लॉकडाऊन तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. पुणे शहरात महापालिका आणि पोलिसांनी नव्याने आदेश काढले आहेत. रेड झोनमधील जो भाग प्रतिबंधित आहे त्या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून ओळखले जाईल व इतर भाग नॉन कंटेन्मेंट झोन म्हणून ओळखला जाणार आहे, कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सकाळी 7 ते 10 या तीन तासात घरपोच दूध वितरण आणि 10 ते दुपारी 2 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील. तर नॉन कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांशिवाय इतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नॉन कंटेनमेंट झोनमध्ये एका रस्त्यावर किंवा गल्लीत जास्तीत जास्त पाच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. ज्या बांधकाम प्रकल्पात मजुरांची त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे ते प्रकल्प सुरू ठेवता येणार आहेत. त्याचबरबोर मान्सूनपूर्व कामे सुरू, मेट्रोची कामं नॉन कंटेनमेंट झोनमध्ये सुरू होणार आहेत. पण कंटेनमेंट झोनमधून नॉन कंटेनमेंट झोनमध्ये ये जा करण्यास मनाई आहे करण्यात आली आहे. नॉन कंटेनमेंट झोनमध्ये सवलती दिल्या असल्या तरी वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया, 10 वर्षांपेक्षा लहान मुले यांना हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर कामांसाठी बाहेर पडता येणार नाही.
नॉन कंटेनमेंट झोनमध्ये सकाळी 7 ते 10 वेळेत घरपोच दूध वितरण आणि 10 ते संमध्याकाळी 6 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची आणि इतर सामग्रीची दुकाने सुरू राहतील. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेमध्ये संपूर्ण पुणे शहरात संचारबंदी असेल. सर्व धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक कार्यक्रम बंदच राहणार आहेत. कंटेन्मेंट आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक आहे.