अरुणाचल प्रदेशात काही चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय सैनिकांनी काही चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात, भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना पकडून ठेवल्याचं दिसत आहे.
या फोटोसोबत असा दावा केला जात आहे की, भारतीय सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात १५० हून अधिक चीनी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे.
भाजपचे गाझियाबादचे सोशल मीडिया संयोजक आनंद कालरा यांनीही हा फोटो याच दाव्यासह ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्विटला आत्तापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं आहे.
यासोबतच, ट्वीटर यूजर 'हम लोग वी द पीपल' ने ही याच दाव्यासह हा फोटो ट्वीट केला आहे.
राहुल गांधी या कोई वामपंथी कभी इस पर ट्वीट नहीं करेंगे कि भारतीय सेना ने अरुणाचल में डेढ़ सौ से ज्यादा चीनी सैनिकों को बंदी बना लिया फिर जब चीन के सेना के कमांडर और भारतीय कमांडर के बीच में मीटिंग हुई उसके बाद ही नहीं छोड़ा गया। pic.twitter.com/9TTW3DPAX1
— हम लोग We The People (@humlogindia) October 9, 2021
ट्विटर सोबतच फेसबूकवरही हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
काय आहे सत्य... ?
रिव्हर्स इमेज मध्ये हा फोटो सर्च केला असता, आम्हाला डिसेंबर २०२० च्या रिपोर्टमध्ये काही फोटो सापडले. दरम्यान, या रिपोर्टमध्ये, फोटो शेअर करत असं सांगण्यात आलं होतं की, "गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमधील वादावर चित्रपट बनवला जात आहे. आणि याच चित्रपटाच्या शूटिंगचे हे फोटो आहेत." दरम्यान, १५ जून २०२० ला गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते.
यासोबतच, ३ डिसेंबर २०२० चा एक YouTube व्हिडिओ देखील सापडला. या व्हिडिओमध्ये, ५ मिनिट ४८ सेकंदानंतर व्हायरल होणाऱ्या फोटोतील दृश्य आपण पाहू शकतो.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार, 'एलएसी' नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगचा हा व्हिडिओ आहे. हा चित्रपट लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमधील हिंसक चकमकीविषयी आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या कोरिओग्राफीच श्रेय इन्स्टाग्राम यूजर, 'ig_tonyjaa' ला देण्यात आलं आहे. टोनी जा यांनी फेसबुकवर देखील या फोटोचं वास्तव सांगितलेलं आहे.
Daily Excelsior ने ३० नोव्हेंबर २०२० रोजी एलएसीच्या शूटिंगमधील दृश्ये दाखवली होती. दरम्यान, या चित्रपटाबद्दल बातम्यांवर सुद्धा चांगलीच चर्चा झाली होती, कारण गेल्या वर्षी त्यात काम करणारा अभिनेता राहुल रॉयला शूटिंग दरम्यान ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्याला कारगिलहून मुंबईला विमानाने नेण्यात आलं होतं.
निष्कर्ष:
एकूणच, भारतीय सैनिकांद्वारे, चिनी सैनिकांना पकडण्यात आल्याचा दावा खोटा असून, यासंदर्भात गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या एका चित्रपटाची दृश्य शेअर केली जात आहेत.
या संदर्भात alt news ने fact check केलं आहे. https://www.altnews.in/fack-check-old-film-shooting-photo-shared-as-indian-army-capturing-pla-souldiers/