Fact Check : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधातील ट्वीट केले डिलीट?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मी सावरकर नाही गांधी आहे, असं म्हणत माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर देशात नवा वाद निर्माण झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेले ट्वीट डिलीट केल्याचा दावा केला जात आहे. मात्र राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात ट्वीट डिलीड केले आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचे फॅक्ट चेक...;
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये तुम्ही माफी मागणार का? असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर उत्तर देतांना माझं नाव सावरकर (Savarkar) नाही. मी गांधी आहे आणि गांधी कुणाची माफी मागत नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर मी त्यांच्याविरोधात FIR दाखल करील, असं विनायक दामोदर सावरकर (VD savarkar) यांचे नातू रणजित सावरकर यांनी 27 मार्च रोजी म्हटले होते. मात्र यानंतर वि दा सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधातील ट्वीट डिलीट केल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ (Avadhut wagh) यांनी ट्वीट करून राहुल गांधी यांनी माफी मागितली असल्याचं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये अवधुत वाघ यांनी म्हटले आहे की, सावरकर नावाचा झंझावात मागे लागल्यानंतर माफीवीर, जामीनवीर, पळपुट्या पप्पूने अटक होईल म्हणून घाबरून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी करणारे सारे ट्वीट डिलीट केले, असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी हिंदू महासभेचे विवेक पांडेय यांनी ट्वीट करून मी सावरकर नाही जो माफी मागेल. मात्र माफी मागण्याची वेळ येऊ नये म्हणून मी ट्वीट सगळे ट्वीट डिलीट करत आहे. बरोबर आहे ना , असं म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टिपण्णीवर FIR दाखल करण्याच्या चर्चेनंतर सावरकर यांच्याबाबतीत केलेले ट्वीट डिलीट केल्याचं दीप मनी त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
मनोज सिंह यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, वीर सावरकर यांच्याबाबत राहूल गांधी यांनी केलेले ट्वीट शेवटी डिलीट केले. वीर सावरकर यांच्या नातवाला भिऊन ट्वीट डिलीट केल्याचा दावा केला आहे.
सुबिर एस चौधुरी यांनी ट्वीट करून दावा केला आहे की, राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर ट्वीट डिलीट केले.
पडताळणी (Fact Check)
मॅक्स महाराष्ट्रने राहुल गांधी यांच्या ट्विटरची Archived Link पाहिली. त्यामध्ये राहुल गांधी यांनी 6 हजार 791 ट्वीट केलेले आहेत. त्यातील 1 एप्रिलला केलेले ट्वीट खाली दिले आहे.
राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर 1 एप्रिलपर्यंत 10 ट्वीट केले आहेत.
राहुल गांधी यांनी ट्वीटमधील एकही ट्वीट डिलिट केले असते तर 6 हजार 791 ही संख्या पूर्ण भरली नसती. राहुल गांधी यांनी 27 मार्चला एकच ट्वीट केले आहे आणि ते ट्वीट सावरकर यांच्याशी संबंधित नाही.
जर 27 मार्च रोजी राहुल गांधी यांनी ट्वीट डिलीट केले असेल तर या संख्येतील ट्वीट कमी झालेले सोशल ब्लेडमध्ये दिसले असते.
राहुल गांधी यांच्या टाईमलाईनवर पाहिल्यानंतर नोव्हेंबर 2022 मधील एक व्हिडीओ पहायला मिळाला. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी वीर मातृभूमि पर अपने शीश चढ़ाते हैं,
और कायर ग़ुलामी में सर झुकाते हैं, असं म्हटलं आहे.
काय आहे सत्य? (What is Reality)
राहुल गांधी यांनी रणजित सावरकर यांच्या इशाऱ्यानंतर सावरकर यांच्याविषयी केलेले ट्वीट डिलीट केल्याचा दावा तथ्यहीन आहे. कारण राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयीचे कोणतेच ट्वीट डिलीट करण्यात आल्याचे फॅक्ट चेकमध्ये दिसून आले आहे.