Fact Check: राहुल गांधी यांनी रोजगार निर्मितीसाठी केलं मोदी सरकारचं कौतुक?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पहिली अँकर म्हणते की... "आम्ही तुम्हाला एक मोठी बातमी सांगत आहोत, राहुल गांधी हे युथ काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. खरं तर युथ काँग्रेसचं हे आंदोलन होतं. त्यानंतर राहुल गांधींचा एक व्हिडिओ सुरु होतो. त्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात "लक्षात ठेवा, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, जोपर्यंत हम दो हमारे दो चे सरकार आहे, तोपर्यंत भारतातील तरुणांना रोजगार मिळेल." दरम्यान फेसबुकवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. फेसबुक यूजर 'विद्रोही साहेब' यांनी हा व्हिडिओ शेअर करतांना लिहिलं "मी तर सुरुवातीपासूनच सांगत आहे, राहुल हे भाजपचे प्रचारक आहेत. भाजपचे मुख्य प्रचारक आहेत ! मोदीजींचे सरकार आहे तोपर्यंत तरुणांना रोजगार मिळेल.
फेसबुक यूजर 'सीपी भक्त' ने सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय "युवक काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण करताना, युवा नेते राहुल गांधी यांनी मोदीजी आणि मोटाभाईंची हमी घेत घोषणा केली की, जोपर्यंत यांचं सरकार आहे, तरुणांना रोजगार मिळेल, असं वाटतंय, भाजप राहुलला तिकीट देत आहे."
ट्विटर यूजर विक्रमसिंह जैन यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत राहुल गांधींना 'भाजपचे मुख्य प्रचारक' म्हटले आहे.
काय आहे सत्य...
दरम्यान, की वर्ड सर्च टूलचा वापर केला असता HW न्यूजचा 5 ऑगस्टचा व्हिडीओ रिपोर्ट मिळाला. रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या 'संसद घेरो' या प्रदर्शनात भाग घेतला होता. या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, राहुल गांधी 5 मिनिटे 41 सेकंदांनंतर म्हणतात, "आणि बंधू आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, जोपर्यंत हम दो हमारे दो सरकार आहे, तोपर्यंत भारतातील तरुणांना रोजगार मिळणार नाही."
म्हणजे, सत्यात राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत की, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आहेत. तोपर्यंत तरुणांना रोजगार मिळणार नाही. दरम्यान आज तकच्या ब्रॉडकास्ट व्हिडिओसोबत छेडछाड करून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचं दिसून येत आहे. आज तकच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, पहिल्या 19 सेकंदात, तो भाग पाहिला आणि ऐकला जाऊ शकतो जो एडिट करून शेअर केला जात आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
निष्कर्श: एकूणच, युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणासोबत छेडछाड करत एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला जात आहे.