व्हायरल व्हिडिओमधला भाजीपाला खरचं ताजा आणि टवटवीत दिसतो का?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एका टोपल्यातल्या फेसाळलेल्या पाण्यात सुकलेला भाजीपाला टाकला असता, तो ताजातवाना होताना बघायला मिळतंय. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की व्यापाऱ्यांकडून बाजारात विकला जाणारा भाजीपाला अशा प्रकारच्या केमिकलचा वापर करून ताजा आणि टवटवीत ठेवला जातो.;

Update: 2021-07-24 17:47 GMT

फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर अक्षरशः या व्हायरल दाव्यांनी धुमाकूळ घातला आहे. गायत्री शेतकरी मंडळाचे सुनिल रामचंद्र तावरे(माळेगाव बुद्रुक,ता. - बारामती जि. - पुणे) यांनी हा व्हिडीओ Max Maharashtra ला फॉरवर्ड करून त्याची सत्यता पडताळण्याची विनंती केली.

पडताळणी:

व्हॉटसअपवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी संशोधन सुरु केलं असता सर्वप्रथम आम्हाला सोशल मीडियावरच समीर आठवले यांच्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडिओ मिळाला.

https://www.facebook.com/100001227800928/videos/1427731724279121/

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ राजू बागुल या कृषी उत्पादनांची मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीने शेतकऱ्यांना कंपनीचे प्रोडक्ट किती दमदार आहे हे दाखविण्याच्या हेतूने केला होता.

'सदर व्हिडिओतील प्रोडक्टचे नाव ACTIVE असून ते केमिकल विरहित सिलिकॉन बेस नॉन आयोनिक स्टिकर आहे. save eco organic या कंपनीकडून या प्रोडक्टची निर्मिती केली जात असून कंपनी केवळ ऑरगॅनिक प्रोडक्टची निर्मिती करते. प्रोडक्ट केमिकल नसल्याने ते हानिकारक नाही.' असा दावा त्यांनी केला होता.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही सदर प्रोडक्टविषयी अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला. सर्वप्रथम तर आम्ही 'सेव्ह इको ऑरगॅनिक'च्या वेबसाईटला भेट दिली. कंपनीच्या प्रोडक्टच्या यादीत आम्हाला ACTIVE+ हे प्रोडक्ट बघायला मिळाले.

ECO POWER POWER ACTIVE PLUS

ACTIVE+ एक सर्फॅक्टंट स्टिकर आहे. सर्फॅक्टंट म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात मिसळल्यावर जे द्रावण तयार होते, ते वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर सहजरित्या पसरते. म्हणजेच वनस्पतीच्या पानावर तणनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करताना फवारणीच्या द्रावणामध्ये सर्फॅक्टंटचा वापर केल्यास फवारणी द्रावण पानावर अधिक चांगल्या प्रकारे पसरण्यास मदत होते.

बऱ्याच वेळा शेतामध्ये फवारणी नंतर पाऊस पडल्यावर फवारणीची औषध धुतली जाण्याची भीती असते. मात्र फवारणीच्या वेळी सर्फॅक्टंटचा वापर केलेला असेल तर फवारणीनंतर लगेच पाऊस पडला तरी पुन्हा फवारणीची आवश्यकता नाही. कारण सर्फॅक्टंटमुळे पानांवर फवारण्यात आलेली औषधी पानावर चिटकून राहण्यास मदत होते आणि फवारणी धुतली जात नाही.

ज्या कीटकनाशकाची अथवा तणनाशकाची फवारणी करायची आहे, ते पाण्यात व्यवस्थितरित्या मिसळण्यासाठी देखील सर्फॅक्टंट उपयोगी ठरते. शिवाय फवारणीपूर्वी सर्फॅक्टंट पाण्यात मिसळल्यास पानावर औषधी चांगल्या प्रकारे पसरते. वनस्पतीच्या पानांवर पडलेला प्रत्येक थेंब पानावर व्यवस्थितरीत्या पसरवण्याचे काम सर्फॅक्टंट करते. त्यामुळे पाने कुठेही कोरडी न राहता चांगल्या प्रकारे भिजतात. शिवाय वनस्पतीमध्ये पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात.

संतोष शिरसाट यांच्या माहितीप्रमाणे 'Active +' हे प्रॉडक्ट 'नॉन आयोनिक' आहे. असे असू शकते का यासाठी आम्ही पडताळा केला असता जागतिक बाजारातही असे विविध कंपन्यांचे Activator उपलब्ध असून त्यात प्रती लिटर ९०० ग्राम नॉन आयोनिक सर्फॅक्टंट टाकले जाते. 'सायन्सडायरेक्ट'नुसार नॉन-आयोनिक सर्फॅक्टंट विषारी नसतात.

पडताळणी दरम्यान आम्हाला save eco organic च्या युट्युब चॅनेलवर ACTIVE+ विषयीचा डेमो व्हिडीओ बघायला मिळाला. या व्हिडिओमध्ये देखील व्हायरल व्हिडिओतल्या प्रमाणेच वनस्पती अगदी ताजी होताना बघायला मिळतेय.

याबाबत आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विकास भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता अशा पद्धतीने विद्यापीठाने भाज्या टवटवीत करण्यासाठी रसायनांचा वापर करावा अशी शिफारस केलेली नाही. स्टिकरचा वापर हा हा प्रामुख्याने तणनाशक कीटनाशकांच्या वापरात शिफारस केला जातो. अधिक प्रमाणात कीटकनाशक किंवा कृषी रसायनांचा वापर केल्यास तो आरोग्यास घातक ठरू शकतो असे डॉ. भालेराव म्हणाले.

Full View

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती अरुण सूर्यवंशी आहे. त्यांच्याशीही आम्ही संवाद साधला दोहोंच्या बोलण्यातून असे समजले की 'Active+' हे प्रॉडक्ट १००% organic म्हणजेच सेंद्रिय आहे. तसेच त्यांनी ते 'residue free असल्याचं सांगितलं.

'फायनान्शियल एक्स्प्रेस'नुसार 'residue free' म्हणजे अगदीच १०० टक्के केमिकलविरहीत आहे असे म्हणता येणार नाही परंतु त्याची मात्रा एवढ्या कमी प्रमाणात असते की त्याने मानवी शरीरास काहीच त्रास होऊ शकणार नाही.

वस्तुस्थिती:

'max maharashtraच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओसोबत केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहे. व्हायरल व्हिडिओत ज्या फेसाळ पाण्यात टाकल्याने भाजीपाला ताजा आणि टवटवीत होताना बघायला मिळतोय, ते फेसाळ पाणी म्हणजे सर्फॅक्टंट मिसळलेले पाणी आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्फॅक्टंट उपलब्ध आहेत. फवारणीच्या वेळी फवारणी द्रावणात मिसळल्यास ती उपयुक्त ठरतात.केवळ प्रॉडक्टच्या डेमोसाठी केलेला तो प्रयोग होता. त्यात वापरलेल्या ते 'Active+' च्या अर्धा लिटर बाटलीची किंमत ५७० रुपये आहे. व्यापाऱ्यास भाज्या टवटवीत ठेवण्यासाठी एवढे महाग प्रॉडक्ट वापरणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीही खबरदारी म्हणून बाजारातून आणलेल्या भाज्या व्यवस्थितपणे धुतल्या शिवाय, स्वच्छ केल्या शिवाय वापरू नयेत एवढे तर आपण करूच शकतो.

व्हिडीओची सत्यता काय?

आम्ही या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ सत्य असून यामध्ये कोणतीही एडिटींग किंवा छेडछाड केलेली आढळली नाही. व्हिडिओ च्या आधारे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कंपनी आणि तिच्या दाव्यावर कारवाई केल्याचे समजत आहे.

भाजीपाला किंवा फळे घेताना काय काळजी घ्याल?

प्रत्येक भाजी किंवा फळाला स्वतःचा एक गंध असतो. त्यामुळे भाजीपाला घेताना त्याचा गंध घेऊन पाहा. अनेकदा काही रसायनांमुळे भाजीपाल्याचा गंध जातो. किंवा कधी कधी रसायनांचा वेगळा गंध येतो. असा भाजीपाला घेऊ नका.अनेकदा फळं चमकदार आणि फ्रेश दिसण्यासाठी त्याला पॉलिश केली जाते. त्यामुळे फळ घेताना ती चोळून पाहा. तुमच्या हाताला पॉलिश किंवा पावडर सारखा पदार्थ लागला ताबडतोब दक्ष राहायला हवे.

Tags:    

Similar News