A Promised Land: बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्या बाबत काय म्हटलंय? वाचा संपुर्ण मराठी अनुवाद...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे A Promised Land हे पुस्तक सध्या भारतात चांगलंच गाजतं आहे. मात्र, खरंच राहुल गांधी यांच्याबाबत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल या पुस्तकात नक्की काय म्हटलं आहे? वाचा प्रतीक पाटील यांनी केलेला मराठी अनुवाद...;

Update: 2020-11-17 05:22 GMT

मेजवानी दरम्यान सोनियांजीं बद्दलचं एक निरिक्षण म्हणजे त्यांचा बोलण्याऐवजी ऐकण्यावर अधिक भर होता. धोरणात्मक गोष्टींमध्ये मनमोहन सिंहापासुन फारकत घेत त्या अधुन मधुन संभाषण त्यांच्या मुलाकडे नेत होत्या. त्या सगळ्यामधुन मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची ताकद ही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा आविष्कार होती.

आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला. तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच मधून मधून माझ्या 2008 च्या प्रचार यंत्रणेच्या तपशिलांबद्दही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला. म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.

डॉ. मनमोहन सिंहांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. निरोप घेण्याची वेळ आली. असं मी मिशेलला खुणवलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडवायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता.

त्यांच्या आईने निगुतीने जोपासलेला, भाजप च्या द्वेषामूलक आणि दुफळी माजवणाऱ्या राष्ट्रवादाला न जुमानता कॉंग्रेस पक्षाला मिळवून दिलेल्या यशाचा आणि भविष्याच्या रोखाने आखलेला वारसा यशस्वीपणे राहुल कडे सोपवला जाईल का??

मी साशंक होतो. मनमोहनसिंहांची अजिबात चूक नव्हती. त्यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली होती. शितयुध्दोत्तर काळातील उदारमतवादी लोकशाही देशांप्रमाणे, संविधानिक मुल्यांचा मान राखत आणि विहीत जबाबदार्या पार पाडत असताना उच्चांकी जीडीपी गाठत, सामाजिक सुरक्षेचं मजबूत जाळं विणत त्यांनी विकास साधला.

भारत किंवा अमेरिकेसारख्या सारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुधर्मीय देशांमधील लोकशाही व्यवस्थेत ही विकासाची परमावधी असावी. असं माझ्या प्रमाणे त्यांचं देखील मत होतं. अतिधाडसी क्रांतिकारक पावलं किंवा सरसकट सांस्कृतिक बदल, किंवा सगळ्याच सामाजिक विकृतींवर उपाय शोधत बसणं, आयुष्याला शाश्वत अर्थ शोधणाऱ्यांचं समाधान पाहत बसण्यापेक्षाही संयमीपणे संवैधानिक नियमांचं पालन करणे, सहिष्णुता जोपासणे आणि लोकांचा राहणीमान उंचावण्यासाठी, उत्तम शिक्षण सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे. हेच समग्र मानवतेचे मापदंड उंचावण्यासाठी अधिक परिणामकारक ठरेल.

- बराक ओबामा

अनुवाद -Pratik Shivajirao Patil

Tags:    

Similar News