दलितांसाठी कुणी ठेवलेली अस्पृश्यतेची ‘राखीव जागा’

सरकारचे जावई, फुकटे अशी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नव बौध्द समाजाची सतत हेटाळणी केली जाते. पण दलितांना हजारो वर्षे अस्पृश्यतेची राखीव जागा कुणी दिली ? वाचा आरक्षणाच्या फलिताचे विश्लेषण करणारा अशोक कांबळे यांचा महत्त्वपूर्ण लेख…;

Update: 2023-09-09 08:53 GMT

आज आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. सरकारचे जावई, फुकटे अशी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नव बौध्द समाजाची सतत हेटाळणी केली जाते. आरक्षण मिळण्याच्या पुर्वी शेकडो वर्षे हा समुदाय आरक्षित असलेल्या अस्पृश्यतेचे चटके सहन करत होता. अस्पुष्यतेच्या मरण यातना या समाजाने सोसल्या याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. त्यांना सर्वच मानवी हक्कांपासून वंचित ठेवले होते. त्यांच्यावर अघोषित आणीबाणी लादली होती. कित्येक पिढ्यांनी अज्ञान,अंधकाराच्या खाईत आपले आयुष्य खर्ची घातले. वर्ण व्यवस्थेतील सर्वात शेवटचा घटक हा दलित समाज होता. या समाजाला माणूस म्हणून असलेला नैसर्गिक अधिकार येथील व्यवस्थेने नाकारला होता. पशूंना खायला घातले जात होते पण माणूस असूनही अस्पृश्य लोकांना सन्मानाने वागवले जात नव्हते. त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले जात नव्हते. शाळेत वर्गाच्या बाहेर बसवले जायचे. त्यांना कोणी शिवून घेत नव्हते. त्यांच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा. पेशवाईच्या काळात तर या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करण्यात आले. याचा काळात अस्पृश्य लोकांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधले. याचे कारण म्हणजे यांच्या पाऊल खुणाचा देखील विटाळ मानला जायचा. अस्पृश्य लोकांना थुंकण्यास सुद्धा बंदी होती. त्यामुळेच यांच्या गळ्यात मडके बांधले होते. इतका प्रचंड छळ येथील समाज व्यवस्थेने अस्पृश्य लोकांचा केला होता. या समाजाने महारकी केली. गाव राखण्याचे काम केले. गावातील कोणी माणूस मेला तर त्याच्या पाहुण्याला मृत्यूचा निरोप देण्यासाठी या महार समाजातील व्यक्तीला चालत पाठवले जायचे. तोही जंगल झाडी पार करत जात असे. हाच महार समाज एके काळी गावात मेलीली जनावरे ओढून टाक्याचा. मेलेल्या जनावरांचे मांस खायचा. अस्पृश्य समाजाला माणूस असून ही उच्च वर्णीय त्यांच्या पंक्तीला जेवायला बसू देत नव्हते. अस्पृश्य लोकांच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसायचे. महिला आणि पुरुष फाटकी कपडे ठिगळे लावून घालात. याच महार समाजाने जीवन जगत असताना प्रचंड जीवन यातना सोसल्या. त्यांच्या वाट्याला पशू पेक्षाही हिन जीवन आले. याचा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात 14 एप्रिल 1891 साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांच्या अगोदर मानव मुक्तीचा लढा महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरू केला होता. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी अस्पृश्य उद्धाराचे कार्य केले. यांच्या ही पुढे जावून अस्पृश्य बांधवांचे दुःख समजून घेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात अस्पृश्याना 1902 साली आरक्षण दिले. त्यांनी अस्पृश्य बांधवांना उद्योगधंद्यात देखील मदत केली. छत्रपती शाहू महाराज एका अस्पृश्य बांधवांच्या हॉटेलात चहा प्यायला जात होते. हजारो वर्षे अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी मायेची ऊब दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी देखील मदत केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात छत्रपती शाहू महाराज यांचे विशेष असे स्थान आहे. याच आरक्षणाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिले. आज त्याची फळे गोड आलेली दिसतात. एकेकाळी ज्या व्यक्तीचा विटाळ केला जायचा तो व्यक्ती डॉ.बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे प्रगतीच्या शिखरावर पोहचला आहे.

बौध्द समाजाने स्वीकारला विज्ञानवाद

पूर्वाश्रमीच्या महार समाजाला देवळात देखील जायला बंदी होती. घोड्यावरून नवरदेवाची मिरवणूक काढणे बंदी होती. मनुस्मृतीने अस्पृश्य लोकांवर कडक बंधने घातली होती. त्यांना धन संचय करण्यास बंदी होती. मेलेल्या मयतावरील कपडे घालण्याचा अधिकार दिला होता. सोन्याचे दागिने घालण्यास बंदी होती. धन संचय करण्यास बंदी होती. मनुस्मृतीने अस्पृश्य समाजाच्या प्रगतीच्या वाटा बंद केल्या होत्या. परंतु या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीच्या वाटा संविधानाच्या माध्यमातून खुल्या केल्या. त्यांच्यात नव चेतना जागवली. अस्पृश्यांना येथील धर्म तुच्छ लेखात असल्याने त्यांनी विज्ञानवादी बौध्द धर्माची दीक्षा घेवून या अस्पृश्य बांधवांना विज्ञानवादी बौध्द धम्माच्या ओटीत टाकले. तेंव्हापासून पूर्वाश्रमीच्या महार समाज आज बुध्दा च्या विचाराने मार्गक्रमन करत आहे. या समाजाने विज्ञानवादी बौध्द धम्म स्वीकारल्याने त्यांची प्रगती दिसत आहे. जे आरक्षणावर टीका करतात त्यांना मात्र दलित समाजाचे हजारो वर्षाचे जीवन दिसत नाही. आज या समाजातील लोक आरक्षणामुळे शिकले. परदेशात देखील स्थायिक झाले आहेत. आरक्षणामुळे गेल्या सतर वर्षात दलित समाजाची प्रगती झाली आहे. त्यामुळे आरक्षणावर जातीय मानसिकतेतून अनेकदा टीका केली जाते. आरक्षणा विषयी विविध अफवा पसरवल्या जातात. दलित समाजाच्या प्रगतीचे दाखले दिले जातात. पण त्यांचा संघर्ष सांगितला जात नाही. त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे. आजही त्यांची झालेली प्रगती जातीयवादी लोकांना खुपते. त्या भावनेतूनच त्यांच्यावर हल्ले केले जातात आहेत. आजही अनेक दलित कुटुंबे न्यायापासून,अधिकारापासून वंचित आहेत. पण हाही काळ काही वर्षात बदलेल असे वाटते.




 


ओबीसी आरक्षणात दलित नेत्यांची महत्वाची भूमिका

नव्वदच्या दशकात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देशात पेटला होता. त्यावरून जातीयवादी शक्तिनी जोरदार विरोध देखील केला होता. या आंदोलनात दलित नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये प्रकाश आंबेडकर,रामदास आठवले आणि इतर दलित नेते आघाडीवर होते. दलित नेत्यांची भूमिका नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिली आहे. सर्व समाजाला आरक्षण मिळावे अशीच भूमिका दलित नेते नेहमी घेत आले आहेत. समाजातील प्रत्येक समाजात शोषित वंचित घटक आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे. आरक्षण म्हणजे त्या - त्या वर्गाचे प्रतिनिधित्व होय. तो गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. मग दलित समाजातील अनेक शिक्षित कुटुंबे आरक्षणाचा लाभ घेत असतील तर त्यांच्यावर टीका होते. ही टीका जाणून बुजून केली जाते. परंतु टीका करणाऱ्यांना माहीत असते की,ही व्यक्ती त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करीत आहे. दलित समाजाने नेहमीच आरक्षणाच्या बाबतीत रस्त्यावरची लढाई लढली आहे. धनगर आरक्षण,मराठा आरक्षण यांच्या बाजूने भूमिका मांडली आहे. आरक्षणाच्या बाबतीत दलित समाजाची भूमिका महत्वाची राहिली आहे.

भारतात सर्व जातीच्या लोकांना आरक्षण पाहिजे

भारतात आजच्या परिस्थितीमध्ये सर्व जातीच्या लोकांना आरक्षण पाहिजे. त्यासाठी त्या-त्या जातीच्या संघटना आंबेडकरी समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय जागृतीचे उदाहरण देतात. त्या समाजाची आर्थिक परिस्थिती केवळ आरक्षणामुळे आहे,असे ते सांगतात, पण त्यांनी देव,धर्म,अज्ञान अंधश्रद्धा समुद्रात विसर्जित केले हे लक्षात घेतले जात नाही. आंबेडकरी समाजाचे किती टक्के लोक आरक्षणाचे लाभधारक आहेत यांच्या तपशिलात ते मात्र जात नाहीत. आरक्षणाच्या लढाईत त्यांचे किती मोठे योगदान आहे हे ते पाहत नाही. देशात आरक्षण म्हटलं की, केवळ त्यांच्या नजरे समोर फक्त आंबेडकरी विचारांचा समाज अनुयायीच दिसतात, म्हणजे बौध्द समाज !

आरक्षणाच्या बाबतीत केला जातीय अपप्रचार

देशात जेवढे भ्रष्टाचार झाले त्यात गुणवत्ताधारी विचारवंतानो सांगा एकतरी आरक्षणवाला आहे काय? सरकारी रुग्णालयात रुग्ण दगावले की उपचार करणारे डॉक्टर हे आरक्षणातून आले आहेत,असे सांगून तोडफोड केली जाते. तेच देशात कुठेही रोडवरील पुल, रेल्वे ब्रिज, धरण किंवा इमारतीचे अपघात झाले की त्या बांधकामाचे इंजिनिअर हे आरक्षणवाले होते आणि आरक्षण हे कसं घातक आहे हे दाखवण्यासाठी निरनिराळी तथाकथित उदाहरणे दिली जातात. पण त्या इंजिनिअरची किंवा डॉक्टरची नावे जाहीर केली जात नाहीत. एखादा अपवाद असेलही पण सरसकट आरक्षणाला बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार नेहमीच होत असतो. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही.

देशात प्रत्येक गोष्ट जातीच्या चष्म्यातून पाहिली जाते

गुणवत्ताधारी विचारवंत आज कुठे गेले ते आरक्षणामुळे राजहंस मागे पडले व कावळे समोर गेले म्हणणारे तत्वज्ञानी? भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले. पण आदर्श निर्माण करून गेले. ब्रिटीश लोकांचे त्यांनी शेकडो वर्षे पुर्वी बांधलेल्या इमारती पहा कशा ताठ मानेने उभ्या आहेत. कारण त्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व होते. आपल्या देशात प्रत्येक गोष्ट ही जातीच्या चष्म्यातून पाहिली जाते आणि म्हणूनच मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या लक्षवेधी असूनही ते गुलाम म्हणून जगतात. खरच आपल्यात गुणवत्ता असती तर आपण एक हजार वर्षे परकीयाचे गुलाम बनलो असतो काय? गुणवत्ताधारी विचारवंतानो त्याला आरक्षणवाले तर जबाबदार नाहीत ना? गुणवत्ताधारी विचारवंतानो,पुल ब्रिज,धरण,गगनचुंबी इमारती बांधण्याचं कवडीचंही तंत्रज्ञान माहीत नसल्याने पावसाळ्यात मोहिमा बंद ठेवणार्‍या व समुद्र ओलांडला म्हणून जलदेवतेचा कोप होतो असले सिद्धांत सांगणार्‍या लोकांचे आपण मानसिक गुलाम आहोत. त्यांनी आरक्षण मागू नये आणि त्यासाठी जनआंदोलन करू नये. आरक्षण हे फक्त मागासवर्गीया (एससी) साठी आहे म्हणजेच फक्त बौद्धांसाठी आहे हा खोटा प्रचार केला असे लिहले तर चुकीचे असणार नाही.




 


भारतीय लोकशाहीने सर्व समाजाला संविधानिक अधिकार दिले

भारतीय लोकशाहीने सर्व समाजाला संविधानिक अधिकार दिले आहेत. ते घेण्याची पात्रता त्या समाजात असली पाहिजे त्या समाजातील एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला सर्वश्रेष्ठ पद दिले म्हणजे सर्व समाजाचा सर्वांगीण विकास होईल हे गणित मांडणे चुकीचे ठरेल आहे. ते सर्वच समाजाला लागू आहे. आजपर्यंत देशाचे राष्ट्रपती पद मागासवर्गीय,अल्पसंख्याक आणि महिलांना समाजातील प्रतिनिधित्व म्हणूनच दिले गेले पण त्यामुळे कोणता ठोस बदल झाला. हे कोणी कोणाला सांगू लिहू शकत नाही. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या उच्चशिक्षित मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधीने जिथे बोट ठेवले त्यांचा ऐतिहासिक इतिहास बदलून टाकला.

Tags:    

Similar News