"नेहरूवादाचा एकाकी वारसदार: राहुल गांधी"

नेहरुवाद म्हणजे नक्की काय? नेहरुवाद संपवण्यासाठी मोदी, संघ, भारतीय जनता पक्ष आणि देशातील सर्व उजव्या शक्ती मिळून देखील नेहरूंचं तत्वज्ञान आणि राहुल गांधींचं नेतृत्व नष्ट का करू शकल्या नाहीत. राहुल गांधी भाजपसमोर एक धाक असणारी नैतिक शक्ती आहेत का? वाचा ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांचा नेहरुवाद, महात्मा गांधी यांचे विचार, समाजवादी विचार यांचा आढावा घेत राहुल गांधी यांच्या राजकारणावर प्रकाश टाकणारा लेख नक्की वाचा

Update: 2021-06-21 06:45 GMT

"तुम्ही फॅसिझम विरुद्ध लढता ते जिंकण्यासाठी नव्हे, तुम्ही फॅसिझम विरुद्ध लढता, कारण ते फॅसिस्ट आहे म्हणून".

–ज्याँ पॉल सार्त्र

२०१४ आणि २०१९ च्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे मुगल साम्राज्याच्या अखेरच्या बादशहासारखे म्हणजे बहादूरशहा जफरसारखे वाटतात, पण ते तसं नाही. ते अधिक गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेण्याकरिता थोडं मागे जावं लागेल. काँग्रेसच्या इतिहासात मोतीलाल नेहरूंपासून सुरू झालेली, नेहरू आणि गांधी परिवाराची रेष ही राहुल गांधींपाशी येऊन आजघडीला थांबलेली आहे.

यात मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी अशी ही रेष आहे. नेहरू गांधी परिवार म्हणताना एक लक्षात ठेवले पाहिजे की, इथे गांधी हे महात्मा गांधींशी संबंधित नसून फिरोज गांधींशी संबंधित नाव आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी– नेहरू वेगळे आणि आत्ताचे नेहरू–गांधी वेगळे. म्हणजे महात्मा गांधींचा सक्रीय सहवास मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांना लाभला; इंदिरा गांधींनाही तो लाभला; पण इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी यांच्यामुळे आत्ताचं नेहरू–गांधी हे नाव प्रचलित झालं.


अनेकदा उजव्या विचारसरणीची मंडळी गांधी –नेहरू हे सलग नाव महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंची बदनामी करायला सरसकट वापरतात. म्हणून आज हा खुलासा करावा लागतो. खरं तर गांधी– नेहरू– गांधी यातील नेहरू सामाईक. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते; ते एका अर्थाने गांधीजींचे मानसपुत्रच होते; पण यापलीकडेही त्यांचं भारतीय इतिहासात मोठं योगदान आहे. ते समजून घेतल्याशिवाय राहुल गांधींनी नेमका कोणता वारसा आपल्याबरोबर पुढे न्यायचा आहे आणि नेहरूंच्या मृत्यूनंतर व राहुल गांधीच्या उमेदीच्या काळात कोणती बदनामी त्यांच्या वाट्याला आली. त्याशिवाय ते कळणार नाही.

जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या कारागृहात ९ वर्षे घालवली होती. याव्यतिरिक्त त्या वेळच्या जहाल तरूणांचे जे महत्त्वाचे नेते होते. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांची नावं प्रामुख्याने घेतली जात असत; पण उजव्यांचे आणि फॅसिस्टांचे नेहरू हे कायमचेच शत्रू राहिले आहेत. कारण नेहरू कायम फॅसिझमविरोधी होते.


नेहरू आणि सुभाषबाबूंच्या वैचारिक संघर्षामध्ये हाही भाग सूक्ष्म आणि स्थूलरीत्या येतो. फॅसिस्ट नेता बेनिटो मुसोलिनी याने नेहरू युरोपमध्ये असताना नेहरूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण नेहरूंनी त्याला भेटण्यास नकार दिला आणि त्याची इच्छा असतानाही नेहरू त्याला कधीच भेटले नाहीत. ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची गोष्टी आहे,ज्याचं कौतुक त्या काळच्या ब्रिटीश साम्राज्याचे तत्कालीन आजी आणि भावी पंतप्रधान म्हणजे चेंबरलेन आणि चर्चिल हे देखील करत होते.

त्या इटलीचा सर्वसत्ताधीश ड्यूस बेनिटो मुसोलिनीने नेहरूंना भेटण्याची इच्छा त्या काळात व्यक्त केली होती, तेव्हा ती झिडकारणारे नेहरू कोण होते? ते ब्रिटिश साम्राज्याच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारत नावाच्या देशातील एक साधे स्वातंत्र्यसैनिक होते.

१९३८ पर्यंत म्हणजे म्युनिक कराराच्या टेबलवर चेंबरलेन, दलादीएँ, हिटलर यांना एकत्र बसवणारा मुसोलिनी हा एका रोमन सम्राटापेक्षा कमी नव्हता. त्याची इच्छा असताना त्याला एका गुलाम देशातील स्वातंत्र्यसैनिकाने भेटायला नकार देणं ही त्या स्वातंत्र्यसैनिकाच्या म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या वैचारिक निष्ठेची परमावधी होती.

नेहरूंचे सहकारी मित्र आणि समकालीन सुभाषचंद्र बोस हे गांधीजींचे खरं तर दुसरे मानसपुत्रच होते, परंतु सुभाषबाबूंना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामासाठी मुसोलिनी किंवा हिटलर यांच्याशी हातमिळवणी करणे गैर वाटत नसे. नेहरू या बाबतीत अधिक गांधींचे अनुयायी होते याचं कारण नेहरू अहिंसावादी होते असं नव्हे, तर नेहरूंना त्यांच्या आयुष्यात गांधींच्या शिकवणीतील साध्य साधनशुचिता महत्त्वाची वाटत असे. नेहरूंच्या आयुष्यातील या गोष्टी समजावून घेतल्याशिवाय भारतातील उजव्या विचारांचे, फॅसिस्ट आणि संघाचे लोक राहुल गांधी आणि नेहरूंचा एवढा द्वेष का करतात हे आपल्याला समजू शकत नाही.

नेहरूंच्या बाबतीत अहिंसेपेक्षा साध्य साधनशुचिता महत्त्वाची होती. अहिंसेच्या बाबतीत गांधीजींनी जसं भगतसिंगांना मारोकाटो का पंथ म्हटलं तसं नेहरू मानत नसतं. भारताचे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१८ ला एका ट्विटमध्ये असं म्हटलं की, भगतसिंग, बटुकेश्वर दत्त वगैरे जेव्हा ब्रिटिशांच्या कैदेत होते तेव्हा कोणी काँग्रेस नेता त्यांना भेटायला गेला होता का? हा तद्दन द्वेषमूलक अपप्रचार होता.


 



 



खरं तर ९ ऑगस्ट १९२९ रोजीभगतसिंग आणि फाशीची वाट पाहणारे त्याचे इतर सहकारी ज्या लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये होते, (त्या वेळेला हे सर्वजण ब्रिटिशांचा निषेध म्हणून उपोषण करत होते) तिथे वर दिलेल्या तारखेला नेहरू स्वतः गेले होते. तिथे ते भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटले. एवढंच नव्हे तर नेहरूंनी स्वतःच्या आत्मचरित्रातही भगत सिंगांचे भरभरून कौतुक केले आहे आणि त्यांच्या त्यागाला सलामही केलेला आहे. याचा अर्थ नेहरूंसाठी (आणि त्यांच्या वारसांसाठी) हिंसा अहिंसा या मुद्द्यापेक्षा क्रांतिकारकांची हिंसा आणि फॅसिझम याच्यातला फरक अतिशय महत्त्वाचा होता.

भगत सिंगांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा असेंब्लीमध्ये बाँम्ब टाकला. तेव्हा तिथे जवाहरलाल यांचे वडिल मोतीलालजी हजर होते; परंतु हा मुद्दा ना जवाहरलाल नेहरूंच्या मनाला शिवला ना मोतीलालजींच्या. त्यांना या क्रांतीकारकांचं कौतुकच होतं आणि त्यांच्या त्यागाबद्दल आदरही होता. पण भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांच्या बाबतीत त्यांच्या हिंसेच्या संदर्भातलं तत्त्वज्ञान अधिक महत्त्वाचं होतं.

त्या तत्त्वज्ञानाविना कोणतीही हिंसा निष्फळ असते.

नेहरूंच्या बाबतीत या गोष्टी इतक्या विस्तारानं लिहिण्याचं कारण आज देशातील परिस्थितीच्या मुळाशी हाच वैचारिक संघर्ष आहे, ज्या वैचारिक संघर्षामध्ये नेहरूंच्या नावाचं अस्तित्व नष्ट केल्याशिवाय संघ आणि भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निर्णायक विजय मिळवू शकत नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी म्हणजे केवळ सर्वसामान्य घराणेशाही नव्हे. आज देशामधील बहुतेक राजकीय नेत्यांचे परिवार राजकारणात आहेत.

भारतीय जनता पक्षातील अनेक घराणी राजकारणात आहेत; पण गांधी परिवार म्हटल्यावर सर्व उजवे तुटून पडतात. याचं कारण गांधी परिवार त्यांच्या नावामागील हा नेहरूंचा वारसा आहे. हे पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले. तेव्हा सुरूवातीपासूनच त्यांच्या प्रतिमेचे खच्चीकरण करण्यात आले. राहुल गांधी यांचा संघर्ष हा तीन पातळ्यांवर होता.

एक पक्षातील जुने स्थितीवादी, दुसऱ्या बाजूला संघ आणि त्यांच्या इको सिस्टीमने निर्माण केलेलं सायकॉलॉजिकल वॉर आणि तिसरीकडे याच इको सिस्टीमने निर्माण केलेली फॅसिस्टांची अजस्त्र प्रचार यंत्रणा, ज्यामध्ये मोदी यांचे प्रतिमामंडण आणि राहुल गांधींचे प्रतिमाभंजन या दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत.

२००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा (ते निखळ भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं, ते रालोआ सरकार होतं.) पराभव करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार जेव्हा सत्तेत आले. तेव्हा सोनिया गांधी या काँग्रेसच्या नेत्या होत्या. सोनिया गांधी जन्माने परदेशी असल्यामुळे त्या स्वतः पंतप्रधान झाल्या नाहीत आणि त्यांनी पक्षातील धुरंधर नेते आणि अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं.



भारतातील राजकीय लोकशाहीचा जो पाया जवाहरलाल नेहरूंनी घातला होता. त्या पायाला फारसा धक्का न देणारं अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं; परंतु वाजपेयींच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण यंत्रणा व शक्ती काम करत होती. तत्वज्ञान म्हणून नेहरूवादाला शत्रू मानणारं आणि फॅसिझमला आपलंसं मानणारी विचार यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर युद्ध, मनोवैज्ञानिक युद्ध, कुजबुज तंत्र आणि इतर प्रचार यंत्रणा यांना हाताशी धरून स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते २००४ पर्यंत काम करतच होती. त्यांना वाजपेयींचा पराभव जिव्हारी लागला.

वास्तवात संघविचाराला राजकारणात खरं स्थान मिळवून देण्याचं श्रेय समाजवादी पक्षाला जातं. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांनी एक आघाडी उभी केली. ज्याचा नंतर पक्ष तयार झाला ज्याचं नाव जनता पक्ष.

जनता पक्षाने १९७७ साली इंदिरा गांधींचा पराभव करून केंद्रात सत्ता मिळवली. संघाच्या नेत्यांना दिल्लीतल्या केंद्रसत्तेची मिळालेली ही पहिली चव त्यांना समाजवाद्यांमार्फत प्राप्त झाली. त्या मंत्रिमंडळात लालकृष्ण अडवाणी हे नभोवाणी मंत्री होते. जे आत्ता मार्गदर्शक मंडळात आहेत! ही समाजवाद्यांची आणि हिंदुत्ववाद्यांची आपापसात वैचारिक विरोध असूनही नेहरूवादाला, कॉंग्रेसला शत्रू मानून हातमिळवणी करण्याची परंपरा आजपर्यंत कायम राहिलेली आहे. याचा अचूक फायदा संघानेही उचलला.

फॅसिझमला आपला विरोध आहे, असं सांगणारे जॉर्ज फर्नांडिस हे १९७७ च्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते नंतर २००४ मध्ये अटलबिहारींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, शिवाय ते त्या काळी रालोआचे निमंत्रकही होते. हे चक्र अगदी आजतागायत कायम आहे. उदा. नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना विरोध करता करता आपल्या वैचारिक सहकाऱ्यांशी दगाबाजी करून आणि भाजपशी हात मिळवणी करून सत्ता प्राप्त केली.

वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर २००४ आणि २००९ च्या निवडणूकांत पुन्हा यूपीए सरकार भारतात निवडून आलं. सरकार आलं म्हणजे काँग्रेसची शक्ती वाढत होती असा त्याचा अर्थ नव्हे; किंबहुना १९८९ नंतर म्हणजे राजीव गांधींच्या सरकारला घरघर लागल्या नंतर काँग्रेसची शक्ती क्रमाक्रमाने कमीच होत गेलेली आहे. काँग्रेस ही सरंजामदारीने ग्रस्त होत गेली आणि तिला जडत्व प्राप्त झालं. वर उल्लेख केलेल्या नेहरूवादाच्या लोकशाही, साहित्य, शास्त्र, कला, विचार, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांच्याबाबत प्रागतिक आणि पुरोगामी असलेल्या परंपरेचा काँग्रेसला उत्तरोत्तर विसरच पडलेला दिसून आला.


या गोष्टींची नोंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी घेतली नसती तरच नवल. आतून वाळवी लागलेल्या सागवानी वाड्याप्रमाणे असलेल्या एखाद्या वाड्यावर सत्ता गाजवणाऱ्या व्यक्तीची स्थिती जशी असेल तीच स्थिती या काळात सोनिया गांधींची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि देशातील सर्व उजव्या विचारांच्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की, या भारतीय राज्यसत्तेवर संपूर्णपणे निरंकुश हल्ला करणं आणि ती आक्रमक पद्धतीने ताब्यात घेणं याची हीच खरी वेळ आहे.

२०१४ ला मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षासमोर कॉंग्रेस संपूर्णपणे पराभूत झाली; परंतु याची सुरूवात २०१० पासूनच झालेली होती. भाजप–संघाच्या सर्व यंत्रणांनी नेहरू आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध एकाच वेळी सर्व प्रकारच्या प्रचारमाध्यमांतून मनोवैज्ञानिक युद्ध छेडलेलं होतं.

चार वर्षे म्हणजे २०१० ते २०१४ पर्यंत राहुल गांधी यांना पप्पूची प्रतिमा देण्यात आली. खरं तर राहुल गांधी हे परदेशामध्ये म्हणजे ऑक्सफर्डमध्ये एमफील केलेले गृहस्थ आहेत. या उलट मोदींचे औपचारिक उच्चशिक्षण झाल्याचा कोणताही पुरावा जनमानसात नाही; पण तरीही २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी हे एक बुद्धू, पप्पू, राज्य करायला योग्य नसलेला असा मनुष्य आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. वास्तवात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी राहुल गांधींच्या मुलाखतीत त्यांचं बोलणं, त्यांचं वास्तविक शिक्षण, त्यांची परिपक्वता हे दिसून आलं; परंतु त्यांची पहिली वेळ २०१४ मध्ये निघून गेलेली होती.


भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विषारी प्रचार यंत्रणा यांनी निर्माण केलेली मोदींच्या नेतृत्वाची काल्पनिक प्रतिमा आणि त्याच वेळी त्यांनी मलिन केलेली राहुल गांधी यांची काल्पनिक प्रतिमा या सर्वांच्या दुष्टचक्रात राहुल गांधी यांचं नेतृत्व पार घुसळून निघालं. याच वेळी काँग्रेस ही नेहरूवादापासून दूर जात इतकी जराजर्जर झालेली होती, की संघाच्या अजस्त्र विषारी यंत्रणांपुढे तिचा टिकाव लागणं अशक्य बनलं. अर्थात या सगळ्याचा वर्मी घाव राहुल गांधी या माणसाला आणि राहुल गांधी या नेत्याला बसला.

खरं तर राहुल गांधींच्या जागी दुसरा कोणीही माणूस असता तर तो कोलमडून पडला असता. भारतीय इतिहासात नेहरूंप्रमाणे दुसर्‍या कोणत्याच माणसाची आणि त्याच्या वैचारिक वारसाची इतकी विषारी, द्वेषपूर्ण आणि धादांत खोट्या तत्त्वावर बदनामी झालेली नसेल; पण राहुल गांधी कोसळून पडले नाहीत.

सध्या भारताच्या निवडणूक आयोगापासून ते न्यायालयीन प्रक्रियेवर ताबा मिळवला जात आहे. कोणतीही गोष्ट, कोणत्याही पद्धतीने संवैधानिक (घटनात्मक) राहिलेली नाही. तरीही सगळ्या उजव्या यंत्रणांना सातत्याने नेहरूंचं आणि राहुल गांधींचं प्रतिमाभंजन करणं गरजेचं वाटतं आहे. यातच मोदी, संघ, भारतीय जनता पक्ष आणि देशातील सर्व उजव्या शक्ती मिळून नेहरूंचं तत्वज्ञान आणि राहुल गांधींचं नेतृत्व नष्ट करू शकल्या नाहीत, याचा पुरावा दिसून येतो.

राहुल गांधींकडे जेव्हा हरण्यासाठी संपूर्ण देशाची सत्ता होती, तेव्हाही ते स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत सातत्याने लढत होते. याचं एक उदाहरण आहे. ज्याची नंतर बदनामी करण्यात आली आणि विपर्यास करण्यात आला, ते म्हणजे एका निर्णय झालेल्या मसुद्याचा कागद राहुल गांधींनी जाहीरपणे फाडला होता. ही गोष्ट राहुल गांधींना सत्तेच्या आतमध्ये असताना आलेल्या उद्विग्नतेचं उदाहरण होतं. सत्ता जर नेहरूवादाच्या म्हणण्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी वापरता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. हेच त्यांचं म्हणणं होतं; परंतु त्यांच्या शत्रूंनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत युद्धाचा त्यांच्या बदनामीसाठी वापर करून घेतला.

एकदा २०१४ च्या अगोदर एका मुलाखतीत राहुल यांनी सत्ता हे विष आहे. हे मी आईकडून शिकलो, असे म्हटले होते, तर याचीही यथेच्छ टवाळी करण्यात आली. वास्तवामध्ये आता मागे वळून पाहिलं तर काय दिसतं? आत्ताचे जे सत्ताधीश आहेत (२०१९) त्यांच्याप्रमाणे राहुल गांधी कधी खोटं बोलले नाहीत. त्यांनी कधीही खोटी वचनं दिली नाहीत, स्वतःच्या शिक्षणाबद्दल खोटे आभास निर्माण केले नाहीत.

स्वतः ऑक्सफर्डमध्ये शिकल्यामुळे ऑक्सफर्ड विरूद्ध हॉर्वर्ड (हार्वर्ड विरूद्ध हार्डवर्क असं जे आपल्याला सांगण्यात आलं) असं कधी त्यांनी सांगितलं नाही. वास्तवामध्ये राहुल गांधींचा २०१० पासून जो प्रवास आहे, जो पक्षांतर्गत विरोधक आणि बाहेरचे शत्रू म्हणजे जवळपास सारं जग विरूद्ध राहुल गांधी असा तो संघर्ष होता, त्यात खऱ्या अर्थाने राहुल गांधींबरोबर त्यांची बहीण, आई आणि काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. राहुल गांधी यांची संघटना त्यांच्या उदयाला येण्याअगोदरच आतून कोलमडलेली होती. त्यात राहुल गांधी यशस्वी होणं शक्यच नव्हतं.


एकही गोष्टी राहुल गांधींना पाठिंबा देणारी अशी नव्हती. ते केवळ गांधी परिवारातून आलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाचे भावी नेतृत्व आहेत. म्हणजे सर्व त्यांना अनुकूल होतं, असं जे चित्र उभं केलं जातं. ते सर्वस्वी खोटं आहे, हे वर केलेल्या विश्लेषणातून लक्षात यायला हरकत नाही. २०१९ च्या भारतीय लोकसभेच्या निवडणूका या संपूर्ण असत्यावर जिंकल्या गेल्या. साध्य– साधन– शुचितेचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला, तर इथे नैतिकतेचा मुद्दा राहुल गांधींच्या बाजूचा राहतो.

कारण राहुल गांधींनी कोणत्याही प्रकारची गुलाबी चित्र रंगवली नाहीत, कोणत्याही प्रकारच्या अच्छे दिनांची वचनं दिली नाहीत. वास्तवात त्यांच्या पक्षाचं सरकार असताना खरे अच्छे दिन होते, हे आता लोकांच्या लक्षात येऊनही राहुल गांधी यांनी असं बोलणं नेहमीच टाळलं. लोकांना सत्य बोलणारा आणि आजाराचं खरं स्वरूप सांगणारा डॉक्टर नको असतो. याउलट भुलवणारा आणि तुम्हाला काहीही आजार नाही, असं सांगणारा क्वॅक किंवा कंपाऊंडरसुद्धा चालतो, अशी या समाजाची मानसिकता बनलेली आहे.

अशा समाजात, अशा मानसिकतेत राहुल गांधींसारखी एका अजस्त्र प्रचार यंत्रणेच्या विरोधात जाऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारी माणसं ही बराच काळ अप्रिय राहतात किंवा पप्पू ठरतात. अर्थात वास्तवाचे चटके बसल्यावर खरा डॉक्टर हवा असतो. तेव्हा हीच माणसं लोकप्रिय होतात.

आज मोदीशासित भाजपकडे भारताची निरंकुश सत्ता आहे. त्यावर कोणत्याही आयोगाकडे किंवा न्यायालयाकडे कोणतीही दाद मिळणं दुरापास्त आहे. भारतात लोकशाही संकटात आलेली आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राहुल गांधी हे संघाचे, भाजपचे आणि स्वतः मोदींचे नंबर एकचे शत्रू का असतात, हे कळण्याकरिता वस्तुस्थिती थोडी समजून घेतली पाहिजे.



वस्तुस्थिती ही आहे की, भारतासारखा वैविध्याने परिपूर्ण असलेला अजस्त्र देश एका धर्माच्या नावावर चालवता येत नाही. भारतासारख्या अजस्त्र देशाची अर्थव्यवस्था हॉर्वर्डच्या विरूद्ध हार्डवर्कच्या अनाडीपणाने रेटता येत नाही. याची जाणीव झाल्यावर खरा डॉक्टर लागतो आणि खरं वैद्यकशास्त्र लागतं. कारण हे झाल्यावर पेशंटचीही शस्त्रक्रियेसाठी मानसिक तयारी झालेली असते. तो खरा डॉक्टर राहुल गांधी आहे, ते खरं वैद्यकशास्त्र नेहरूवाद आहे, हे सत्य कळल्यावर भारतीय जनतेची स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेण्याची तयारी होते आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा साधा कार्यकर्ता असलेला राहुल गांधी, पन्नास–पंचावन्न वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेले त्याचे पणजोबा जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं तत्वज्ञान हे पुन:पुन्हा खोडरबर घेऊन खोडण्याची गरज पडते आहे.


युद्धं, क्रांती यांना नेहरूवादाचा विरोध होता आणि राहुल गांधीही याच संस्कृतीचे पूजक आहेत, अशी जी टीका केली जाते, ती एक विकृत बदनामी आहे, कारण युद्ध कोणाविरूद्ध आणि क्रांतिकारकता म्हणजे काय? याचा विचार न करणाऱ्या जनमानसाला फॅसिस्ट हिंदुत्वाचे तत्वज्ञान (इथे हिंदू धर्म आणि फॅसिस्ट हिंदुत्व तत्वज्ञान या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत,) म्हणजे भारतीय क्रांतिकारकत्व नव्हे, हे सांगणे आवश्यक आहे.


नेहरू हे खरे क्रांतिकारक होते, भगत सिंग हे खरे क्रांतिकारक होते, त्यांच्या तत्त्वज्ञानात सामान्य माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची ताकद होती. म्हणूनच भारत स्वातंत्र्यानंतर वैज्ञानिकदृष्ट्या आणि अर्थशक्ती म्हणून इतका पुढे आला.

पाकिस्तानवर भाषणं देऊन पाकिस्तान हा मुद्दा सुटणार नाही. त्याहीपुढे जाऊन युद्धाबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरूद्ध तीन लढाया भारताने जिंकलेल्या आहेत आणि त्यात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात तर पाकिस्तानचे दोन भाग झाले होते. आता मोदींच्या नेतृत्वाखाली बॉलीवूड सोडले तर भारताने कशावरही विजय मिळवलेला दिसून येत नाही.

झालेल्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार नाहीत; पण या पराभवाचा आपसूक फायदा राहुल गांधींना होऊ शकतो. कारण त्यांच्या आणि त्यांच्या पणजोबांविरोधात केलेला प्रचार हा आता आपल्यावर उलटेल याची संघसत्तेला भीती आहे. म्हणून राहुल गांधींना खोडत राहणे ही त्यांची अपरिहार्य गरज बनली आहे. तर राहुल गांधी बळकट होणे, त्यांचे पक्षांतर्गत विरोधक नामोहरम होणे आणि पक्षाबाहेरचे शत्रू विलयाला जाणे ही देशाची गरज आहे.

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा ज्या सहजतेने राजीनामा दिला किंवा बोलताना आणि वागताना आपल्या सहज स्वाभाविक खरेपणाचा त्यांनी त्याग केला नाही, यातच त्यांच्या अस्तित्वाचं क्रांतिकारकत्व दडलेलं आहे. कारण भोवतालच्या सगळ्या खोटेपणात पुन:पुन्हा जनतेला तेवढचं एक खरं जाणवत राहणार आहे. आता इथे एक महत्वाचा मुद्दा असा, की राहुल गांधी आता काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत, ते कोणत्याही पदावरही नाहीत, ते त्या घराण्याचे आहेत हे वगळता ते कुणीच नाहीत. त्यांनी कधीही आपल्या वैचारिक वारशावर पाचपन्नास भाषणं केलेली नाहीत (जे ते करू शकले असते). त्यांनी ते न करण्यातच त्यांचं आजच्या काळाचं, समकालीन क्रांतिकारकत्व दडलेलं आहे.

आपल्याभोवती महानेत्याची महाप्रतिमा उभी करण्याकरिता सगळ्या प्रचारयंत्रणा कसोशीने काम करत असतानाही वयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत भीक मागण्याच्या गोष्टी, चहा विकून गरिबीत दिवस काढल्याच्या गोष्टी, खूप म्हणजे खूपच ठिकाणी फिरल्याच्या गोष्टी असं एकंदर गोष्टीवेल्हाळ राजकारण भारतात चालू असताना राहुल गांधींकडे त्यांचे पणजोबा, त्यांची आजी, त्यांचे वडील अशा वास्तवातल्या हजारो गोष्टी असतानाही त्यांनी एकही गोष्ट पाल्हाळिकपणे सांगणं, त्याचा राजकीय लाभ उठवणं नाकारलेलं आहे. कितीही बदनामी झाली तरी ते जसे आहेत तसेच लोकांना सामोरे गेलेले आहेत. ही क्रांतिकारकता कमी आहे का?

भाजपने ज्या सायबर वॉरची उभारणी केली, व्हॉट्सअॅपपासून सर्वसमाजमाध्यमांद्वारे राहुल गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची बेफाम बदनामी केली, ज्या बदनामीद्वारे अंततः भाजपला सत्ता मिळाली ते बदनामी करण्यासाठी वापरण्यात आलेलं आधुनिक तंत्रज्ञान भारतात राजीव गांधींनीच आणलं होतं आणि आता सत्ता मिळाल्यावर भाजपने गाय, गाईचं मूत्र आणि शेण याच्या व्यतिरिक्त कोणतेही नवीन तंत्रज्ञान भारतात आणलं नाही.

याउलट रोज नवनवीन अवैज्ञानिक, बुरसटलेल्या विचारांचा पुरस्कार होताना दिसत आहे. या सगळ्यावर कळस म्हणून राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सिद्ध न झालेल्या आरोपांवरून त्यांची बदनामी करताना खुद्द पंतप्रधान दिसतात आणि एवढं होऊनही राहुल गांधी मनाचा तोल न ढळू देता आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचे कोणतेही तुणतुणे वाजवत नाहीत.

वडिलांच्या हौताम्याविषयीही बोलत नाहीत. एवढेच काय, तर खुद्द पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्या वडिलांचा असभ्य रीतीने उल्लेख केल्यावरही ते याबाबत प्रतिउत्तरही करत नाहीत. महात्मा गांधी आणि नेहरू यांची जी विचारसरणी होती त्याचा डीएनए याहून वेगळा तो काय सिद्ध करणार?


आज देशामध्ये निवडणुका कशा लढल्या जातात, मग ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या सहकार्याने त्या कशा जिंकल्या जातात, न्यायालयात आणि आयोगाकडे त्याची कशी दाद मिळत नाही, हे सर्व पाहत असताना भारताची प्रगती व्हावी, असं वाटणाऱ्या विज्ञाननिष्ठ लोकांना, जनतेला राहुल गांधी यांचा राग येतो.

राहुल गांधी आक्रमकपणे काही करत का नाहीत, असं त्यांना वाटतं आणि त्याच वेळी त्यांच्या शत्रूंना त्यांना खोडत राहावसं वाटतं, हेच राहुल गांधी यांचं खर यश आहे. त्याही पलीकडे जाऊन असं म्हणता येईल की, राहुल गांधी यांना आज भारतीय राजकारणात असण्याची जर काही अपरिहार्यता असेल तर ती हीच आहे.

राहुल गांधी हे अलौकिक आहेत किंवा नाहीत, ते नेहरूंएवढे मोठे होऊ शकणार किंवा नाही हे मुद्दे आज फिजूल आहेत. त्या त्या वेळेला त्या त्या काळाच्या पार्श्वभूमीवर एक धाक असणारी नैतिक शक्ती असावी लागते.

आज भारत स्वातंत्र्योत्तर काळातील अशा कालखंडात आहे की, राजसत्तेला कुणाचाही नैतिक धाक उरलेला नाही. राजसत्ता निरंकुश तर आहेच, पण ती नैतिकदृष्ट्याही बेलगाम आहे. अशा वेळेला ह्या विषारीपणाचे पाणी जनतेच्या नाकातोंडात जात असताना त्या पाण्याची उंची मोजायला किमान एक फुटपट्टी लागते. ती फुटपट्टी राहुल गांधी आहेत.




राहुल गांधींच्या मागे कोणता तेजस्वी इतिहास आहे किंवा जवाहरलाल नेहरूंच्या तत्त्वज्ञानात किती भारतीयत्व आहे, हे येणारा काळ ठरवेल; परंतु एका ऐतिहासिक नकारात्मक कालखंडामध्ये एका शोकांतिकेचा नायक बनवला गेलेल्या शापित राजपुत्रासारखं आयुष्य जगणाऱ्या राहुल गांधींनी आपल्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ आपल्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या जुलमी फॅसिस्ट सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे.

त्या भिंतीचा भारतीय इतिहासावर काय परिणाम होतो किंवा त्या भिंतीमुळे भारतीय इतिहासाला कोणतं वळण लागतं हे नाटकीय भाषण बाजीपेक्षा लोकांच्या आयुष्यावर झालेल्या खोल परिणामावरून आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधला वायनाड मतदारसंघ राहुल गांधी यांनी निवडला. त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठी इथूनही ते उभे राहिले होते. अमेठीत ते पराभूत झाले आणि वायनाडमध्ये ते चार लाख एकतीस हजार मतांनी विजयी झाले. उत्तरेत फॅसिस्ट हिदुत्वाला उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मतदारसंघ आणि विजय हाही खूप बोलकाच आहे. त्यातून सिद्ध काही होत नसले तरी भारत हा अनेक वेगळ्या संस्कृतींचा देश आहे.


ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण या दोन भिन्न संस्कृती आहेत, त्या बरोबर घेऊन आपण पुढे जाणार, का त्यांचे विभाजन करून आपल्या देशाला एका अंधाराच्या खाईत लोटणार, हा प्रश्न राहुल गांधींनी वेगवेगळ्या माध्यमांतून पुन:पुन्हा विचारलेला आहे. तो प्रश्न आणि काही अंशी त्याचं उत्तर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकात मांडले होते.

राहुल गांधी २०१४ ला किंवा २०१९ लाही प्रश्न नव्हतेच. यानंतरच्या भारताच्या इतिहासात मात्र, राहुल गांधी हे एक उत्तर म्हणून पुढे येण्याच्या सर्व शक्यता आज निर्माण झालेल्या आहेत.

raju.parulekar@gmail.com

Tags:    

Similar News