Fact Check : उध्दव ठाकरे यांनी मुघल बादशाह औरंगजेब माझा भाऊ असल्याचं केलं वक्तव्य?

उध्दव ठाकरे यांनी औरंगजेब माझा भाऊ असल्याचे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण खरंच उध्दव ठाकरे यांनी औरंगजेब हा माझा भाऊ असल्याचे वक्तव्य केले आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

Update: 2023-03-12 12:42 GMT

सध्या सोशल मीडियावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुघल बादशाह (Mughal Badshah) माझा भाऊ होता, असं वक्तव्य केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यामध्ये भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सर्वात मोठा गद्दार असं कॅप्शन देत उध्दव ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ 6 लाख 69 हजार लोकांनी पाहिला आहे तसेच अनेक भाजप (BJP) समर्थकांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

ट्विटर वापरकर्ते मानव हिंदू यांनी म्हटले आहे की, औरंगजेबने भारत मातेसाठी जीव दिला होता. काँग्रेसच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती पप्पू असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ 34 हजार लोकांनी पाहिला आहे.

अशाच प्रकारचा दावा भाजप समर्थक आणि उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी केला आहे.



 



 



 




 





पडताळणी (What is Fact)

अल्ट न्यूजने उध्दव ठाकरे यांच्या ऑफिशियल पेजला भेट दिली. त्यावेळी 19 फेब्रुवारी 2023 चा एक व्हिडीओ मिळाला. यामध्ये दिसणाऱ्या बॅनरवर उध्दव ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात बोलत असल्याचे दिसत आहे.

Full View

यावेळी उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील प्रवाशांना भेटल्याचा अनुभव सांगितला. त्यामध्ये ठाकरे म्हणाले, आम्हाला मुस्लिमांची काही अडचण नाही. या देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण आमचा भाऊ आहे.

या व्हिडिओत 32 मिनिट 11 सेकंदाला उध्दव ठाकरे यांनी औरंगजेबविषयी (Aurangjeb) बोलायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये उध्दव ठाकरे म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे. जी गोष्ट तुम्ही विसरुन गेला असाल. त्यामध्ये आपला एक जवान होता. काश्मीरमधून (Kashmir) तो सुट्टी घेऊन घराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आतंकवाद्यांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या शरिराचे अनेक तुकडे केले आणि त्याचे शरीर भारतीय जवानांना सापडले. मात्र तो आपला होता की नव्हता?

ज्याने देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली तो माझ्या दृष्टीने माझा भाऊ आहे.

तर तुम्ही म्हणाल की, तुम्हाला त्याचे नाव माहिती आहे का? त्याचे नाव होते औरंगजेब...होय त्याचे नाव औरंगजेब होतं. पण तो धर्माने मुसलमान (Muslim) असेल. पण त्याने आपल्या देशासाठी प्राण अर्पण केला. भारत माता ज्या भारत मातेचा जयजयकार केला जातो. त्या मातीसाठी प्राण अर्पण करणारा आपला भाऊ असू शकत नाही का? तो आपला भाऊ होता.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी मुघल बादशाह औरंगजेब याचा उल्लेख आपला भाऊ असा न करता जम्मू काश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालेल्या औरंगजेब नावाच्या जवानाचा उल्लेख भाऊ असा केला होता.

यामध्ये ज्या औरंगजेबाचा उल्लेख उध्दव ठाकरे यांनी केला होता. त्याचे 14 जून 2018 रोजी काश्मीरमधील पुलवामा भागातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याला गोळी मारण्यात आली.

निष्कर्ष (Reality)

आमदार नितेश राणे आणि इतर भाजप समर्थकांनी केलेल्या दाव्याची वरील पध्दतीने पडताळणी केल्यानंतर नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील क्लिप चुकीच्या दाव्यासह शेअर केल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags:    

Similar News