Fact Check: सोनिया गांधींच्या लायब्ररीत भारताला ख्रिश्चन देश बनवण्याची पुस्तक आहेत का?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटो मध्ये त्यांच्या मागे एक पुस्तकांचं कपाट आहे. ज्यात अनेक पुस्तके आहेत. त्या पुस्तकांमध्ये 'होली बायबल', 'हाउ टु कन्व्हर्ट इंडिया इनटु ख्रिश्चन्स नेशन' सारखी पुस्तके पाहायला मिळत आहेत.
@noconversion नावाच्या ट्विटर यूजरने हा फोटो ट्विट केला असून त्याला जवळपास 800 रिट्विट आहेत. आणखीन एका @asgarhid नावाच्या यूजरने हा फोटो ट्विट केल्यानंतर त्याला जवळपास ४०० पेक्षा जास्त रिट्विट आहेत.
तामिळनाडूतील BJP सचिव सुमती वेंकटेश आणि BJP समर्थक रेणुका जैन यांनी ही हा फोटो शेअर केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांचे ट्विट delete केले. पत्रकार तसेच BJP समर्थक मीना दास नारायण यांनी ही हा फोटो शेअर केला आहे.
ट्विटरवरचं नव्हे तर फेसबुक वरही सोनिया गांधी यांचा हा फोटो शेअर केला जात आहे. १ लाख फॉलोअर्स असलेला फेसबूक वरील 'सुदर्शन ग्रुप' आणि ३ लाख फॉलोअर्स असलेला 'PMO इंडिया न्यू दिल्ली' या ग्रुप वरही हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
एडिट केलेला फोटो-
निरिक्षण केल्यानंतर असं लक्षात येत की, फोटोमध्ये डाव्याबाजूच्या पुस्तकावर @noconversion असं लिहिलेलं आहे. @noconversion हे एक ट्विटर हँडल आहे. त्यामुळे मूळ फोटोसोबत फेरबदल केल्याची शंका निर्माण होते.
या फोटोचं गुगलच्या रिव्हर्स सर्चमध्ये सर्च केल्यानंतर २०२० साली काँग्रेसने केलेली एक व्हिडिओची पोस्ट सापडली. ज्यात सोनिया गांधी ह्या केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे आंदोलन आणि पेट्रोल दर वाढ याबद्दल जाब विचारात होत्या. राहुल गांधींनी सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केला होता.
काय आहे सत्य?
सोनिया गांधींच्या अनेक व्हिडिओमध्ये हे पुस्तकांचं कपाट पाहायला मिळतं. अल्ट न्यूजने व्हायरल झालेल्या फोटोंमधील पुस्तकांची व्हिडिओतील पुस्तकांसोबत तुलना केली असता. 'होली बायबल' आणि 'हाउ टु कन्व्हर्ट इंडिया इनटु ख्रिश्चन्स नेशन' सारखी पुस्तके तिथे नव्हती.
तसेच ईसा मसीहा ची मूर्ती सुद्धा तिथे नव्हती. त्यामुळे व्हायरल झालेला फोटो हा एडिट केलेला असल्याचं स्पष्ट होते.