पाकिस्तानी खेळाडूने अरशद नदीम ने 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचे केले अभिनंदन? जाणून घ्या व्हायरल ट्विटचं सत्य...
सध्या सोशल मीडियावर चर्चेचा तसेच कौतुकाचा विषय बनलेला खेळाडू नीरज चोप्रा ला जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचे भाला फेक खेळाडू अरशद नदीम याच्या नावाने असणाऱ्या एका अकाउंट वरून नीरज चोप्राला शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. आता हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या ट्विटमध्ये अरशदने नीरज चोप्रा याचं अभिनंदन करत त्याला आपला आदर्श असल्याचं म्हंटलं होतं. मात्र, काही काळानंतर हे ट्विट हटवण्यात आलं. अकाउंट तपासल्यानंतर ते बनावट असल्याचं आढळलं.
व्हायरल होत असलेल्या या ट्विटच्या स्क्रीन शॉटनुसार, हे ट्विट 2700 पेक्षा जास्त वेळा रीट्वीट केले गेले असून 13 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. ज्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं ते अकाउंट व्हेरीफाईड नाही. मात्र, त्याला 4800 च्या जवळपास फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीम हा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यासोबत टोकियो ऑलिम्पिकच्या भाला फेक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात खेळत होता. या सामन्यामध्ये त्याने पाचवे स्थान मिळवले.
या अगोदरही, खेळाडू अरशद नदीम आणि नीरज चोप्रा हे सोबत खेळले आहेत. तसेच टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्याआधी, अरशदने नीरजसोबतचा एशियन गेम्स 2018 चा एक जुना फोटो शेअर करत "एक सुंदर क्षण" असं लिहिलं होतं. नीरजने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. तर अरशदला कांस्यपदक मिळालं होतं.
भारतीय खेळाडू नीरज चोप्राने शनिवारी, 7 ऑगस्ट 2021 रोजी इतिहास रचत सुवर्णपदक जिंकले. त्याचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. भारताने अॅथलेटिक्समध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर हे पदक मिळवले आहे. नीरजने भाला फेक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात 87.58 इतक्या अंतरावर भाला फेकून इतिहासात आपले नाव कायमचे कोरले आहे.
निष्कर्ष:
अरशद नदीम याने भारतीय गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलेलं ट्विट हे बनावट अकाउंट वरून केलं असून अरशद नदीम याने ते ट्विट केलेलं नाही. तरी सोशल मीडियावर चुकीचा दावा करत ट्विट व्हायरल केलं जात आहे.