच्या आवाजामुळे मला जाग येते. सकाळी डोळे जड असतात, पण झोपायला गेले तर झोप लागत नाही."

"सध्या काही टेंशन आहे का?" मी असे विचारल्यावर तिने आईकडे पाहिले. मला जाणवले की तिला आईच्या पुढ्यात बोलायचे नाहिये. तिची आई बाहेर गेल्यावर ती म्हणाली, "डॉक्टर, मला कर्ज झालंय. माझीच त्यात चूक आहे. पण मी घरातल्यांना काहीच सांगू शकत नाही."

तिचा प्रश्न कर्जाचा असेल तर त्यात माझा काय रोल? कर्ज झालं आणि ते फेडता येत नसेल आणि ते घरातल्यांना सांगताही येत नसेल तर घुसमट होणं साहजिकच आहे.

ती पुढे म्हणाली, "जिने मला कर्ज दिलं होतं तिनेच मला दोन दिवस कोंडून ठेवल होतं. शेवटी गळ्यातील सोन्याची चेन तिला देऊन मी सुटका करून घेतली."

"मग झाला प्रकार घरातल्यांना सांगणं योग्य नाही का?" मी म्हणालो.

"कर्ज घराच्या गरजेसाठी घेतलं असतं तर सांगितलं असतं. मी आकडा लावते," अपराधी चेहर्‍याने तिने मान खाली घातली.

थोडे थांबून ती पुढे म्हणाली, "मला माहीत आहे, आकडा लावणे चूक आहे. पण मला कळतच नाही. मला पुन्हा पुन्हा आकडा लावावासा वाटतो." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

"याला पॅथाॅलाॅजिकल गॅबलींग म्हणतात. हा एक आजार आहे!" मी म्हणालो. मी आजार असे म्हटल्यावर तिला थोडे हायसे वाटले.

ती म्हणाली, "तुम्ही हे माझ्या आईला समजवाल का?"

तिच्या आईसाठी हे नवीनच होते. पण तिने ते समजून घेतले. ती म्हणाली देखील की "लाॅटरीचे एखादे तिकीट काढणे आम्ही सुद्धा करतो. अनेकांना जुगाराचे व्यसन असते, हे देखील ऐकलेय. पण असे व्यसन असणे हा आजार आहे मात्र माहीत नव्हते."

खरे म्हणजे आपल्या इच्छा नियंत्रणात नसणे हे आजारी असण्याचे चिन्ह आहे, हेच आपल्याला माहीत नसते. आपल्याला वाटते की हे इच्छाशक्ती न वापरल्यामुळे होते. त्यात त्या व्यक्तीचा दोष आहे, तो गुन्हेगार आहे असे वाटते. मी हे प्रामाणिकपणे काबूल करेन की मी एमबीबीएस झालो तरी मलाही असेच वाटत होते.

इंटर्नशिपच्या काळातला एक किस्सा सांगतो. सर्जरी विभागातील पोस्टिंग संपवून मी सायकीयॅट्री विभागाला जाॅइन झालो होतो. तिथे जाॅइन झाल्यानंतरचा दुसरा दिवस होता. मी त्या आधी मेडिसिन आणि सर्जरी विभागात काम केल्यामुळे मला पेशन्ट तपासायचा काॅन्फीडंस आला होता. त्यामुळे मी पहील्या दिवसापासून ओपीडीत पेशन्ट पाहू लागलो. दुसर्‍याच दिवशी माझ्याकडे एक नवा पेशन्ट देण्यात आला. तो म्हणाला, "पित्त झाले आहे. गळ्याकडे जळजळ होते. भूक पण कमी झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. गावठी औषध घेतले. आता बरे वाटतेय." मी त्याला आणखी काही प्रश्न विचारले. त्याची शारीरिक तपासणी केली. त्याच्या लिव्हरला सूज आल्याचे जाणवत होते. तपासात असताना मी त्याला 'दारू पितोस का?' विचारले. 'हो. पण जास्त नाही,' तो म्हणाला. मी रजिस्ट्रारला (रजिस्ट्रार म्हणजे शिकवू पण अनुभवाने वरीष्ठ डॉक्टर) केस दाखवत म्हणालो की गॅस्ट्रायटीस (आम्लपित्त) आणि लिव्हर सिराॅसीस आहे. रजिस्ट्रार हसला आणि म्हणाला, "अजून सर्जरी विभागातच अडकलायस काय? हा सायकीयॅट्री विभाग आहे. त्याला गॅस्ट्रायटीस आणि लिव्हर सिराॅसीस असेल हे मान्य, पण मुळात त्याचा आजार काय?"

मी गप्प राहिलो. मला काय सांगावे ते कळेना. माझी अडचण समजून तो म्हणाला, "त्याचा मूळ आजार आहे, अल्कोहोल डिपेंडन्स सिंड्रोम! दारू पिण्याची अनियंत्रित इच्छा होणे हा त्याचा मूळ आजार आहे. तू त्याच्या गॅस्ट्रायटीस आणि लिव्हर प्राॅब्लेमवर उपचार करशील. पण जर तू त्याला दारूच्या अनियंत्रित इच्छेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार नाही केलेस तर तो काही दिवसानी पुन्हा गॅस्ट्रायटीस घेऊन येणार. कदाचित अल्सर घेऊन येईल."

'दारू पिण्याची तीव्र इच्छा होणे हाच आजार आहे' हे त्या दिवशी मला पहिल्यांदा स्पष्टपणे कळले. मग एकदम साक्षात्कार व्हावा तसे माझ्या मनात आले की आजपर्यंत आपण अनियंत्रित दारू पिण्याबद्दल पेशंटलाच दोष देत होतो. आणि 'दारू पिऊ नको' असा एका वाक्याचा उपदेश करून पेशन्ट त्यातून बाहेर पडण्याची अवास्तव अपेक्षा करत होतो. रजिस्ट्रारने मला 'अल्कोहोल डिपेंडन्स सिंड्रोम'वरचे उपाय समजावून सांगितले. सुरवातीला सतत दारू प्यायल्यामुळे पेशंटला दारूशिवाय राहता येत नाही. दारू थांबवली की थरथर वाटते, झोप येत नाही, अस्वस्थ वाटते. कधीकधी फिट येते किंवा वात होतो (ज्यात त्याला भास होतात, तो असंबद्ध बोलतो). याला विथड्राॅवल अवस्था म्हणतात. हा त्रास होऊ नये किंवा झाला तरी कमी व्हावा म्हणून उपचार केले जातात. त्या उपचारांना 'डिटाॅक्सिफीकेशन' म्हणतात. एकदा पेशन्ट विथड्राॅवल अवस्थेतून बाहेर आला की त्याला दारू पिण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार करावे लागतात. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी पेशन्टनेच नव्हे तर त्याच्या नातेवाईकांनी देखील धीर धरणे आवश्यक असते.

"या प्रक्रियेत पेशन्ट अनेकदा घसरतो, पण घसरणे आणि ये रे माझ्या मागल्या होणे वारोवार घडते हे उपचार करणार्‍या डॉक्टरने देखील लक्षात ठेवायला हवे आणि पेशन्टवर न वैतागता उपचार करायला हवेत," रजिस्ट्रार मिश्किलपणे हसत म्हणाला.

माणसाना वाकवणारे अनियंत्रित इच्छेचे आजार जुगार, दारू वगैरे व्यसनापुरते मर्यादित आहेत असेही नाही. काही आजार अकल्पनीय आहेत. पायरोमॅनिया नावाचा एक आजार आहे, ज्यात पेशंटला आग लावण्याची अनियंत्रित इच्छा होते. क्लिप्टोमॅनिया नावाचा एक आजार आहे ज्यात गरज नसताना चोरी करण्याची तीव्र इच्छा होते.

माझा अंदाज चुकीचा ठरवणारी आणखी एक केस गेल्या वर्षी आमच्या ओपीडीत आली. त्या बाईना कोणीतरी आमच्या ओपीडीला रिफर केले होते. अलीकडे सतत ताण जाणवतो अशी त्यांची तक्रार होती. कशातच मन लागत नाही, फार उदास वाटते असे त्या म्हणाल्या. या लक्षणांवरून त्यांना डिप्रेशनचा आजार आहे असा विचार माझ्या मनात येत नाही तोच त्यांनी आपल्या टेंशनचे कारण नवर्‍यासोबत वारंवार होणारे वाद असल्याचे सांगितले. पण वादाचे नेमके कारण त्या बोलल्या नाहीत. मी त्यांना रिलॅक्स होण्याचा व्यायाम सुचवून पुढच्या फाॅलोअपला नवर्‍याला सोबत आणायला सांगितले. फाॅलोअपमध्ये सुसंवाद, एकमेकांच्या गुणदोषांचा स्विकार यावर दोघांशी चर्चा करावी लागणार असे मी मनात ठरवले.

आठवड्यानंतर त्या आपल्या नवर्‍याला घेऊन आल्या. मी दोघांशी स्वतंत्रपणे बोललो. नवर्‍याशी बोलताना अनपेक्षित गोष्ट कळली. जुजबी बोलल्यावर त्याने खाली मान घातली. त्याला काही सांगायचे होते, पण त्याला ते व्यक्त करणे कठीण जात असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या मनात विचार आला की संशयाचे किंवा विवाहबाह्य संबंधाचे हे प्रकरण असेल.

मी शांत राहून त्याला सावरायला वेळ दिला. काही क्षणांनी तो म्हणाला, "आमचे लग्न होऊन एक वर्ष झाले तरी आमचा लैंगिक संबंध घडला नाही. यात दोष माझाच आहे. मला तिच्या विषयी आकर्षण वाटतच नाही. "

मला वाटले की त्याला समलैंगिकता असावी. मी त्याच्याशी सेक्शुअल ओरीएंटेशन, जेंडर आयडेंटीटी याबाबत बोललो. सेक्शुअल ओरीएंटेशन म्हणजे व्यक्तीला कोणा विषयी आकर्षण वाटते. विरुद्धलिंगी व्यक्तीशी आकर्षण वाटते की समलिंगी व्यक्तीशी की दोघांशीही वाटते हे विचारात घेणे. जेंडर आयडेंटीटी म्हणजे व्यक्ती स्वतःला कोण समजते. साधारणपणे शारीरिक लिंग पुरुषाचे असलेली व्यक्ती म्हणजे जिला शीश्न (पेनीस) आणि अंडाशय (स्क्राॅटम) असलेली व्यक्ती, स्वतःला पुरुष समजते आणि शारीरिक लिंग स्त्रीचे असलेली व्यक्ती म्हणजे योनीमार्ग (व्हजायना) असलेली व्यक्ती स्वतःला स्त्री समजते. पण क्वचित हे उलट देखील असू शकते. म्हणजे शरीर पुरुषाचे असते पण व्यक्ती स्वतःला स्त्री समजते. आपल्याला चुकीचे शरीर असल्याची भावना तिला वाटत राहते.

त्यावर तो म्हणाला, "मला यापैकी काही नाही वाटत. मी अजूनपर्यंत काहीही चूक केलेली नाही. मी कोणाला त्रास दिलेला नाही. पण मला लैंगिक आकर्षण छोट्या मुलांविषयी वाटते." त्याला पिडोफीलीया होता.

हा मी पाहिलेला पिडोफीलीयाचा पहिला पेशन्ट नव्हता. या अगोदर मी जे पिडोफीलीक व्यक्ती पाहिले होते, त्यांना पोलीस घेऊन आले होते. त्यांनी मुलांशी लैंगिक संबंध ठेवण्याचा गुन्हा केला होता. पिडोफीलीक असणे ही डिसॉर्डर आहे. पण जोपर्यंत व्यक्ती त्याप्रमाणे कृती करत नसेल तोपर्यंत तो गुन्हा नाही. पण व्यक्तीने तशी कृती केली तर तो गुन्हा असतो.

तुमची लैंगिकता कोणतीही असू द्या, जोपर्यंत तुम्ही दुसर्‍याला त्रास देत नाही, तोपर्यंत तुम्ही गुन्हेगार नाही. पिडोफीलीयाच्या बाबतीत हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की व्यक्ती ज्या अल्पवयीन मुलाशी किंवा मुलीशी लैंगिक संबंध ठेऊ पहाते, ते मूल लैंगिक संबंधासाठी राजी असले तरी तो गुन्हा आहे. ते त्या मुलाचे शोषण आहे. त्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर भविष्यात वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मी शेवटी हे अधोरेखित करू इच्छितो की व्यक्ती लैंगिकदृष्ट्या नॉर्मल असली तरी जर ती दुसर्‍या व्यक्तीशी जबरदस्तीने किंवा फसवून संबंध ठेवत असली, दुसर्‍या व्यक्तीच्या असहाय्यतेचा फायदा उठवत संबंध ठेवत असली तरी तो निःसंदिग्ध गुन्हा आहे. आजच्या जगात जिथे सूड घेणे हीच सामाजिक नीती ठरवली जात आहे, तिथे हे निरपवादपणे सांगायची गरज आहे की कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार हा मानवतेच्या विरोधातील गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याचे उदात्तीकरण करणारे देखील मनाने तितकेच विकृत बनले आहेत.

......

डॉ. रुपेश पाटकर

Tags:    

Similar News