LockDown: मोदी सरकारने केलेल्या उपाययोजना पुरेशा नाहीत - अभिजीत बॅनर्जी
देशात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे. त्यातच कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली जातेय का? तसंच मोदी सरकारने लॉकडाऊन दरम्यान जाहीर केलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यांनी मोदी सरकारने देशातील गरीब लोकांसाठी जाहीर केलेल्या योजना पुरेशा नाहीत. “लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन दिले. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत” अशा तिखट शब्दात मोदी सरकारने या देशातील गोरगरीबांसाठी चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी. असा सल्ला दिला आहे.
काय म्हटलंय अभिजीत बॅनर्जी यांनी...
केंद्र सरकारने आतापर्यंत १.७ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम जीडीपीच्या अवघी ०.८ टक्के इतकी आहे. ही मदत पुरेशी नाही. देशात वस्तू आणि सेवांचा पुरवठा होत नाही तेव्हा महागाई वाढण्याची शक्यता असते. अशावेळी केंद्र सरकारला देशातील लोकांच्या उत्पन्नातील दरी मिटवण्यासाठी काहीतरी करावे लागेल. त्यासाठी केंद्र सरकारला आणखी पैसा खर्च करावा लागेल.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग हा आधीच मंदावला होता. अशात करोना व्हायरसचं संकट कोसळलं. अशा खडतर काळात भक्कम आर्थिक पॅकेजची गरज आहे. लाखो लोकांपुढे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा काळात सरकारने भरीव पॅकेज देऊन त्यांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र नसलेले अनेक लोक आहेत. मात्र स्थानिक पातळीवर काही तरी नियोजन करुन त्यांच्या खात्यात पैसे जातील याची काळजी सरकारने घ्यायला हवी.
करोनाचं संकट हे इतक्यात आपली पाठ सोडणार नाही. प्रतिबंधात्मक लस येत नाही. तोपर्यंत या संकटातून सुटका होणं कठीण आहे. अशा कठीण काळात मोदी सरकारने गरीबांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात. लॉकडाउननंतरच्या काळात, पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न मोदी सरकारला पडला पाहिजे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या कमाईची साधनं बंद झाली आहेत. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशांसाठी सरकारने भरीव उपाय योजले पाहिजेत. असं मत त्यांनी बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.