FACTCHECK : कोरोनावरील लसीमुळे रक्ताच्या गाठी होतात का?

ऑक्सफर्ड- एस्ट्राझेन्काच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी होत असल्याने युरोपातील काही देशांमध्ये लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर या लसीबद्दल उलटसुलट चर्चा सुरु असताना नेमके सत्य काय आहे ते सांगणारा रिपोर्ट....;

Update: 2021-03-15 13:24 GMT

कोरोनाचे संकट भारतात पुन्हा गंभीर होत असताना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून एक बातमी चर्चेत आली आहे, त्यामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, अशा तक्रारी आल्यामुळे युरोपातील काही देशांमध्य ऑक्सफर्ड-एस्ट्रोझेन्काची लस थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. हीच लस भारतात सिरम इन्स्टिट्युटने बनवली आहे. त्यामुळे या वृत्तानंतर भारतातही याबद्दल शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. पण यामागे नेमके सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला.


Social media

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर डेन्मार्क या देशात लसीच्या वापरावर दोन आठवड्यांची बंदी घालण्याच आली. पण काही माध्यमांनी केवळ एवढ्याच बातम्या दिल्या. पण डेन्मार्कच्या आरोग्य मंत्र्यांची यावरील प्रतिक्रिया महत्त्वाची होती, त्यांनी सांगितले की, एस्ट्राजेन्काच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी तयार होतात असे सध्या तरी सिद्ध झालेले नाही. पण लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी का तयार झाल्या यावर सध्या संशोधन सुरू आहे. पण एस्ट्रजेन्काने अशाप्रकारे रक्ताच्या गाठी होत नसल्याचा दावा केला आहे. डेन्मार्कसह ऑस्ट्रिया, नॉर्वे या ठिकाणीही असेच प्रकार घडल्याच्या तक्रारी आल्याने आतापर्यंत ९ देशांमध्ये लसीच्या वापरावर बंदी घातली गेली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे काय?

यावर जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास करुन योग्य तो निर्णय़ घेतला जाईल असे म्हटले आहे. तसेच सध्या तरी ऑक्सफर्डच्या लसीवर बंदी घालण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने ही लस प्रभावी असल्याचे सांगतिले आहे. संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरीस यांनी सांगितले की, एस्ट्राजेनकाच्या लसीचा वापर थांबवण्याची आवश्यकता नाही. या लसीचेचे डोस सुरू ठेवले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची समिती लसीच्या सुरक्षेविषयी अभ्यास करत आहे. पण आतापर्यंत झालेल्या संशोधनात लसीमुळे रक्ताची गाठ तयार झाल्याचे आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. लस घेतल्यानंतर ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्या व्यक्तींच्या मृत्यूला करोनाची लस जबाबदार असल्याची बाब कुठेही समोर आलेली नाही. त्यामुळे एस्ट्राजेनकाच्या लसीचा वापर थांबवू नये असेही त्यांनी सांगितले.


यावर आम्ही जेव्हा लंडनमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ.संग्राम पाटील यांच्या संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, भारतात जवळ १ कोटी लोकांना कोविशिल्ड लस दिली गेली आहे. पण भारतात अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच ब्रिटनमध्येही अनेकांना ऑक्सफर्ड-एस्ट्राझेन्काची लस दिली गेली आहे. पण तिथेही कोणत्याही रुग्णाला असा त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. युरोपिय मेडिसिन एजन्सी नावाच्या संघटनेने जानेवारीमध्ये ऑक्सफर्डच्या लसीला मान्ता दिली. आतापर्यंत ५० लाख लोकांना लस दिली गेली. भारतात एक ते दीड कोटी लोकांना ऑक्सफर्डची लस दिली गेली. पण भारतामधूनही अशी एकही तक्रार आलेली नाही. युरोपियन देशांमधील ५० लाख पैकी ३० जणांना रक्ताच्या गाठी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही देशांनी लगेच लसीकरण थांबवले. पण या गाठी लसीच्या कारणामुळेच झाल्या की एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये गाठी होणे आणि त्याने लस घेणे असा योगायोग झालेला दिसतो. पण रक्ताच्या गाठी लसीमुळे झाल्याचा पुरावा सापडलेला नाही. ऑक्सफर्डची लसच नाही तर इतर कोणत्याही लसींमुळे रक्ताच्या गाठी झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत, असे संग्राम पाटील यांचे म्हणणे आहे. रक्ताच्या गाठी होण्याचा त्रास हा ३० लाख लोकांमध्ये ३० जणांना होण्याचा होऊ शकतो. युरोपात ५० लाख लौकांपैकी ३० जणांचा झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात १० हजार लोकांमध्ये एखाद्याला त्रास झाला तर त्याला दुर्मिळ असे म्हणतात. त्यामुळे ५० लाख लोकांमध्ये फक्त ३० जणांना असा त्रास होणे हे दुर्मिळ आहे, असे डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात आम्ही मुंबईत गेली अनेक वर्ष प्रॅक्टीस करणाऱ्या डॉ. तायडे यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, "ज्या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना मधुमेह, दमा यासारखे त्रास आहेत, त्यांना लसीमुळे अशी एलर्जी होण्याची शक्यता असते. पण होईलचे असे नाही. पण कोरोनावरील दोन्ही लसी या अत्यंत सुरक्षित आहेत, असे मला वाटते."



ऑक्सफर्ड एस्ट्राझेन्काची लस भारतात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. या लसीचे नाल कोव्हीशिल्ड असे आहे. या लसीचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला तेव्हाच सीरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या परिणामांबाबत एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केले होते. ज्यांना अॅलर्जी, रक्ताशी संबंधित आजार आहेत किंवा ज्यांचे रक्त पातळ आहे, त्यांनी ही लस घेऊ नये. रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारी औषधे ज्यांना सुरू आहेत त्यांनी, गर्भवती महिला, स्तनदा माता, ज्यांनी कोरोनावरील दुसरी लस घेतली आहे, त्यांनी ही लस घेऊ नये. या लसीच्या पहिल्या डोसनंतर ज्यांना अॅलर्जी आली असेल, त्यांनी देखील ही लस घेऊ नये. कोव्हिशील्डचे साइड इफेक्ट्स देण्यात आले आहेत. यामध्ये इंजक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, सूजणे, इंजेक्शन दिलेली जागा लाल होणे, खाज सुटणे, तापणे येणे, अशक्तपणा वाटणे, या गोष्टींचा समावेश आहे. याचबरोबर इतर साईड इफेक्ट असू शकतात, असेही सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. त्याचबरोबर असा काही त्रास लस घेतल्यानंतर जाणवला तर तातडीने जिथे लस घेतली तिथे संपर्क करावा असे आणि सिरम इन्स्टिट्यूटलाही याबद्दल माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

एकंदरीतच भारतात आतापर्यंत जवळपास अडीच कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसी देण्यात येत आहेत. त्यामुळे कोविशिल्ड जवळपास १ कोटी लोकांना दिली गेली असेल तर अजूनही रक्ताच्या गाठी झाल्याची तक्रार आलेली नाही.

Full View
Tags:    

Similar News