Fact Check : बापरे ! BJP नेता हार्दिक पटेलला नागरिकांनी लावलं पिटाळून?
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये लोक हार्दिक पटेल याला पिटाळून लावत असल्याचे दिसत आहे. पण हार्दिक पटेल याला नागरिकांनी पिटाळून लावल्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे फॅक्ट चेक...
पाटीदार आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिध्दी मिळालेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हार्दिक पटेल यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान हार्दिक पटेल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामध्ये शुभम नावाच्या ट्वीटर वापरकर्त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जनतेने हार्दिक पटेल यांना पिटाळून लावले. कारण गुजरातमध्ये जनता भाजपावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे. (Archive Link)
भाजपा नेता हार्दिक पटेल को जनता ने भगाया...
— Shubham 🇮🇳 (@shubh_ind) October 10, 2022
गुजरात के लोग बहुत नाराज़ हैं भाजपा से. pic.twitter.com/aAmoNKhPsE
सोशल मीडियात शेअर होत असलेल्या व्हिडीओत लोकांनी हार्दिक पटेल यांना घेरले आहे. यात लोक म्हणत आहेत की, ज्यांना विचारायचे आहे त्यांना विचारा, पहा वेळ नक्की उत्तर देईल, तुम्ही ज्या केसविषयी बोलत आहात, Russian TV मध्ये शेहला रशीद यांची मुलाखत पहा. कारण प्रत्येक गोष्ट केसमध्ये असत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला हरवू शकता. तुम्ही एखाद्या पक्षाला हरवा बॉस, पण त्यासाठी तुम्ही अशा लोकांसोबत तर उभे नाही राहू शकत ना? प्रत्येक गोष्ट FIR मध्ये होत नाही. तुम्ही काय बोलता ते महत्वाचं असतं. संपुर्ण जग तुमच्यासोबत असेल त्याबाबत प्रश्नच नाही. पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांसोबत उभे तर राहू शकत नाहीत ना?
@manuazad_ या ट्वीटर वापरकर्त्याने याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.
भाजपा नेता हार्दिक पटेल को जनता ने भगाया..😂😂
— Manu Azad (@manuazad_) October 10, 2022
गुजरात के लोग बहुत नाराज़ हैं भाजपा से... pic.twitter.com/FrPBodGR9T
काही ट्वीटर वापरकर्त्यांनी याच दाव्यासह हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आगामी काळात गुजरात विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सत्य पडताळणी (Reality Check)
मॅक्स महाराष्ट्रने काही की-वर्ड्स सर्च केले. त्यानंतर प्रथम सर्चमध्ये रिपब्लिकन भारत (Republican Bharat) चॅनलचा 26 मार्च 2019 रोजी अपलोड केलेला एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरून नागरिकांना नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
पुढे आणखी माहिती मिळवल्यानंतर देश गुजरातचा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकुर हे अहमदाबादच्या प्रल्हादनगर गार्डनमध्ये TV9 गुजराती या वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी पोहचले होते. यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
गुजराती न्यूज चॅनल VTV News ने या घटनेबाबत व्हिडीओ रिपोर्ट प्रसिध्द केला होता.
काय आहे सत्य? (What is Fact)
हार्दिक पटेल यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ 3 वर्षांपुर्वीचा आहे. ज्यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये होते. मात्र आगामी काळातील गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन चुकीच्या दाव्यासह हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये लोकांनी हार्दिक पटेल यांना लोकांनी पिटाळून लावल्याचे म्हटले आहे.