सर्वांगिण विकासाचा मुद्दा असो कि शेतीच्या विकासाचा विकासदर आणि दाव्यांमधे भाजपशासीत राज्ये नेहमीच वादात सापडतात. आताही असेच झाले आहे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचा लसून उत्पादन आणि उत्पन्नबद्दलचा एक व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. यामधे सुरवातील एका एकरात तीनशे क्विंटल लसून उत्पादन आणि तीन लाखाच्या उत्पन्नाचा दावा करण्यात आला, याच व्हिडीओमध्ये तीन एकरात तीनशे क्विंटल आणि तीन लाख उत्पन्नाचा दावा करण्यात आला होता. मॅक्स महाराष्ट्रने या दाव्याची पळताळणी पु्ण्याजवळील राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा आणि लसून संशोधन केंद्राकडून केली. या दाव्यामधे मध्यप्रदेशचे मुख्यमत्री आणि कंपनीचा दावा खोटा ठरला आहे.
मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी नुकतेच ऑनलाईन एका कार्यक्रमात संबोधित केले होते. देवास कंपनीच्या प्रतिनिधींसोबत लसून उत्पादनाबाबत चर्चा केली होती. या चर्चेमधे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी कंपनी प्रतिनिधीला तुम्ही कोणते पीक घेता असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिनिधीने लसूण पीक घेतल्याचे सांगितले. त्यावर एका एकरासाठी किती खर्च येतो असं मु्ख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर प्रतिनिधीनं एकरी १० हजार रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं. लसणाचे उत्पन्न आल्यावर किती पैसे मिळतात या प्रश्नावर तीन एकरातून ३०० क्विंटल लसून मिळत असल्याचे सांगितलं. सर्व मिळून ३ लाख रुपये मिळतात असे त्यांनी सांगितले.
या विडीयो मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर भुपेन नावाच्या शेतकऱ्यानं इंदोरमधून एका शेतकऱ्यानं देवास कंपनीच्या प्रतिनिधीला फोन करुन लसणाच्या बियाण्याची मागणी केली. तीन एकरात ३०० क्विंटल उत्पादन देणारे लसून बीज मला द्याच अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर या टेलिफोन संवादात कंपनी प्रतिनिधीनं मी एकर नाही तर हेक्टर बोलल्याचा दावा केला. शेतकऱ्यांने वारंवार जाब विचारुन कंपनीचा प्रतिनिधी त्याच्या दाव्यावर ठाम राहीला.
मॅक्स महाराष्ट्रानं या दाव्याची तपासणी केंद्र सरकारच्या आयसीएआर संस्थेच्या कांदा आणि लसून संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांशी केली. यामधे सर्व दावे फोल ठरले आहे. एकरी लसून लागवडीच्या बियाण्याचा खर्च ३० हजार असल्याचे सांगितले. तीन एकरात ३०० क्विंटल लसून उत्पादन अशक्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आणि कंपनी प्रतिनिधीची हेक्टर आणि एकरमधे गल्लत झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या पाहणीत मुख्यमंत्री शिवराजसिंह आणि देवास कंपनीचा दावा खोटा ठरला आहे.
लसून माहीती:
हजारो वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. षड्रसांपकी आंबट वगळता पाचही रस असलेला लसूण हा बहुपयोगी आहे. जगातील अनेक देशांत लसणाचे उत्पादन आज घेतले जाते व प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात याला अतिशय मानाचे स्थान दिले जाते. मांसाहारी व शाकाहारी या दोन्हीही गटांत लसणाची जागा मात्र ठरलेलीच आहे.
लसणाची नेमकी उत्पत्ती कुठे झाली याला निश्चित आधार नाही. प्रत्येक खंडातील लोक आमच्या येथेच लसूण पहिल्यांदा उत्पादित झाला असा दावा करतात. लसणाला संस्कृतमध्ये रसोण (रस+उणे) असे संबोधले जाते. लसूण हे कांद्याप्रमाणेच कंदवर्गीय पीक आहे. एका लसणाच्या गड्डय़ात २० ते २५ पाकळय़ा असतात व प्रत्येक पाकळीला स्वतंत्र आवरण असते. सर्दी, खोकला, फुप्फुसाच्या आजारावर रामबाण औषध म्हणून लसूण वापरली जाते. १७२२ साली आपल्या देशात जेव्हा प्लेगची साथ होती तेव्हा औषध म्हणून लसणाचा वापर केल्याचे संदर्भही अनेक जण सांगतात. जंतप्रकृती, भूक न लागणे यावर लसूण हे गुणकारी आहे. तुटलेले हाड सांधण्यासाठी याचा वापर होतो. शरीरातील शुक्र धातूचे प्रमाण लसणामुळे वाढवले जाते, मात्र ते पित्तवर्धक आहे. सर्दी व खोकल्यावर औषध म्हणून उपयोगात आणण्यासाठी लसणाचे तेलही काढले जाते. लसूण उत्पादनासाठी थंड वातावरण लागते. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक आहे.
जमिनीचा पीएच ५.५ ते ६.८ इतका असावा लागतो. थंड हवेच्या भागात मार्च ते एप्रिल महिन्यांत लसणाची लागवड केली जाते, तर अन्य ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या थंडीच्या दिवसांत लसणाची लागवड केली जाते. गावरान व संकरित असे लसणाचे ढोबळ दोन प्रकार आहेत. देशभरात अनेक ठिकाणी लसूण संशोधन केंद्रेही अस्तित्वात असून तेथे लसणाच्या विविध जाती निर्माण केल्या जात आहेत. सरासरी एका एकरला ६ ते ८ क्विंटल लसणाचे बियाणे लागते. लावणीपूर्वी जमीन नांगरणे, पाळी घालणे व काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर पाणी देऊन लसूण लावला जातो. काही शेतकरी सुरुवातीला रोप तयार करून त्यानंतर त्याची लावण करतात, तर काही जण थेट पेरणी यंत्राद्वारे लसूण पेरतात. जमिनीत २ ते ४ सेंमी खाली लसणाचे बी गेले पाहिजे.
दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, तर दोन रोपांतील १५ सेंटिमीटर असणे अपेक्षित आहे. आधुनिक पद्धतीने शेती करणारी मंडळी अन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, जमिनीतील ओल कमी होऊ नये यासाठी मल्चिंग पेपरचाही वापर करतात. लसणाला सिंचनाची सोय आवश्यक आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असल्यामुळे आता बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाद्वारेच लसणाची शेती करतात.जगात चीन, फ्रान्स, स्पेन व इजिप्त हे चार देश मोठय़ा प्रमाणावर लसणाची निर्यात करतात. आपल्या देशात लसणाला मोठी मागणी आहे, मात्र कांद्याप्रमाणेच लसणाचे उत्पादन अधिक झाले म्हणून भाव पडतात. कधी १० रुपये किलो दराने शेतकऱ्याला लसूण विकण्याची पाळी येते, तर कधी २०० रुपये किलोचाही भाव मिळतो. या वर्षी सध्या लसणाला बाजारपेठेत अतिशय चांगला भाव आहे.उत्पादकता आपल्याकडील शेतकऱ्यांनी वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत व पुणे येथील लसूण संशोधन केंद्राचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. चांगला भाव मिळाला तर तीन महिन्यांत शेतकऱ्याला खर्च वजा जाता एकरी ५० हजारांपेक्षा अधिक नफा मिळू शकतो.
• जगभरात चीन, इजिप्त, फ्रान्स, स्पेन, अमेरिका या देशांत लसणाचे उत्पादन घेतले जाते.
• जगाच्या तुलनेत आपल्या देशातील उत्पादकता अतिशय कमी आहे. गतवर्षी चीनमध्ये साडेआठ लाख हेक्टरवर लसणाची शेती करून २०० लाख टन उत्पादन काढण्यात आले. या तुलनेत भारतात २.०२ लाख हेक्टरवर लसणाची लागवड झाली व उत्पन्न मिळाले साडेअकरा टन.
• जगाच्या तुलनेत गुजरात प्रांतातील शेतकरी लसणाचे उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात.
• लसणाच्या अत्याधुनिक प्रजातीची लागवड करून त्याद्वारे अधिकाधिक उत्पादन घेत व हे उत्पादन निर्यात करण्यावर तेथील शेतकऱ्यांचा भर आहे.