Fact Check: अन्नावर "थुंकत" असलेला मौलानाचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे व्हिडीओची सत्यता?

Update: 2021-11-12 02:38 GMT

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये "एक व्यक्ती अन्नात थुंकत असल्याचा" दावा करत सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस स्वयंपाकाच्या मोठ्या भांड्यांमधून काही अन्न बाहेर काढतो, आणि त्यावर फुंकर मारून पुन्हा भांड्यातल्या अन्नामध्ये मिसळताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये मुस्लिम समुदायाने आयोजित केलेला लंगर दिसत आहे. तसेच, व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने फुंकर मारलेलं अन्न पुन्हा भांड्यात मिसळल्यानंतर आमीन असं म्हंटलेलं देखील ऐकू येतं.

ट्विटरवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये भाजप सदस्य प्रीती गांधी यांचाही समावेश आहे.

भाजपचे प्रवक्ते गौरव गोयल आणि नवीन कुमार यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

दरम्यान, अनेक भाजप समर्थकांनीही व्हिडिओमधील व्यक्ती अन्नात थुंकत असल्याचा दावा केला आहे.

व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रथा काय आहे?

दरम्यान, उल्लाल काझी फजल कोयम्मा टांगल यांचे सहकारी हाजी हनीफ उल्ला यांच्याशी संवाद साधला. काझी फजल कोयम्मा टांगल हे व्हिडिओमध्ये अन्नावर फुंकर मारणारी व्यक्ती आहे. हाजी हनीफ उलल्ला यांनी सांगितले की, केरळमधील ताजुल उलेमा दर्गा येथे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या उर्सच्या निमित्ताने लंगरचे आयोजन करण्यात आले होते.

तजुल उलामा, केरळमधील एक सुन्नी मुस्लिम विद्वान होते, त्यांचे पूर्ण नाव असायद अब्दुल रहमान अल-बुखारी होते. दर्ग्याचे नाव त्यांच्याच नावावर आहे, परंतु ते उल्लाल थंगल या नावाने ओळखले जातात. ते फजल कोयम्मा टांगलचे वडील होते. जे व्हिडिओमध्ये अन्नावर फुंकर मारतांना दिसत आहेत.

दरम्यान, उल्लाल थंगल यांचे फेब्रुवारी २०१४ मध्ये निधन झाले. त्यांची पुण्यतिथी अरबी दिनदर्शिकेनुसार नोव्हेंबरमध्ये येते. उर्स हा धार्मिक नेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसांचा कार्यक्रम आहे. हा सुफी सुन्नी मुस्लिमांमध्ये प्रचलित आहे आणि त्यांच्याद्वारेच साजरा केला जातो.

हाजी हनीफ उल्ला म्हणाले, "जेवण तयार झाल्यावर हजरत कुराणातील आयत वाचतात आणि अन्नावर फुंकर मारतात. दुपारी आणि रात्रीचे जेवण शिजल्यानंतर दोन्ही वेळेस ही प्रथा पाळली जाते.''

हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे निजामी, पीरजादा अल्तमाश यांनी सांगितले की, "मौलवी अन्नावर फुंकर घालत आहेत, ते थुंकत नाहीत. आपल्या समाजात असे काही लोक आहेत. जे ही प्रथा पाळतात. इतर दर्ग्यांमध्ये देखील, काही उपासक कुराणमधील श्लोकांचे पठण केल्यानंतर फुंकले जाणारे पाण्यासाठी साठी विनंती करत असतात. हे सर्व बरकत (समृद्धी) आणि कल्याणासाठी केले जाते.

Alt News ने या संदर्भात एका मुस्लीम तज्ज्ञाशी बातचीत केली असता, त्यांनी सांगितल की, ही एक प्रथा आहे. जिथे अल्लाहच्या आशीर्वादाने सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी जेवल्यानंतर कुराणच्या श्लोकांचे पठण केले जाते.

ते पुढे म्हणाले, "अनेक लोक प्रार्थनेनंतर त्यांच्या आजारी मुलांसह मशिदीबाहेर जमतात. नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या उपासकांना फातिहा पठण करून या मुलांवर फुंकर मारायला सांगितले जाते. कारण हे अल्लाहचे आशीर्वाद आहे असे मानले जाते.

निष्कर्ष:

एकूणच, अन्नावर फुंकण्याची प्रथा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हानिकारक मानली जात असली तरी मौलाना व्हिडिओमध्ये अन्नावर थुंकत असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

या संदर्भात Alt news ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/fact-check-does-this-video-show-a-maulana-spitting-on-food/

Tags:    

Similar News