Fact Check लस घेतल्यानंतर खरंच माणसाच्या शरिरात चुंबकीय शक्ती निर्माण होते का?

लस घेतल्यानंतर खरंच मानवी शरिरात चुंबकीय शक्ती निर्माण होते का? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा तो बाबा कोण? या महाराजांच्या अंगात खरंच चुंबकीय शक्ती निर्माण झाली आहे का? वाचा डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख

Update: 2021-06-12 05:57 GMT

- डाॅ. प्रदीप पाटील

चिकटबंबूंचा चमत्कार!चुंबक चिकटू बाबा पुन्हा अवतरले आहेत!!

आपल्या शरीरात अद्भुत, चुंबकीय शक्ती लस घेतल्यानंतर निर्माण झाली असा दावा करणारी ही बुवाबाजी सध्या सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. जगामध्ये असे चिकटबंबू महाराज सर्वत्र फैलावलेले आहेत. या महाराजांकडे अद्भुत, दैवी, इंद्रियाच्या पलीकडची, असामान्य अशी शक्ती आहे असाही दावा केला जातो. पण याच्यामागे कोणतीही दैवी शक्ती नाही. चुंबकीय शक्ती देखील नाही आणि नसते..

अशी अद्भुत शक्ती दाखवणारे दोन गोष्टींचा वापर करत असतात. एक म्हणजे विज्ञान आणि दुसरे म्हणजे ट्रिक किंवा युक्ती. या दोन्ही गोष्टी कोणत्या व कशा आहेत ते आपण आता पाहू या.

आपल्या शरीरातून घाम येतो आणि तो त्वचेवर साचतो. या घामामध्ये 'सीबम' हा चिकट द्राव असतो. तो त्वचेतील सीबॅशियस ग्रंथीतून पाझरत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये या सीबमचे प्रमाण कमी अधिक असते. हा सीबम चिकट असतो. आणि त्वचेवर चीकचीकपणा निर्माण करतो. त्यामुळे केवळ धातुच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तू देखील त्याला चिकटतात.

ज्या व्यक्तींच्या त्वचेवर हा सीबम पसरलेला असतो तेथे या वस्तू चिकटतात. हा सीबम जर तिथून काढून टाकला तर वस्तू चिकटायच्या थांबतात. यासाठी जेम्स रँडी ने अत्यंत चांगला प्रयोग केलेला आहे. त्याची व्हिडिओ क्लिप खाली कमेंट मध्ये दिली आहे. चमत्कारांचा कर्दनकाळ असलेल्या जेम्स रँडी ने एक साधा प्रयोग केला. ज्या चिकट बंबू महाराजांनी आपणाकडे दैवी शक्ती आहे असा दावा केला होता त्यांच्या शरीरावर पावडर फासले आणि वस्तू चिकटवून दाखवण्याचे आव्हान दिले !! अशा सर्व चुंबक चिकटू बाबांनी त्यावेळी पळ काढलेला आहे.

दुसरे आपणास असे करता येते की याच चिकटबंबू महाराजांना शर्ट घालून वस्तू चिकटवून दाखवा असे सांगायचे. वस्तू चिकटत नाहीत. साधारणपणे आपल्या शरीरात जवळपास 26 किलो वजनाची वस्तू चिकटवून दाखवणे इतकी जर चुंबकीय शक्ती असेल तर शर्ट घातल्यावर चुंबकीय शक्ती काम करायला हवी. पण तसे दिसत नाही. याचाच अर्थ शर्ट काढून, नागडे होऊन हा चमत्कार करणे म्हणजे बुवाबाजी आहे. ज्यांची त्वचा लवचिक आहे व त्या त्वचेवर केस नाहीत अशांना या सीबम चिकट द्रवाचा खूप मोठा फायदा होतो आणि वस्तू पटकन चिकटतात. दुसरे कारण जे विज्ञानाचे आहे ते कोणते हे आपण पाहू या. गुळगुळीत अशा पृष्ठभागावर एखादी वस्तू ठेवली तर ती घसरते कारण गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला मग खाली खेचते. चिकट बंबू जेव्हा आपली उघडी त्वचा जी असते त्याच्यावर धातूच्या वस्तू चिकटवतात तेव्हा त्या वस्तू आणि त्वचेचा पृष्ठभाग यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोन न राहता तो त्याच्या पेक्षा कमी असतो. हा तिरकस झालेला 45 अंशाच्या आसपासचा कोन जेव्हा तयार होतो तेव्हा गुरुत्वाकर्षण हे कमी होते आणि वस्तू खाली पडत नाही. म्हणजेच हे फ्रिक्शन किंवा घर्षण विज्ञान त्वचेला वस्तू चिकटून राहण्यास मदत करते. मान आणि छाती याचा पृष्ठभाग असा असतो. छाती खाली फुगीर असते व मानेकडे निमुळती होत जाते. तेथे हा आवश्यक कोन सहज मिळतो. आणि तेथे केस नसतील जे चिकटण्यास अडथळा निर्माण करतात तर बुवाबाजी यशस्वीच झाली असे समजा. रोमानिया च्या जगप्रसिद्ध अशा 26 किलो वजनाची वस्तू छातीवर घेऊन चिकटवून ठेवलेल्या ओरेल रेनालू नावाच्या माणसाचे खाली चित्र दिले आहे कमेंटमध्ये. त्यामध्ये हा कोन व्यवस्थित दिसून येतो. याचाच अर्थ विज्ञान आणि युक्ती याचा संगम म्हणजे हा तथाकथित चमत्कार होय. या चमत्काराची तपासणी आपण सुद्धा करू शकतो. जर चुंबकीय शक्ती असेल तर त्याला प्लास्टिकची वस्तू लावल्यावर तीही चिकटते. म्हणजेच चुंबक प्लास्टिक वर काम करत नसताना देखील ती कशी करते याचे उत्तर चिकटबंबूंना देता येत नाही. आपल्या शरीराच्या मध्ये जर चुंबकीय क्षेत्र असेल किंवा पृथ्वीवर कोठेही चुंबकीय क्षेत्र असेल तर ते मोजण्यासाठी कंपास वापरला जातो व विशिष्ट यंत्र वापरले जाते. याच्या आधारे जगभरातल्या सर्व चिकट बंबूंची तपासणी केली असता असे कोणतेही क्षेत्र आढळून आलेले नाही. म्हणूनच ही सर्व बुवाबाजी ठरते. तुमच्या आसपास जर असे कोणी चमत्काराचा दावा करून चिकटा चिकटी करून दाखवू लागले तर तुम्ही दोन गोष्टी करा... त्याच्या अंगाला पावडर फासा आणि शर्ट घालून वस्तू चिकटवून दाखव असे सांगा. हाताच्या बोटाने खाली पडलेला चमचा स्पर्श करून उचलून दाखवायला सांगा. निश्चितपणे त्याचा भांडाफोड तुम्ही सुद्धा करू शकाल. जर तुम्ही हे करू शकला तर टीव्ही चॅनेल्सना आणि वृत्तपत्रांना धमाकेदार बातम्या देण्याचा चान्स मिळणार नाही आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे त्यांचे पाप त्यांच्याच पदरात टाकता येईल.

- डाॅ. प्रदीप पाटील

Pradeep Patil

Tags:    

Similar News