Fact Check: रतन टाटा यांनी सरकारला आधार कार्डद्वारे दारू विकण्यास सांगितलं का?
सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, रतन टाटा यांनी दारू खरेदी करणाऱ्यांना सरकारी सबसिडी बंद करण्याची सूचना केली आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजनुसार, "आधार कार्डद्वारे दारू विक्री झाली पाहिजे. दारू खरेदी करणाऱ्यांना सरकारी खाद्य अनुदान बंद केले पाहिजे. ज्यांना दारू विकत घेण्याची सोय आहे ते नक्कीच अन्न सुद्धा विकत घेऊ शकतात. आम्ही त्यांना मोफत अन्न देतो आणि ते पैशाने दारू विकत घेतात."
दरम्यान, भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटला जवळपास १३०० लोकांनी रिट्विट केलं असून ५ हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक सुद्धा केलं आहे.
तसेच, ज्येष्ठ वकील रविशंकर जनाध्याय यांनी देखील रतन टाटा यांच्या फोटोचं एक ग्राफिक्स शेअर केलं आहे. ज्यामध्ये तेलुगू भाषेत लिहिलेल्या संदेशातही हाच दावा करण्यात आला आहे.
ट्वीटरवर अनेकांनी हा दावा ट्वीट केला आहे. दरम्यान, फेसबूकवरही हा दावा करत पोस्ट केल्या जात आहेत. मात्र, हा दावा मे २०२१ पासून केला जात असल्याचं आम्हाला दिसून आलं.
काय आहे सत्य...?
रतन टाटा यांनी केलेल्या या विधानाबाबत माध्यमांमध्ये एकही रिपोर्ट नाही. दरम्यान, या विधानासंदर्भात रतन टाटा यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील हे विधान खोटं असल्याचं सांगितलं आहे.
यापूर्वीही सोशल मीडियावर रतन टाटा यांच्या नावाने अनेक दावे शेअर करण्यात आले आहेत. तसेच रतन टाटा यांनीही अनेकदा ट्विटरद्वारे बनावट मेसेजे बाबत खुलासा केला आहे.
I'm afraid this too, has not been said by me. I will endeavour to call out fake news whenever I can, but would encourage you to always verify news sources. My picture alongside a quote does not guarantee me having said it, a problem that many people face. pic.twitter.com/pk0S75FxPA
— Ratan N. Tata (@RNTata2000) May 3, 2020
दरम्यान, 11 एप्रिल 2020 ला रतन टाटा यांनी अशाच एका बनावट विधानाबद्दल ट्विट केलं होतं. व्हायरल मेसेजचे खंडन करतांना ते म्हणाले, "जर मला काही सांगायचे असेल तर मी ते माझ्या अधिकृत चॅनेलद्वारे सांगेन, कृपया सोशल मीडियावरील व्हायरल माहितीची पडताळणी करा."
निष्कर्श:
एकंदरीत, रतन टाटा यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा असून त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही.
या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/ratan-tata-didnt-say-liquor-sales-through-aadhaar-cards/