Fact Check : जानेवारी २०२३ पर्यंत मान्सूनचा मुक्काम वाढणार हा खरंच हवामान खात्याचा अंदाज होता का?
गेल्या काही दिवसांपासून हवामान अभ्यासकांचा सुळसुळाट झाला आहे. सोशल मिडीया आणि वर्तमान पत्रातून वाटेल तसे हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका बातमीत मान्सून जानेवारीपर्यंत मुक्काम ठोकणार असल्याचा दावा कथित हवामान अभ्यासक किरण जोहरे यांनी केला आहे. नेमकं सत्य काय? वाचा मॅक्स महाराष्ट्राचे Fact-check;
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधआर पाऊस पडतो आहे. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये तर काही तासांच्या पावसाने पुर परिस्थिती तयार होतेय. त्यामुळे अनेक जण हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज पाहण्याला प्राधान्य देतात. बळीराजाची शेतीची सारी कामंच या हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबलेली असतात. त्यामुळे हे अंदाज अधिकृत आणि खरे ठरणं अपेक्षित असतं. सध्या अनेक खोटे अंदाज बातम्यांमध्ये छापुन येताना पाहायला मिळत आहेत. अशीच एक पावसाचा अंदाज सांगणाऱ्या बातमीचं कात्रण व्हायरल होत आहेत. या कात्रणात जानेवारी पर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार, हवामान खात्याचा इशारा अशा मथळ्याखाली बातमी दिली आहे. या बातमीत मान्सुन आणखी चार महिने कायम राहणार असुन उत्तर माहाष्ट्रात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोबत राज्यात ठिकठिकाणी महापुराचा धोका कायम असल्याचं म्हटल आहे. आणि ही माहिती या वृत्तपत्राने हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरण कुमार जोहरे यांच्या नावाने छापली आहे.
पण ही बातमी धादांत खोटी असल्याचे आणि यात वर्तविण्यात आलेला अंदाज हा अधिकृत नसल्याचं ट्विट पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केलं आहे. सोबत दोन बातम्यांची कात्रण सुध्दा अपलोड केली आहेत एक म्हणजे वरील कात्रण आणि दुसरं कात्रण आहे लोकमत या प्रसिध्द दैनिकातील... लोकमतच मध्ये किरणकुमार जोहरे यांच्या माहितीवर 'ढगफुटीवर वेधशाळेचे मौन; विमा कंपन्यांना लाभ' या मथळ्या खाली छापुन आली आहे. यात किरण कुमार जोहरे य़ांनी वेधशाळेवर केलेल्या टीकेचं कोट वापरण्यात आलं आहे.
या दोन्ही बातम्यांची कात्रण जोडून के एस घोसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये, "मीडियाने शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी अशा तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ञांकडून पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती प्लीज़ काटेकोरपणे टाळली पाहिजे.हे खोटे दावे आहेत,त्यांचा कोणताही वैज्ञानिक बेस नाही. दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे.ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे " असं म्हटलं आहे.
याशिवाय मॅक्स महाराष्ट्रकडे हवामान आणि कृषी विषयक पत्रकार अमोल कुटे यांनी हवामानाच्या भौगोलिक स्थितीची माहिती दिली शिवाय किरण जोहरे यांना प्रसिध्दी पिपासू म्हटलं आहे. "सर, ही व्यक्ती नेहमी असंच काही तरी सांगून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करते. नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशातून गेला असं जेव्हा हवामान विभाग सांगतो तेव्हा मॉन्सून पूर्णपणे गेलेला नसतो. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, या राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. तो डिसेंबर अखेर पर्यंत सुरू असतो. या काळात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होतात. महाराष्ट्राकडे आल्यास आपल्यालाही पाऊस देतात" असं त्यांनी मॅक्स ला पाठविलेल्या संदेशामध्ये म्हटलं आहे.
आता इतके आरोप झाल्यावर किरण कुमार जोहरे नेमके कोण आहेत हे तपासण्यासाठी आम्ही समाज माध्यमांवर त्यांना शोधलं तर त्यांच्या प्रोफाइल वर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. जेव्हा की प्रत्येक व्यक्ती थोडी बहुत का होईन समाज माध्यमांवर स्वतःबद्दल माहिती ठेवतेच. शिवाय त्यांचे विविध वृत्तपत्रांतील कात्रणं त्यांनी येथे शेअर केली आहेत. म्हणुन मग आम्ही त्यांच्याकडुनच ही माहिती जाणून घेण्याचं ठरवलं. त्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
मग किरण कुमार यांनी वर्तवलेले अंदाज तत्थ्यहिन कसे आहेत हे विचारण्यासाठी आम्ही पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांना संपर्क केला ज्यांनी जोहरे यांच्यावर टीका केली आहे. होसाळीकर यांनी आमच्याशी बोलताना, "किरण कुमार जोहरे ही व्यक्ती कधीच वेधशाळेत काम करत नव्हती. IITM पुणे म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था या संस्थेत अगदी लहान हुद्द्यावर तेही खुप कमी काळासाठी काम करत होती. या व्यक्तीला तेथून निलंबीत करण्यात आलेलं आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अनेक गणितीय पध्दतींचा अवलंब केला जातो. तेव्हा कुठे अंदाज वर्तवला जातो तोही काही वेळा चुकतो. आणि ज्या पध्दतीने जोहरे यांनी जानेवारी पर्यंत मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे तो जगात कुणीही व्यक्त करू शकत नाही कारण अशी गणितीय पध्दतीच उपलब्ध नाही. त्यामुळे माध्यमांनी आधी या अशा तोतया व्यक्तींची माहिती हवामान खात्याच्य़ा नावाने चालवणं बंद केलं पाहिजे. आधी शहानिशा करून मग ती बातमी प्रसिध्द करावी कारण त्या हवामानाच्या अंदाजावर अनेकांचा महत्वाची कामं अवलंबून असतात. जर माध्यमं अशा प्रकारे कुणाचेही अंदाज हवामान खात्याच्या नावाने चालवू लागली आणि त्यामुळे कुणी काही केलं आणि नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याचसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रवर काही दिवसांपुर्वी झालेल्या चर्चेत IMD चे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिक खुळे यांनी देखील आपलं मत मांडलं होतं. "माझ्याही कानावर बऱ्याचशा गोष्टी येतात. आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कुणी काहीही म्हणालं तरी त्याची अडवणुक केली जात नाही. एखादी व्यक्ती शेतकरी असेल तर त्याने हवामानाशी निगडीत बातम्या वाचताना कोणती व्यक्ती काय सांगतेय हे तपासून घेतलं पाहिजे. तीची पार्श्वभुमी काय आहे हे पाहिलं पाहिजे, त्याचा अनुभव काय आहे? त्या व्यक्तीची आता पर्यंतची किती भाकितं खरी ठरली आहेत हे पाहुनच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा. एखाद्या शेतकऱ्याने खोट्य़ा अंदाजाबद्दल न्यायालयात दावा ठोकला तर तो लागू होऊ शकतो पण आपल्याकडच्या शेतकरी असं करणार नाही. हवामान तज्ञ ज्यावेळी अंदाज व्यकित करतात तेव्हा ते १०० टक्के ठाम नसतात तेव्हा शेतकऱ्यांनीच कोणती व्यक्ती काय सांगते आणि काय करते हे पाहिलं पाहिजे."
IMD चे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिक खुळे आणि विद्यमान प्रमुख होसाळीकर यांनी बळीराजाबद्दल व्यक्त केलेली चिंता खरी ठरताना पाहायला मिळतेय. पालघरचे प्रगतशील शेतकरी व्यंकट अय्यर य़ांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितल की, "ही बातमी व्हायरल झाली आहे. शेतकरी घाबरला आहे. काही सांगतात लागवड नाही करनार. रब्बी पेरणी वर परिणाम होण्याची शक्यता दिसते. One fake news can hv a huge impact. Must be countered properly" अशी प्रतिक्रीया दिली आहे.
एका बाजूने स्वयंघोषीत हवामान अभ्यासक जोहरे जानेवरीपर्यंत मान्सून मुक्काम ठोकणार असल्याचा दावा करत असताना आजच रविवारी १८ सप्टेंबर २०२२ ला भारतीय हवामान विभाग (IMD)ने शास्त्रीय अंदाजानुसार परतीच्या मान्सूनची परीस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु होणार हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आणि शास्त्रीय सत्य आहे.
नेमकं सत्य – जानेवारी २०२३ पर्यंत मान्सूनचा मुक्काम वाढणार हा वृत्तपत्रात केला गेलेला दावा खोटा आहे कारण तो अधिकृतरित्या हवामानविभागाने केलेलाच नाही. त्यामुळे बळीराजाने अशा बातम्यांवर विश्वास ठेवताना एकदा विचार करावा आणि IMD च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच मान्सूनबद्दलची अधिकृत माहिती मिळवावी तसेच शेतीबद्दलाचा योग्य तो निर्णय घ्यावा.