रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून या व्हिडीओ सोबत असा दावा केला जात आहे की, "श्री रामजन्मभूमी अयोध्येमध्ये रेल्वे स्टेशन बनवून तयार झालं आहे." अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ फेसबुकवरही प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि शेअर्स सुद्धा मिळत आहेत.
काय आहे सत्य
हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर असं आढळून आलं की, हा व्हिडिओ सुरु झाल्यानंतर ३३ सेकंदावर 'गुजरात टुरिझमचा' लोगो दिसून येतो. यासोबतच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका ट्विटर यूजरने हे रेल्वे स्टेशन गांधीनगरचं असल्याचं सुद्धा म्हटलं आहे.
'अहमदाबाद-हिम्मतनगर-उदयपूर ब्रॉड गेज कन्व्हर्जन' नावाच्या फेसबुक पेजवरही ४ जुलैला "गांधीनगर रेल्वे स्टेशन" या कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणाची सत्यता पडताळण्यासाठी अल्ट न्यूजने स्टेशनचा प्रत्यक्ष दौरा केला.
दरम्यान व्हायरल व्हिडिओवरून घेतलेल्या फोटोची आणि गांधीनगर रेल्वे स्टेशनवर घेतलेल्या फोटोची तुलना केल्यानंतर स्पष्टपणे हा व्हिडीओ गांधीनगरचा असल्याचं स्पष्ट होते..
अशाप्रकारे गांधीनगर रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ अयोध्या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरण केल्याचा व्हिडिओ असल्याचं सांगत व्हायरल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अयोध्या जंक्शन उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील दोन रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दरम्यान सरकारने २०१७ - १८ रोजी अयोध्या जंक्शनला राम मंदिर मॉडेल प्रमाणे बनवण्याची मंजुरी सुद्धा दिली होती.
२८ सप्टेंबर २०२० रोजी जारी केलेल्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या कामाचा संपूर्ण खर्च १०४.७७ कोटी रुपये इतका असून २०२१ - २२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं ध्येय ठेवण्यात आल्याचं सुद्धा प्रसिद्धीपत्रकात म्हंटल आहे.
नुकतंच वाराणसीमधील मणी मंदिराचा एक व्हिडिओ काशी विश्वनाथ मंदिर नूतनीकरणाचा सांगत व्हायरल झाला होता.