Fact Check: सोनिया गांधींसोबत फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती कोण आहे?

Update: 2021-06-09 13:15 GMT

सध्या सोनिया गांधी यांचा एका पुरुषासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. फोटोमध्ये सोनिया गांधी यांच्या सोबत असलेला व्यक्ती हा 'ओत्तावियो क्वात्रोची' असल्याचं सांगत नेटकरी हा फोटो शेअर करत आहेत. 'ओत्तावियो क्वात्रोची' हा सोनिया गांधींचा जवळचा मित्र असल्याचं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये गांधी कुटूंब हे मुस्लिम असल्याचा खोटा दावा देखील करण्यात आला आहे. म्हणूनच हा फोटो शेअर करताना पोस्टमध्ये राहुल गांधीचं नाव राहुल गांधी ऐवजी राहुल खान असं लिहिण्यात आलं आहे.

अत्यंत स्त्रीविरोधी अँगलने केलेल्या या पोस्ट्समध्ये सोनिया गांधीचं 'कॅबरे डान्सर' असं वर्णन केलं आहे. सोबतच असा दावा देखील केला आहे की, राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधींनी 57 वेळा 'ओत्तावियो क्वात्रोची' यांची भेट घेतली होती. ट्विटरवरचं नव्हे तर फेसबुक वरही हे फोटो व्हायरल करण्यात आला आहे. अनेकजण फेसबूक वरही हा फोटो शेअर करत आहेत.

काय आहे सत्य...?

या फोटोचं एक साधारण रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर या फोटोची सत्यता लगेच कळून येते. 'लेटेस्टली' आणि 'द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या' रिपोर्टमध्ये हा फोटो पाहायला मिळाला, फोटोचं श्रेय पीटीआयला (PTI) देण्यात आलं होतं. कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं होतं, "काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल गांधी" 8 एप्रिल 1996 रोजी झालेल्या विशेष संरक्षण समूहाच्या 'रायझिंग डे' या समारंभात हा फोटो काढण्यात आला होता. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ओटाव्हिओ क्वात्रोची हा एक इटालियन व्यावसायिक (BISSNESSMEN) होता. बोफोर्स घोटाळ्यात त्यांची प्रमुख भूमिका असल्याचं देखील समजतं. क्वात्रोची हे गांधी घराण्याचे जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. 1999 मध्ये सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचं नाव देखील होतं. ४ मार्च २०११ रोजी दिल्लीच्या कोर्टाने सीबीआयला हा खटला मागे घेण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर क्वात्रोची यांना पैशांच्या हस्तांतरणावरुन झालेल्या आरोपातून मुक्त करण्यात आलं. अशा प्रकारे २५ वर्ष जुन्या बोफोर्स घोटाळ्यावर विराम लागला. मात्र, असं म्हंटलं जात की, १९८९ च्या निवडणुका याच घोटाळ्यामुळे काँग्रेसच्या हातून निसटल्या. एकूणच, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा सोनिया गांधी व त्यांचा मुलगा राहुल गांधी यांचा असल्याचं निश्चित असून हा फोटो खोटा दावा करत व्हायरल केला जात आहे. या अगोदरही अनेकदा सोनिया गांधी यांच्याबद्दल स्त्री-विरोधी अँगलमधून चुकीची माहिती पसरवल्याचे प्रकार घडले आहेत.

Tags:    

Similar News