Fact Check : राहुल गांधी यांच्या सभेला जमलेल्या गर्दीचा फोटो खरा आहे का?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेशी संबंधित अनेक फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये जनसभेला संबोधित केले होते. यावेळी प्रचंड मोठा जनसागर जमल्याचा दावा करणारे दोन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण खरंच राहुल गांधी यांच्या सभेला एवढी गर्दी जमली होती का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी केलेले फॅक्ट चेक
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये आहे. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र याबरोबरच या यात्रेशी संबंधित अनेक फेक न्यूज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यापार्श्वभुमीवर अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी यांच्या जनसभेला मोठी गर्दी जमल्याचा दावा करत दोन फोटो शेअर केले आहेत. काँग्रेस नेत्या ऋतू चौधरी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, तस्वीर बोलती है, #BharatJodoYatra
गुजरात काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा यांनीही हाच दावा केला आहे की, हे फोटो भारत जोडो यात्रेचे आहेत. तसेच या फोटोत दिसणारी गर्दी ही झालावाडमध्ये राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जमलेली आहे, असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील आमदार मनोज चावला यांनीही या फोटोतील गर्दी राजस्थानमधील सभेसाठी जमलेली आहे, असा दावा फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
हा आजचाच राजस्थानमधील राहूल गांधीच्या भारत जोडो पदयात्रेचा फोटो आहे आणि आजच गुजरात हिमाचल विधानसभेचे निकाल मात्र भाजपच्या बाजूने येत आहेत अवघड आहे सर्व, अशी फेसबुक पोस्ट अरविंद गायकवाड यांनी केली होती. ही पोस्ट महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी शेअर केली आहे.
मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने आणखी काही ट्वीट पाहिले. त्यामध्ये ही गर्दी राहुल गांधी यांच्या राजस्थानमधील सभेची नसल्याचे म्हटले होते. तर ही गर्दी जयगुरुदेव यांच्या श्रध्देमुळे उसळलेला जनसैलाब असं या फोटोवर म्हटलं आहे.
पडताळणी (Reality Check)
व्हायरल होत असलेला फोटो मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केला. यामध्ये मिळालेल्या सर्च रिझल्टमध्ये पंकज महाराजांचे ट्वीटर अकाऊंट मिळाले. त्यामध्ये लिहीले आहे की हा फोटो 3 डिसेंबर रोजी झालेल्या गुरु महाराजांच्या भंडारा कार्यक्रमातील आहे.
मॅक्स महाराष्ट्रने या दोन्ही फोटोंची तुलना करुन त्यातील समान धागे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये व्हायरल होत असलेला फोटो आणि भंडारा कार्यक्रमाच्या फोटोत समानता दिसून येत आहे.
दुसऱ्या फोटोचे सत्य शोधण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने पंकज महाराजांचे ट्विटर अकाऊंट पाहिले. यामध्ये पंकज महाराज यांनी जय गुरुदेव 3 Dec 2022, जयगुरुदेव आश्रम मथुरा येथील हा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.
या ट्वीटमध्ये दिसत असलेले वेगवेगळ्या अँगलमध्ये घेण्यात आले आहेत. ते फोटो विचारपूर्वक पाहिल्यास त्यामध्ये दुसरा व्हायरल फोटोतील काही वस्तू एकमेकांशी मिळत्या-जुळत्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रच्या टीमच्या टीमला हे दोन्ही फोटो एकाच ठिकाणचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे फोटो भारत जोडो यात्रेचे नसून मथुरा येथे पार पडलेल्या जय गुरूदेव आश्रमाच्या भंडाऱ्याचे असल्याचे दिसत आहे.
मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने युट्यूबवर काही की-वर्ड्स शोधले. त्यामध्ये पंकज महाराजांचा मथुरा येथे झालेल्या एका सत्संगाचा एक व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ 3 डिसेंबर 2022 रोजी लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला होता. या व्हिडीओतील अनेक फ्रेम या व्हायरल फोटोशी मिळत्या-जुळत्या आहेत.
त्यापैकी 40 मिनिट 10 सेकंदाची लाईव्ह स्ट्रीम फ्रेम व्हायरल असलेल्या फोटोतील फ्रेमशी साम्य दाखवत आहे.
काय आहे सत्य? (What is Fact)
वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला तर काँग्रेसशी संबंधित काही नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले फोटो हे राजस्थानमधील झालावाड येथील नसून ते मथुरा येथील जय गुरुदेव आश्रमाच्या सत्संगातील आहेत. मात्र काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या दाव्यासह हे फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनीही चुकीचा दावा केलेली फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.