राष्ट्रवादाची व्यर्थता !
मुळात विशिष्ट विचारसरणीचे राष्ट्र असले तर देशाचे अपार हित होईल व मानवी जीवन सुखमय, कल्याणकारी होईल असे दावे केले जातात. पण जगभरातील काही राष्ट्रांचा इतिहास पाहिला तर काय वास्तव दिसते, याचे विश्लेषण केले आहे संजय सोनवणी यांनी....
राष्ट्रवाद लोकांचे पोट भरू शकत नाही आणि नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षितही ठेवू शकत नाही. राष्ट्राराष्ट्रात आपापल्या राष्ट्रांवर तेवढेच प्रेम असणारे आपसात तेवढेच प्रेम करु शकत नाहीत. सांस्कृतिक, भाषिक, वांशिक, धार्मिक (भारतासारख्या देशात जातीयही) संघर्ष थांबत नाहीत. गुन्हेगारी, दहशतवादा घटना थांबत नाहीत. राष्ट्रा-राष्ट्रांतील (विशेषत: शेजारी राष्ट्रांशी) कसलाच संघर्ष नाही असे राष्ट्र सापडणे अवघड आहे. समाजात राहतांना सामान्य प्रतीची माणसे जसा न्यूनगंड जपतात तसा न्यूनगंड छोट्या अथवा दुर्बल राष्ट्रांतही जपला जातोच, असे असूनही राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रासाठी सर्वस्वाचा, प्रसंगी प्राणांचाही त्याग या राष्ट्रवादी मुलतत्वांचा प्रत्येक नागरिकावर मारा होतच असतो. असाच तात्विक मारा धर्मवादी लोक आपापल्या अनुयायांवर करत असतात. अनेकदा धर्म आणि राष्ट्र या दोन भावनांत द्वंद्व उभे ठाकल्याचे दिसते. आर्थिक प्रेरणा, परस्पर शांततामय सहजीवनाच्या प्रेरणांवर या प्रेरणा मात करत असल्याचे आपल्याला अनेक राष्ट्रांतर्गतच्या विध्वंसक व हिंसक घटनांमधून दिसते.
हे संघर्ष अधिकच उग्र होतात अथवा बनवले जातात ते कोणाची वा कोणत्या राजकीय विचारसरणीची सत्ता असावी या प्रश्नाबाबत. जगात सत्तांतरे होतच असतात. अनेक सत्तांतरे रक्तरंजित असल्याचेही आपण पाहतो. सत्तांतरे शांततामय आहेत म्हणून कौतूक करुन घेण्याचे कारण नाही कारण दोन विचारसरण्यांतील संघर्ष सामजिक जीवनाला "एकमय" करत नसून अधिक विखंडने करत जातो. जेवढ्या राजकीय विचारसरण्या तेवढी राष्ट्रे एका राष्ट्रात नांदत असतात असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अन्य विचारसरण्यांना सत्तेच्या बळावर दडपायचे सौम्य अथवा उग्र कार्य कसे पार पाडले जाते. या दोन्हीचा अनुभव भारताने घेतला आहेच. जगाचा अनुभव वेगळा नाही.
मुळात विशिष्ट विचारसरणीचे राष्ट्र असले तर देशाचे अपार हित होईल व मानवी जीवन सुखमय, कल्याणकारी होईल असे दावे राष्ट्रांच्या इतिहासाने पोकळ ठरवले आहेत. साम्यवादी विचारसरणीची कित्त्येक राष्ट्रे कोसळलेली आपण पाहिली आहेत. लोकशाहीवादी म्हणवणारी राष्ट्रे अथवा त्या देशातील काही किंवा बव्हंशी नागरिक हुकुमशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भलामण करतांना आपण, अगदी भारतीय संदर्भातही, पाहिले आहेत. त्यामुळे वरकरणी राष्ट्रे जी राजकीय व्यवस्था अवलंबतात त्या राष्ट्रातील नागरिक त्या व्यवस्थेचे सर्वस्वी समर्थक असतातच असे नाही. मानवी स्वातंत्र्याची कल्पना मान्य केली तरी ते स्वातंत्र्य माणसासाठी, व म्हणून समष्टीसाठी हितकारक ठरतेच असे नाही. तसे झाल्याचे चित्र आजही नाही.
मग या सा-यात राष्ट्राचे स्थान काय असते?
राष्ट्र म्हणजे विशिष्ट कायदा, विशिष्ट शासनपद्धती, प्रशासनपद्धती, अर्थव्यवस्था (तीही बदलती) असलेला आणि संरक्षण व्यवस्थेने संरक्षित केलेला एक भौगोलिक तुकडा एवढेच राष्ट्र या संकल्पनेचे प्रत्यक्ष वास्तव स्थान राहते. बाकी इतर सा-या कृत्रीमरित्या जोपासल्या गेलेल्या, जोपासायला भाग पाडल्या गेलेल्या भावना होत.
मनुष्य आदिम होता तेंव्हा जगण्यासाठी, सुरक्षित राहत वंशविस्तार करण्यासाठी टोळीची, राज्यांची आणि नंतर राष्ट्रांची व व्यवस्थेची गरज भासली. त्यात वावगे काहीएक नव्हते. मानव कसा प्रगल्भ होत गेला याचीच ती चिन्हे आहेत. पण जगण्याची कांक्षा ही मानवी मनाची, स्वभावाची, प्रेरणांची मूलकारण आहे आणि त्यात बदल झालेला नाही. होणार नाहे आणि होऊही नये...पण या सा-यात जगण्याचेही मोल काय राहते?
जगण्याचे मोल देवुनही मनुष्य अनेकदा किमान भावी पिढ्यांसाठी का होईना प्राणांचा त्याग करत राहिला आहे...कधी योग्य तर कधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने.
माणसासाठी व्यवस्था येते हे खरे आहे पण ज्याच्यासाठी म्हणून व्यवस्था येते तो माणुसच व्यवस्थेचा अपरिहार्य बळी होत जातो, हे आपण दैनंदिन जीवनातही अनुभवत असतो. अमुकच व्यवस्था चांगली हे ठरवायचे खरे तर कोणतेच निकष नाहीत. शेवटी व्यवस्था राबवणारेच व्यवस्थेचे मूल्य निर्धारित करत असतात आणि ती चांगलीच वाटावी यासाठी मानसशास्त्रीय प्रयोग करत असतात. "चांगले शासन" काय असते हे कोण ठरवते? जगभरातील लोकशाही, राजेशाही आणि हुकूमशाही पाहिल्या तर तेच (सत्ताधारी) चांगल्या शासनाच्या व्याख्या लादत व पटवत सत्तेवर आलेले दिसतात.
लोकांना "पटते" म्हणजे नेमके काय?
पटते की पटायला भाग पाडले जाते? मनापासून पटले तर नेमके "मनापासून" म्हणजे काय? हे मनच जर "कंडीशन्ड" केले गेले असेल तर त्या पटण्याला तरी नेमका कोणता अर्थ राहतो? त्यामुळे "मनापासून पटले" हा शब्द एखाद्या दहशतवाद्याला उच्चारणे शोभेल तसेच साळसूद नागरिकांनाही शोभेल. मग हे मनापासून पटलेलेच नंतर कोठे जाते? स्टॅलिनला सर्वेसर्वा मानत भक्ती करणारेच जेंव्हा त्याचाच पुतळा उखडून फेकतात, सद्दाम हुसेनचाही पुतळा उखडला जातो, यातच मानवाचे पटणे हे किती तात्कालिक आणि भावनिक ख-या-खोटया लाटांवर हिंदकळणारे अथवा वाहून जाणारे असते यासारख्या घटनांवरून दिसते.
पुन्हा प्रश्न. मग यात राष्ट्रवाद कोठे राहतो?
राष्ट्राचे म्हणून जे भावनिक स्थान असते ते कोठे जाते? परकीय आक्रमणांना आपल्याच देशातील राष्ट्रप्रेमी म्हणवणारे बंडखोर वाट करून देतात अशा घटना जर घडत असतील, सत्ता पालटांसाठी परकीय सत्तांची मदत घेत असतील तर त्याला राजकीय मुत्सद्दीपणाच्या भोंगळ व्याख्येत टाकता येत नाही. मुळात राष्ट्रवादच तकलादू आहे एवढेच काय ते अशा घटनांपासून सिद्ध होते.
आणि तरीही राष्ट्रवादाची मोहिनी लोकांवर असते याचे कारण काल्पनिक अथवा प्रत्यक्ष भयांवरचा उतारा म्हणून राष्ट्रवाद कामाला येतो. आणि म्हणूनच तो लोकांना हवासाही वाटतो. त्यासाठी ते प्रसंगी आर्थिक, शारिरीक आणि पारिवारिक यातना सहन करायला तयार होतात. गंमत म्हणजे धर्मवादही अशाच अवस्थांतून जात असतो.
राष्ट्र सुरक्षा देते, कायद्याचे (प्रसंगी चुकीचे असले तरी) राज्य देते, स्थिर (अनेकदा अस्थिर असली तरी) अर्थव्यवस्था देते, भवितव्याचे (खोटे भ्रमित असले तरी) आमिष दाखवते, जगात आपले राष्ट्र, आपली संस्कृती व परंपरा कशा महान आहेत हे (खोट्या असल्या तरी) गायची संधी देते, आणि महत्वाचे म्हणजे राष्ट्रासाठी त्याग, प्रसंगी प्राणत्यागही करण्याची प्रेरणा देते.
आणि हे लोकांना हवेच असते असे नाही. परक्यांचे राज्य नाही...आमच्याच लोकांचे आहे ही टोळीभावना कथित "स्वातंत्र्य" जपण्यासाठी स्वकीयांची गुलामगिरी सहज स्वीकारत असते...प्रसंगी त्याहीविरुद्ध बंड करत असते. म्हणजे मानवी प्रेरणाच मुळात अस्थिर आहेत असे म्हणता येईल. त्यांना वास्तवाचा स्पर्श कधीच नसतो असेही उग्रवादी विधान करता येईल.
पण त्याची मुळे ही आपल्याच जागतिक व्यवस्थेत दडलेली आहेत याचा आपण कधी विचार करणार?
मुळात राष्ट्रवाद हवा आहे कारण इतर राष्ट्रांचे सह-अस्तित्व आहे म्हणून. नसते तर त्याची कोणतीही गरज अथवा महत्ता अथवा अपरिहार्यता नसती. तिसरे-चवथे महायुद्ध करत संपुर्ण राष्ट्रेच व त्यासोबत आपण सर्वांनीच संपवून घ्यायचे कि भुतलावरील सर्वच राष्ट्रांचे अखिल मानवजातीने एकमते, स्वहस्ते विसर्जन करत यच्चयावत विश्वात एकुलता एक प्रगल्भ प्राणी म्हणून सध्या ज्ञात असलेल्या मानवजातीचा खरा सन्मान करायचा?
उत्तर आपल्याच हातात आहे !