Fact check: मोदींच्या फोननंतर पुतीन यांनी भारतीयांसाठी 6 तास युद्ध थांबवले का?
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी बातचीत केली म्हणून पुतीन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी ६ तास युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. पण हा दावा खरा आहे का, जाणून घेण्यासाठी वाचा...
रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. मात्र हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी बातचीत केली म्हणून पुतीन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी ६ तास युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.
हा नवीन भारत आहे!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 3, 2022
युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं.
पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं.
रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं. pic.twitter.com/rf3i0Ad8k7
अशाच प्रकारचा साम टीव्ही या वृत्तवाहिनेने केला आहे.
सकाळ या वृत्तपत्रातही रशियाने ६ तास युध्द थांबवल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक नितीन ए गोखले या व्हेरिफाईड ट्वीटर अकाऊंटवरूनही रशियाने भारतीयांच्या सुटकेसाठी ६ तास युध्द थांबवल्याचा दावा केला आहे.
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोननंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीयांना सुरक्षित युक्रेनबाहेर काढण्यासाठी सहा तास युध्द थांबवत असल्याची घोषणा केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या पाऊलाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार म्हणत त्यांचे कौतूक केले जात आहे. मात्र या दाव्यात तथ्य आहे का?
पडताळणी :
रशिया युक्रेन युध्दादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना फोन केला. त्यानंतर पुतीन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहा तास युध्द थांबवत आहे, असे म्हटल्याचा दावा करण्यात येत होता. त्याची सत्यता पडताळण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितले.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मोदींचा जयजयकार करणारे ट्वीट व्हायरल झाले आहेत. या ट्वीटमध्ये मोदी यांच्यामुळे युक्रेन रशिया युद्ध ६ तास थांबल्याचा दावा केला जात आहे.
काय म्हटलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने?
बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना तात्काळ खारकीव शहर सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेचच दुसरी सूचना जारी करण्यात आली ज्यामध्ये, खारकीवमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीचा पुनरुच्चार करत भारतीय नागरिकांनी "खारकीव ताबडतोब सोडले पाहिजे" यावर भर दिला गेला होता.
मात्र या ट्वीटमध्ये कुठंही ६ तास युद्ध थांबवण्यात येत असल्याचं म्हटलेले नाही. तसंच मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात देखील रशियाने किंवा भारताने असा दावा केलेला नाही. त्यामुळे, पुतीन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी ६ तास युद्ध थांबवल्याचा सोशल मिडीयावरील दावा खोटा ठरतो. तसंच हा व्हायरल होणारा दावा परराष्ट्र मंत्रालयाने देखील फेटाळला आहे.