Fact Check : ब्राम्हण जिल्हाधिकाऱ्याविरोधात केरळमध्ये मुस्लिम एकवटले आहेत का?

केरळमध्ये ब्राम्हण जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात मुस्लिम समाज एकवटल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा....

Update: 2022-08-06 02:55 GMT

सोशल मीडियावर केरळमध्ये झालेल्या आंदोलनाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये अलाप्पुझा या मुस्लिमबहूल भागात ब्राम्हण जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याच्या विरोधात मुस्लिम समाजाने विरोध प्रदर्शन केल्याचा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. मात्र हाच व्हिडीओ केरळमधील अलेप्पी येथील असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

उजव्या विचारसरणीचा राष्ट्रवादी पक्ष असलेल्या इंदु मक्कल काची यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, अलेप्पी केरळमध्ये काल मुस्लिमांनी नव्या ब्राम्हण जिल्हाधिकाऱ्याचा विरोध करत मोर्चा काढला होता. मात्र MSM ने यावरून अंग झटकत यासाठी ABVP कर्नाटकने हायलाईट केलं असल्याचं म्हटलं हे. या ट्वीटला 7 हजार 700 लाईक्स तसंच या ट्वीटवर 414 लोकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. याबरोबरच हे ट्वीट पाच हजार लोकांनी रिट्वीट केले आहे. (अर्काईव्ह लिंक)

आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायजर वीकली यांनी हा व्हिडीओ याच दाव्यासह पोस्ट केला आहे. तर या व्हिडीओला 3 हजार लाईक्स मिळाले आहेत. (अर्काईव्ह लिंक)

ट्वीटर वापरकर्ता @Indian_analyzer ने सुध्दा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. (अर्काईव्ह लिंक)

भाजप नेते कपील मिश्रा यांनी कोणत्याही प्रकारचा दावा केला नाही. मात्र हा व्हिडीओ ट्वीट करत हे कृत्य देशाची एकता आणि अखंडता यासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

याबरोबरच फेसबुक पेज योगी आदित्यनाथ द फ्यूचर पीएम ऑफ इंडिया यावरून एक फोटो पोस्ट करून हे लोक अलाप्पुझाचे कलेक्टर हिंदू असल्याने त्यांच्या नियुक्तीचा विरोध करत असल्याचे म्हटले आहे.


 



पडताळणी :

व्हिडीओवर अनेक कमेंटस आल्या आहेत. त्यामध्ये हा व्हिडीओ अलेप्पी नसून मलप्पुरम असल्याचे म्हटले आहे. तसेच या ट्वीटवर करण्यात आलेल्या कमेंटस् मध्ये म्हटले आहे की, जिल्हाधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांची अलाप्पुझा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नशेत गाडी चालवल्यामुळे अपघात झाला होता. तर या अपघातामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी मोर्चा काढला होता. मात्र ही घटना सोशल मीडियावर धार्मिक रंग देऊन पसरवण्यात आली आहे.

यासंदर्भात अल्ट न्यूजने आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता अल्ट न्यूजला 8 जून 2020 चा द हिंदू या वृत्तपत्राचा एक रिपोर्ट मिळाला. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हाधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांना नशेत गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात पत्रकार के एम बशीर यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी असलेल्या श्रीराम व्यंकटरमन यांना अटक करण्यात आली होती. तर व्यंकटरमन यांच्यावर भादंवि कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर श्रीराम व्यंकटरमन यांना जामीनही मिळाला होता.

व्हिडीओवर केलेल्या कमेंटस् मुळे हे ठिकाण मलप्पुरम असल्याचे स्पष्ट झाले. तर अल्ट न्यूजने व्हिडीओमध्ये दाखवलेल्या ठिकाणाला जिओलोकेट केले. व्हिडीओच्या फुटेजमध्ये एक ठिकाणी ग्रीनस्क्रॅब नावाच्या दुकानाचे पोस्टर दिसून येत आहे. तर त्या पोस्टरवर अप हिल मलप्पुरम असं लिहीलं आहे. त्यामुळे व्हिडीओतील ठिकाण हे मलप्पुरम असल्याचे स्पष्ट झाले.




व्हिडीओमध्ये पॉली डेंटल क्लिनिक आणि सिंधू स्टुडिओचे साईनबोर्डही दिसून येत आहेत.




 



 

दिशादर्शक फलकावर दाखवण्यात आलेले दोन्हीही ठिकाणं हे अवघ्या दोन मीटरचे अंतर गुगल मॅपवर दाखवत आहे. त्यामुळे यावरून हे स्पष्ट होत आहे की, हा व्हिडीओ अलेप्पी येथील नसून तो मलप्पुरम येथील आहे.

अल्ट न्यूजने केरळमधील मलप्पुरम येथील मुस्लिम जमातच्या जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधला. यावेळी महासचिव श्री पी एम मुस्तफा यांनी सांगितले की, मलप्पुरमचे जिल्हाधिकारी दोन वर्षापुर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या मृत्यूचे आरोपी आहेत. त्यावेळी केरळमधील 14 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. मात्र हा व्हिडीओ मलप्पुरम येथील आहे. मी पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून व्हिडीओ मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण त्या व्हिडीओमधून खोटं आणि धार्मिक द्वेष पसरवला जात आहे.

याव्यतिरिक्त अल्ट न्यूजला मलप्पुरम घटनेशी संबंधीत वार्तांकन केलेले काही रिपोर्ट मिळाले. त्यापैकी 30 जुलै रोजी द हिंदू या वर्तमानपत्राने दिलेल्या रिपोर्टमधील माहितीनुसार केरळमधील मुस्लिम समाज आणि इतर संघटनांनी अलाप्पुझाचे जिल्हाधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्याविरोधात एक रॅली काढली होती. तर श्रीराम व्यंकटरमन यांच्याकडून दोन वर्षापुर्वी नशेत गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात पत्रकार बशीर यांचा मृत्यू झाला होता. या आरोपांमुळे श्रीराम व्यंकटरमन यांची अलाप्पुझा येथे करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम जमातचे जिल्हा अध्यक्ष कुट्टंबरा अब्दुर्रहमान दरीमी यांनी भुषवले होते. यावेळी जिल्ह्यातील नेते पी. सैंदालवी चेंगारा, पी.एम मुस्तफा कोदूर, सी के हसैनार सकाफी, अब्दुर्रजाक सकाफी आणि पत्रकार बशीर यांचा भाऊ के एम अब्दुर्रहमान यांची भाषणं झाली.




यासंदर्भात आणखी काही विरोध प्रदर्शनसुध्दा झाले होते. काँग्रेस पक्षानेही अलाप्पुझाचे जिल्हाधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्या नियुक्तीचा विरोध केला होता. तर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केले. तसंच केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट यांच्या नेतृत्वातही जिल्हाधिकारी व्यंकटरमन यांची नियुक्ती रद्द करण्यासंदर्भात विरोध प्रदर्शित केला होता.

नागरिक, पत्रकार आणि राजकीय पक्षांच्या विरोधानंतर अखेर केरळ राज्य सरकारने अलाप्पुझाचे जिल्हाधिकारी व्यंकटरमन यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर राज्य सरकारने अलाप्पुझाच्या जिल्हाधिकारीपदी अनुसूचित जाती विकास विभागाचे निर्देशक वी आर के तेजा मायलावरापु यांची नियुक्ती केली. तसंच नियुक्त केलेली व्यक्तीसुध्दा हिंदू आहे आणि त्यांना कोणत्याही विरोधाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे हे सिध्द होत आहे की, विरोध प्रदर्शनात धार्मिक अँगल नव्हता.

निष्कर्ष 

एकूण वरील सर्व माहितीचा आधार घेतला तर मलप्पुरममध्ये केरळमधील मुस्लिम आणि इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली हिंदू जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात धार्मिक द्वेषातून मोर्चा काढल्याचा खोटा दावा पसरवला जात आहे. तसेच व्हायरल व्हिडीओतील दृष्य हे अलेप्पी येथील नसून ते मलप्पुरम येथील असल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags:    

Similar News