राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा?

राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. मात्र या निवडीनंतर सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष झाल्याचा दावा केला आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा;

Update: 2022-07-13 01:30 GMT

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे कौतुक करताना नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचा दावा केला. मात्र याच दाव्यावरून देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत असल्याची टीका करण्यात येत आहे.

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची अग्निपरीक्षा म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. पण या निवडणूकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना 164 तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना 107 मतं पडली. त्यामुळे भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा 57 मतांनी विजय झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्राने एक नवीन रेकॉर्ड देखील केला आहे. सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच. पण ते देशाच्या इतिहासातीलही सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यावर सभागृहातील इतर सदस्यांनी वय किती असा प्रश्न केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वय विचारायचं नसतं. त्यामुळे तात्काळ कोणत्याही सदस्याला राहुल नार्वेकर यांचे वय कळाले नाही. तसेच त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या दावा सत्य मानला.

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर लोकसत्ता या माध्यमाच्या वेब पोर्टलवर राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचे म्हटले आहे.



 


महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाच्या वेब पोर्टलवरही राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला.


 



साम टीव्ही या वेब पोर्टलवरही देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोण आहेत? जाणून घ्या अशा आशयाची बातमी दिली आहे.


 



देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर रचित सेठ या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनल्याचा दावा खोटा आहे. तर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष हे काँग्रेसचे अजय माकन अवघ्या 39 व्या वर्षी बनले होते. त्यासोबत त्यांनी अजय माकन यांच्या कारकीर्दीची माहितीचा स्क्रीनशॉट जोडला आहे.


 



हरिष इंदु मधुकर यांनीही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मीडियावाले च्यू* आहेतच. पण विद्यमान राजकारणीसुध्दा प्रोपगंडाला बळी पडतात हे खूप वाईट आहे. राहुल नार्वेकरला देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष करुन ढोल बडवले जात आहेत. पण शिवराज पाटील हे वयाच्या 43 व्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष होते. हा इतिहास आहे आणि ऐतिहासिक सुध्दा असं म्हटले आहे. त्याबरोबरच हरिष इंदू मधूकर यांनी या दाव्यासह एक लिंक जोडली आहे.

पडताळणी 

राहुल नार्वेकर हे भाजपचे नेते आहेत. मात्र यापुर्वी ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राजकीय प्रवास केला आहे. मात्र त्यांनी 2011 साली निवडणूकीचे प्रतिज्ञापत्र भरताना त्यांचे वय 34 वर्षे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राहुल नार्वेकर यांचे सध्याचे वय हे 45 असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे वयाच्या 45 व्या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष झाले.


 



 

राहुल नार्वेकर हे वयाच्या 45 व्या वर्षी विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष बनल्याचा रेकॉर्ड लातुरचे शिवराज पाटील यांच्या नावावर असल्याचा दावा केला जातो. मग शिवराज पाटील नेमके कितव्या वर्षी विधानसभेचे अध्यक्ष झाले होते आणि त्यांचा रेकॉर्ड राहुल नार्वेकर यांनी मोडला आहे का पाहू...

लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लातुरचे शिवराज पाटील यांची जन्मतारीख ही 12 ऑक्टोबर 1935 आहे.


 



पुढे त्यांच्या कारकीर्दीची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांनी भुषवलेली पदे देण्यात आली आहेत. त्यानुसार 1978-79 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्षपद भुषवले होते.


 



तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सर्व अध्यक्षांची यादी विधानसभेच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केली. त्यानुसार शिवराज पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून 17 मार्च 1978 रोजी निवडून आले. त्यानुसार शिवराज पाटील हे 43 वर्षे आणि 5 दिवसांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यामुळे राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोटा ठरला.




देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचा दावा केला होता तो खोटा असल्याचे आढळून आले. मात्र देशाच्या इतिहासात सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे पाहूयात.

रचित सेठ या ट्वीटर वापरकर्त्याने केलेल्या ट्वीटचा आधार घेत मॅक्स महाराष्ट्रने देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष कोण याचा शोध घेतला. त्यामध्ये दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अजय माकन हे वयाच्या 39 व्या वर्षी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनल्याची माहिती समोर आली.

त्याची पडताळणी केली असता अजय माकन यांचा जन्म 12 जानेवारी 1964 रोजी झाला असल्याची माहिती लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळाली.




 

अजय माकन यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर त्यामध्ये 2003 ते 2004 या कालावधीत अजय माकन यांनी दिल्ली विधानसभेचे अध्यक्षपद भुषवले होते. त्यामुळे त्यांच्या वयाची बेरीज केली तर ती 39 वर्षे इतकी होते. त्यामुळे अजय माकन हे दिल्ली विधानसभेचेच नाही तर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष झाले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दोन्ही दावे फेल ठरले आहेत.


 



निष्कर्ष 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात खोटी माहिती दिली. तसेच त्यांनी राहुल नार्वेकर हे राज्याच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असल्याचा दावा केला होता. तो दावा साफ खोटा असल्याचे मॅक्स महाराष्ट्रच्या पडताळणीत समोर आले आहे.

Tags:    

Similar News