लंपी रोगाने हजारो गायी मृत पावल्याचा तो व्हिडीओ खरा आहे का?

कोरोना नंतर जर गेल्या काही काळात कोणत्या आजाराची चर्चा आणि दहशत पाहायला मिळतेय तर तो म्हणजे लंपी व्हायरस... देशातल्या ७ राज्यांमध्य़े गायी आणि बैलांना या आजाराची लागण होतेय. अशात मोकळ्या जागेवर हजारो गायी आणि बैल मरून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो खरा आहे की खोटा? नेमकं सत्य जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचं हे फॅक्ट चेक!;

Update: 2022-09-22 03:00 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराने बळीराजा त्रस्त आहे. गाय आणि बैल यांच्या शरीरावर गोल आकाराच्या जखमा होतात. आजाराचं स्वरूप जरी गंभीर असलं तरी फारशा जनावरांचा मृत्यू या आजारात झालेला नाही. सध्याच्या घडीला देशातील महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. लंपी हा आजार कॅप्रीपॉक्स वंशाच्या विषाणूमुळे होतो आणि माश्या, डास यांच्यामाध्यमातून हा व्हायरस जनावरांमध्ये पसरत आहे. याच पार्श्वभुमीवर आता गाय आणि बैल यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये जनावरांचे तडफडत होणारे मृत्यू दिसत आहेत. नेमकं सत्य काय आहे चला जाणून घेऊयात.

समाजमाध्यमांवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रिषभ राठोड या नावाने एका व्यक्तीचं फेसबुक ला अकाऊंट आहे. ज्याने #Save cows म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एका मोकळ्या माळरानात अनेक जनावरं मृतावस्थेत असलेली पाहायला मिळत आहेत. काही सेकंदात या व्हिडीओमध्ये काही पशूंचे तडफडत होणारे मृत्यू दाखवले गेले आहेत. काही फोटोज दाखवले गेलेत ज्या फोटोंमध्ये जनावरांना लंपी आजार झाल्याचं दिसत आहे तर काही जनावरांना नाही.

Full View

आता या व्हिडीओ मध्ये जे सुरवातीचं दृश्य आहे तसाच एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता आणि जो फोटो लावत दैनिक भास्कर, न्युज ड्रम्स यासारख्या माध्यमांनी बातम्या देखील प्रसिध्द केल्या. दैनिक भास्कर मध्ये धरती मातेच्या कुशीत मौन चित्कार या मथळ्यासह बातमी छापून आली आहे. ज्यामध्ये शासनाने लंपी आजाराने मृत जनावरे मोकळ्या ठिकाणी टाकली जात असल्याचा तपशील आहे. 



 


परंतू बिकानेरचे जिल्हाधिकारी तसेच दंडाधिकारी कार्यालयाने ही बातमी दिशाभूल करणारी आहे असं सांगत दैनिक भास्कर वृत्त पत्राचं कात्रण देखील सोबत पोस्ट केलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या ट्विटमध्ये दैनिक भास्कर मध्ये छापून आलेली बातमी दिशाभूल करणारी आहे असं सांगितलं आहे यात काही महत्वाची तथ्य लपवली गेल्याचा आरोप या कार्यालयाने केला आहे. जोडबीड चं हे क्षेत्र मागील ५० वर्षांपासून गिधाडांच्या संरक्षणासाठी आरक्षित आहे. नगरपालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून मृत पशूंना टाकण्याचं कंत्राट दिलं जात आहे. लंपी आजाराने गेलेल्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट नियमानुसार लावली जात आहे असं जिल्हाधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे.


या शिवाय न्युज ड्रम या वेब पोर्टल ने सुध्दा या व्हिडीओबद्दल बातमी केली आहे. या बातमीमध्ये त्यांनी राजस्थानमध्ये जवळपास ४५ हजाराहून अधिक जनावरं लंपी मुळे मृत पावली आहेत शिवाय १० लाखांहून अधिक जनावरांना याची लागण झाल्याचं वृत्त त्यांनी दिलं आहे. शिवाय यामध्ये व्हिडीओदेखील पोस्ट केलेला पाहायला मिळतो. 


पण या बातमीतील व्हिडीओ आपल्याला रिषभ राठोड यांच्या व्हिडीओमध्ये सुरूवातीलाच पाहायला मिळतो. पण त्यानंतर आपल्याला काही फोटोज आणि व्हिडीओज या त पाहायला मिळतात. हे सर्व फोटो आणि व्हिडीओची विश्वासार्हता नाही.


त्या व्हिडीओतील एका फोटोत एक महिला आपल्या मृत गायीवर डोकं ठेवुन पडल्याचं पाहायला मिळत आहे हा फोटो राजस्थानमध्ये व्हायरल होत आहे. मुळात जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर लंपी हा आजार त्वचेचा आजार आहे त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर विशिष्ट आकाराच्या जखमा आपल्याला पाहायला मिळतात शिवाय जनावरांची तब्येतही खालावते. पण या फोटोतील मृत गायीवर आपल्याला कोणतीही जखम झालेली पाहायला मिळत नाहीये. शिवाय मृत गायीचं शरीर देखील सामान्य आहे त्यामुळे सदर गायीचा मृत्यू लंपी मुळेच झालेला आहे असं म्हणता येणार नाही. तसेच हा फोटो आत्ताचाच आहे असंही म्हणता येणार नाही.

शिवाय आणखी काही व्हिडीओज आणि छायाचित्र देखील संबंधीत व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे पण या छायाचित्रांची देखील विश्वासार्हता देता येत नाही. 








महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात

लंपी या त्वचेच्या आजाराचे मोठ्या प्रमाणात राजस्थान मध्ये परिणाम झालेले पाहायला मिळतात. पण महाराष्ट्रात मात्र लंपी आजाराची इतकी गंभीर परिस्थिती नाही. महाराष्ट्रात लंपी आजाराची संक्रमण आतापर्यंत फक्त २६६४ जनावरांना झालं आहे तर ३३८ गावांमध्ये रुग्ण पशू आढळले आहेत.

राजस्थानमध्ये परिस्थिती गंभीर

देशात ७ राज्यांमध्ये जनावरांना लंपी व्हायरसचं संक्रमण झालं असून राजस्थान मध्ये परिस्थिती गंभीर आहे. आतापर्यंत ४५ हजार पेक्षा अधिक जनावरं लंपी विषाणू ने मृत्यूमुखी पडली असून दहा लाखांहुन अधिक जनावरांना लागण झाली आहे. त्यामुळे बिकानेर येथील एका मोकळ्या जागेत सर्व पशूंना उघड्यावर गिधाडांना खाद्य म्हणून टाकण्यात आलं आहे. ती जागा गिधाडांसाठी राजस्थान सरकारकडून राखीव ठेवण्यात आली आहे.

नेमकं सत्य काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा सुरूवातीचा भाग हा राजस्थानमधील असून तो खरा आहे. पण व्हिडीओमधील उर्वरीत फोटो आणि व्हिडीओ यांची विश्वासार्हता नाही. हा व्हि़डीओ राज्यातील नसून राजस्थानच्या बिकानेर मधील आहे. 

Tags:    

Similar News