fact check : मासिक पाळीत कोरोनाची लस घ्यावी का? व्हायरल WhatsApp पोस्ट खरी का खोटी?

करोना व्हायरसपेक्षा लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या खोट्या पोस्ट Social Mediaवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून ‘लसीकरण आणि मासिक पाळी’ या संदर्भातली व्हायरल पोस्ट खरी का खोटी? जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. शंतनु अभ्यंकर यांचा What’s aap University वरील खोट्या मॅसेजचा पर्दाफाश करणारा लेख...;

Update: 2021-04-28 02:53 GMT

सध्या सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरसपेक्षा लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या खोट्या पोस्टचा वेग अधिक आहे. Social Media वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून 'लसीकरण आणि मासिक पाळी' या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मुळात ही पोस्ट इंग्रजी भाषेत आहे. या पोस्टमध्ये लसीकरणासंदर्भात काही दावे केले आहेत. काय आहे ही पोस्ट? "एक तारखेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सगळ्यांसाठी लसीकरण सुरू होत आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना मासिक पाळी कधी येते आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवा. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कारण मासिक पाळीदरम्यान आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. लशीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतो आणि मग हळूहळू रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका."

अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंच मासिक पाळीच्या काळात महिलांनी लस घेऊ नये का? समाजात मासिक पाळी दरम्यान महिलांनी हे करु नये. ते करु नये. अशी अनेक बंधन घातली जातात. तशाच प्रकारचं हे बंधन आहे का?या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मासिक पाळीदरम्यान महिलांची प्रतिकारक क्षमता खरंच कमी होते का? महिलांना आलेला थकवा म्हणजे महिलांचा प्रतिकारक क्षमता कमी झाली आहे का? खरंच लशीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतो का? मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो का? या सर्व प्रश्नांमुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नये. हा केलेला दावा कितीपत खरा आहे.

हे जाणून घेण्यासाठी आम्ही डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले मला माझ्या काही पेशंट्सचे देखील या संदर्भात फोन आले आहेत. त्याचबरोबर माझ्या स्वत:च्या नात्यातील काही महिलांचे देखील फोन आले. त्यातील बहुतेकांचा प्रश्न मासिक पाळीच्या वेळेस लस घेऊ नये अशा आशयाच्या पोस्ट बद्दल तुमचं काय मत आहे? असा होता. अर्थातच पाळीच्या वेळेस रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. ही एक अशास्त्रीय गोष्ट आहे. त्यामुळे लस घेण्याचा आणि न घेण्याचा पाळीशी काहीही संबंध नाही. पाळी येणार असो किंवा येऊन गेलेली असो लस उपलब्ध असेल तर तुम्ही कधीही लस घेऊ शकता असंच माझं सर्व महिलांना आणि तरुणींना सांगणं आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणतात -

पाळीच्या वेळेस लस घेऊ नये अशा प्रकारच्या अफवांच्या पोस्ट जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. एखादी पोस्ट इतकी विश्वासार्ह वाटते की ती आपण आपलं विहित कर्तव्य पार पडल्याप्रमाणे पुढे फॉरवर्ड करत असतो. स्त्रियांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन...

ही व्हायरल झालेली पोस्ट ही इंग्रजी भाषेतली होती. इंग्रजी ही उच्च गुरूंची भाषा असल्याने लोकांचा आपोआपच त्याच्यावर विश्वास बसला. त्याचबरोबर स्त्रियांविषयी असलेल्या पारंपारिक गैरसमजुती, आणि स्त्रियांच्या एका आवश्यक अशा शरीर धर्माकडे नकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजामध्ये आहेच आणि तोच त्यांच्या शरीरधर्माकडे बघण्याचा एक चुकीचा, नकारात्मक, विकृत दृष्टिकोन वारंवार ठळक केला जातो.

स्त्रियांच्या बाबतीत मुळातच असलेल्या नकारात्मक समाजभावनेवर स्वार होऊन कसं स्वैरपणे हुंदडायचं हे आपण या अफवेकडून शिकावं. सत्य-असत्याचा विलक्षण मिलाफ या अफवेत दिसून येतो विशेष म्हणजे या पोस्टला सत्याची फोडणी दिल्याने अफवा अधिक झणझणीत झाली. लिहिताना आव असा की, बघा मला तुमची कित्ती कित्ती काळजी, मी तुम्हाला वेळेत सावध करत आहे, सांभाळा!!! असा जन्मदात्या मायबापासारखा काळजीचा वत्सल सूर. यामुळेही विश्वास वाढतो. त्यामुळे इंग्रजीत असणारी ही पोस्ट पटकन लोकांना पटली आणि पुढे फॉरवर्ड करत गेले. असं परखड मत डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी व्यक्त केलं.

मासिक पाळी दरम्यान महिलांची प्रतिकारक क्षमता कमी होते का?

मासिक पाळीच्या वेळेला स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात हे १०० टक्के सत्य आहे. मात्र त्यावेळेस स्त्रियांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. हे १०० टक्के असत्य आणि चुकीचं आहे. चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही. असं ते मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना स्पष्ट करतात.

त्या पोस्टच्या आशयामुळे महिलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलतांना ते म्हणतात - अनेक महिला ४ दिवसांनी काय होणार आहे? असा विचार करत लस घेणार नाहीत. तर काही लस न घेतल्याने काय होईल? काही तोटा तर होणार नाहीये ना मग काय फरक पडतो. असं म्हणत लस घेणार नाही. महिला स्वत: जाऊन लस घेणं अशी काही बंडखोरी त्या करण्यापेक्षा, उगाच विषाची परीक्षा कशाला ? असं म्हणत अनेक महिला लस घेणार नाहीत.

उगाच अफवांना बळी पडत लस न घेण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून लस घेण्याचा निर्णय हा योग्य आहे. त्यामुळे या कोरोनाच्या साथीमध्ये जे अफवांचं पीक आलेलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करत सत्य गोष्टी या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणतात, करोना आणि त्यामुळे झालेल्या अफवांच्या बुजबुजाटाचा एक फायदा झाला. अनेकांनी थेट विश्वास ठेवण्याऐवजी या पोस्टची विश्वासार्हता तपासून पाहिली. वाईटातही चांगलं पहावं हे लोक आता शिकले आहेत. असं डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं. सदर संदेश व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या फॅक्ट चे टीमने देखील हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक जारी केलं. त्यात असं म्हटलं आहे की, मुलींनी तसंच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे मेसेज फिरत आहेत. ते मेसेजफेक आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

काय आहे सत्य?

डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि केंद्र सरकारच्या अधिकृत प्रसार माध्यमं विभागाने दिलेल्या माहितीनुसार महिलांनी मासिक काळात लस घेण्यात कोणतीही अडचण नाही. तसंच ती व्हायरल झालेली पोस्ट खोटी असल्याचा निष्कर्ष मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने काढला आहे.

Tags:    

Similar News