Fact Check : भारत जोडो यात्रेत आर्थिक घोटाळा झाला आहे का?

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी अनेकांशी भेटत होते. मात्र राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पैसे घेऊन पास दिला जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र खरंच राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी पैसे द्यावे लागत होते का? भारत जोडो यात्रेबाबत करण्यात येणाऱ्या आरोपात तथ्य आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे Fact Check;

Update: 2022-11-22 03:17 GMT

राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. मात्र या यात्रेत राहुल गांधी अनेक लोकांशी भेटत होते. अनेक चिमुकल्यांना खांद्यावर घेत होते. त्यावरून राहुल गांधी यांच्या भेटीसाठी 20 हजार रुपये घेऊन भेटीचे पास दिले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबरोबरच भारत जोडो यात्रेत मोठा घोटाळा झाला असल्याचे मत फेसबुक पोस्ट आणि ट्वीटरवर व्यक्त केले जात आहे.

साईनाथ शिरपुरे या फेसबुक वापरकर्त्याने पोस्ट करून भारत जोडो यात्रेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यामध्ये या वापरकर्त्याने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी प्रत्येकाला विशेष पास देण्यात आले होते. या एका पासची किंमत प्रति व्यक्ती/ प्रति पास 20 हजार रुपये इतकी होती. 20 हजार रुपये द्यायचे आणि राहुल गांधी यांच्यासोबत चालायचे, असं म्हटलं आहे.

Full View

प्रकाश गाडे यांनीही हाच फोटो वापरत पोस्ट केली आहे.

Full View

प्रकाश गाडे यांनी ट्वीटमध्येही हाच फोटो आणि दावा केला आहे.

राजेंद्र साबळे पाटील या ट्विटर वापरकर्त्याने ट्वीट करून म्हटले आहे की, भारत तोडो यात्रेतही मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. भारत तोडो यात्रेत राहुल गांधीं सोबत चालण्यासाठी प्रत्येकांना विशेष पासेस देण्यात आले होते. त्यात एका विशेष पासची किंमत प्रति व्यक्ती/ प्रति पास/ 20,000/ - रुपये एवढी होती, असा दावा केला आहे.

संजय फडणवीस या ट्विटर वापरकर्त्यानेही असाच दावा केला आहे.

पडताळणी- (Reality Check)

भारत जोडो यात्रेबाबत घोटाळा झाल्याच्या आरोपाच्या अनुषंगाने मॅक्स महाराष्ट्रने की-वर्ड्स शोधले. त्यामध्ये @SiddharthWank17 या ट्विटर वापरकर्त्याने राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या शेतकरी महिलेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्याबरोबरच प्रकाश गाडे यांना मुर्ख म्हणत हे गरीब लोक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी 20 हजार रुपये देतील का? असा सवाल केला.

मॅक्स महाराष्ट्रने भारत जोडो यात्रा कव्हर केलेल्या आणि राहुल गांधी यांना भेटलेल्या पत्रकार रश्मी पुराणिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी रश्मी पुराणिक यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना भेटण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला उभे रहायचे. त्यामध्ये काही दिव्यांग, काही महिला, मुली आणि गरीब शेतकरी. ते राहुल गांधी जवळून जातांना आवाज द्यायचे. राहुल गांधी यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले की राहुल गांधी त्यांना बोलावून घ्यायचे. यामध्ये कुणालाही भेटीसाठी विशेष पास दिले नव्हते. त्याबरोबरच काही लोकांना प्रदेश काँग्रेसचे नेते आवाज देऊन राहुल गांधी यांची भेट करून देत होते. त्यानुसारच माझी राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. या यात्रेत अनेक गरीब, आदिवासी लोक राहुल गांधी यांना भेटले. ते खरंच भेटीसाठी 20 हजार देऊ शकतात का? असा विचार आरोप करणाऱ्यांनी करायला हवा, असं मत रश्मी पुराणिक यांनी व्यक्त केले.

मॅक्स महाराष्ट्रची दिव्यांग पत्रकार मुस्कान मौर्य हिसुध्दा राहुल गांधी यांना भेटली. मात्र राहुल गांधी यांना भेटण्यासाठी मी एक रुपयाही दिला नाही. राहुल गांधी यांनी स्वतःहून मला सोबत चालण्यासाठी बोलावून घेतल्याचं मुस्कान सांगते.

मॅक्स महाराष्ट्रची प्रतिनिधी अनिता आंब्रे यासुध्दा राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालल्या. मात्र राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पैसे द्यावे लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मॅक्स महाराष्ट्रने मॅक्स वूमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनाही याबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रियदर्शिनी हिंगे म्हणाल्या, राहुल गांधी यांना भेटण्यासाठी 20 हजार रुपये द्यावे लागत असल्याच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. सेलिब्रिटींपेक्षा जास्त सर्वसामान्य लोक राहुल गांधी यांना भेटले आहेत. त्या लोकांची परिस्थिती पाहिल्यानंतर हे आरोप करणारे किती खोटं सांगत आहेत, ते सिध्द होत आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल सिनियर करस्पाँडंट विजय गायकवाड यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या लोकांशी संवाद साधला. मात्र प्रकाश गाडे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या 20 हजार रुपयांच्या आरोपात तथ्य नसल्याचे विजय गायकवाड यांनी सांगितले.

याबरोबरच काँग्रेसच्या कायदेशीर विभागाने कुलाबा पोलिस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रकाश गाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याबरोबरच चुकीची माहिती पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.





 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यासंदर्भात बोलताना सांगितले की, भारत तोडणाऱ्यांनी भारत जोडो यात्रा बदनाम करायला पहिल्या दिवसापासून सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही जे अबालवृध्द, दिव्यांग चालत आहेत. त्यांनी 20 हजार रुपये दिल्याचा आरोप करत आहात. जरा लाज बाळगा. ज्यांना दोन वेळच्या जेवणाच्या अडचणी आहेत ते 20 हजार रुपये कसे देऊ शकतील? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.


निष्कर्ष (What is Fact )

वरील सर्व दावे आणि प्रतिदाव्यांबरोबरच मॅक्स महाराष्ट्रने भारत जोडो यात्रा तटस्थपणे कव्हर करणाऱ्या आणि राहुल गांधी यांची भेट घेणाऱ्या पत्रकारांशी चर्चा केली. त्यापैकी कुणीही राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे दिल्याचे समोर आले नाही. तसेच जे लोक भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटले. त्या लोकांच्या चेहऱ्यावरील भावनांवरून त्यांनीही राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पैसे दिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची बदनामी करण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे, हे समोर आले आहे.

Tags:    

Similar News