राणी बागेचे नाव बदलून 'हजरत हाजी पीर बाबा राणी बाग' करण्यात आल्याचा दावा खरा आहे का?

Update: 2021-12-24 05:49 GMT

मुंबईतील भायखळा येथील प्रसिध्द असलेल्या राणी बागेचे नाव बदलून 'हजरत हाजी पीर बाबा राणी बाग' असे करण्यात आल्याच्या काळ्या ग्रॅनाईटबोर्डाचा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत. मात्र राणी बाग म्हणून प्रसिध्द असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नाव बदलून हजरत हाजी पीर बाबा असे करण्यात आले आहे का? याची सत्यता वाचा...

भायखळा येथील राणी बाग म्हणून प्रसिध्द असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नाव बदलून हजरत हाजी पीर बाबा राणी बाग असे करण्यात आल्याच्या काळ्या ग्रॅनाईटबोर्डाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोत सांगितल्याप्रमाणे बागेचे नाव बदलले आहे, हे वृत्त खरं आहे का? यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांनी पडताळणीसाठी पाठवले होते.


 



गेल्या काही दिवसांपासून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नाव बदलून हजरत हाजी पीर बाबा राणी बाग असे केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का?, असा सवाल केला.

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यावर अनेक प्रतिक्रीया उमटल्या आहेत. त्यातील नितीनकुमार य़ा ट्वीटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, ते बागेचे नाव नसून मार्गदर्शक फलक आहे. तसेच हा दर्गा 1920 पासून तेथे असल्याचे स्थानिक सांगतात. तर ही राणीची बाग नाही तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे म्हणत व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी बनू नका, असा सल्ला दिला आहे.

तर संकेत बावकर या वापरकर्त्याने म्हटले आहे की, नाव बदललं जिजाऊंचं आता आंदोलन करा रे शेणक्यानो, कुठे गेला रे अरविंद सावंत अशी प्रतिक्रीया दिली आहे. मात्र परेश पाटील या वापरकर्त्याने जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली. तर या ट्वीटमध्ये मुंबई पोलिस, सायबर पोलिस, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपा यांना टॅग केले आहे. तर एका वापरकर्त्याने राणे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी विटंबना झाली. महाराष्ट्र पेटून उठला तेव्हा शांत का होते?

काय आहे सत्य

मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांनी या दाव्याबाबत सत्यता पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आम्ही स्वतः वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा येथे जाऊन पाहणी केली व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये उद्यानाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. त्यानंतर महापालिकेने प्रसिध्दीपत्रक काढत सोशल मीडियावर केला जात असलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, सोशल मीडियावर केला जात असलेला दावा खोटा आहे व हा दर्गा या ठिकाणी फार पुर्वीपासून आहे. तेथे सर्वधर्मीय लोक माथा टेकवतात. त्यामुळे अशा छोट्या गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा खोडसाळ प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. तर उद्यानाचे नाव जिजाऊंचे आहे आणि ते कधीही बदलले जाणार नाही. तसेच त्या हजरत हाजी पीर बाबा राणी बाग असे लिहीलेल्या ग्रॅनाईटबोर्डाची परवानगी दिली की नाही, याची माहिती घेत आहे. तर तो बोर्ड लावण्याची परवानगी नसेल तर काढून टाकला जाईल. मात्र नाव बदलण्याचा मुद्दा विनाकारण काढलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.



 

या दाव्यातील तथ्याची पडताळणी करताना स्थानिक लोकांशी संवाद साधून माहिती घेताना असे सांगण्यात आले की, 1858 साली जगन्नाथ शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिक्टोरिया राणीच्या नावाने बाग बनवण्यासाठी नागरीकांची सभा झाली. या बाग आणि वस्तुसंग्रहालयासाठी नाना शंकरशेठ यांनी पाच हजार रूपये देणगी दिली होती. तर भाऊ दाजी लाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह 1 लाख रूपये गोळा केला. त्यातून या बागेची निर्मीती करण्यात आली. तसेच 1862 साली बागेत झाडांची लागवड करण्यात आली. त्याकाळात या बागेला व्हिक्टोरिया राणीचे नाव दिल्याने स्थानिक मराठी लोक या बागेला राणीची बाग असे म्हणत. पुढे 1960 च्या दशकात या राणीबागेचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असे करण्यात आले. तर उद्यानात असलेल्या वस्तूसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय असे नाव देण्यात आले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तर सध्या व्हायरल पोस्टमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणी बाग परीसरात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

गेल्या चार वर्षापुर्वी ही कोनशिला बसवण्यात आली आहे. तर हा दर्गा पुर्वीपासूनच राणीबागेत आहे. तर त्या दर्ग्याला हजरत हाजी पीर बाबा, राणी बाग असे नाव होते. मात्र नव्या कोनशिलेवर स्वल्पविराम नसल्याने हा गैरसमज झाल्याचे स्थानिक सांगतात.



 

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय असे नाव आहे. उद्यानाच्या तिकीटावरही बृहन्मुंबई महानगरपालिका वीरमाता राणी जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय असे नाव आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या सुचनाफलकावरही वीरमाता जिजाबाई भासले उद्यान व प्राणीसंग्रहालय असे स्पष्ट लिहीले आहे.

निष्कर्ष

यावरून असे दिसून येते की, वीरमाता जिजाऊ भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलले नसून व्हायरल होत असलेला फोटो दिशा दाखवण्यासाठी आहे. त्यामुळे व्हायरल फोटोंमध्ये केलेला दावा खोटा आहे, हे स्पष्ट झाले.

Tags:    

Similar News