Fact Check : चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पंकजा मुंडेंचा अपमान?
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना वारंवार डावललं जात असल्याची चर्चा होत असते. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना भाषण करू न दिल्याचा दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांचा अवमान केला असल्याचे म्हटले आहे. पण खरंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांचा अवमान केला आहे का? जाणून घेण्यासाठी पहा भरत मोहळकर यांचे फॅक्ट चेक......;
भाजपमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना वारंवार डावललं जात असल्याची चर्चा माध्यमातून होत असते. त्यातच सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर बीड जिल्ह्यातील गेवराई येथे जाहीर सभेत पंकजा मुंडे यांचे नाव भाषणासाठी घेतले असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी माईकचा ताबा घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनी मी आधी बोलते असं म्हटलं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे नाही नाही असं म्हटलं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, फक्त दोन मिनिटं बोलते. त्यावर पुन्हा बावनकुळे नाही असं म्हणाले. यानंतर पंकजा मुंडे जागेवर जाऊन बसल्याचा व्हिडीओ BNM News मराठी या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, भाषणासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांना खाली बसवलं. (Chandrashekhar Bawankule insulted pankaja Munde)
BNM News मराठीने पोस्ट केलेला व्हिडीओ प्रशांत परबत या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्यांच्या वडिलांमुळे 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप सत्तेत आली व प्रचलित झाली. त्यांच्या वंशजांना तुम्ही असं डावलू शकत नाहीत.
अपर्णा पवार भोईर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, ताई राष्ट्रीय सचिव आहेत भाजपा च्या पण तरीही त्यांना 2 मिनिटेही बोलू दिले जात नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे निर्णय घ्या. जरी मी राष्ट्रवादी समर्थक आणि सर्वसाधारण कार्यकर्ती असले तरी एक महिला म्हणून हे जास्त खटकलं, असं मत व्यक्त केले.
महाराष्ट्र ब्रेकिंग (@Bre4Maharashtra) या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांना भरसभेत खाली बसवून आधी स्वतः भाषण केलं. ज्या स्व.गोपीनाथजी मुंडे यांनी राज्यात पक्ष वाढवला,आज त्यांच्याच मुलीची पक्षात होत असलेली हेळसांड अख्खा महाराष्ट्र बघतोय...
शुभम जटाल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, आदरणीय पंकजा ताई मुंडे यांनी खरच निर्णय घेतला पाहिजे आता अश्या प्रकारचा अपमान सहन करु नये त्यांनी 😐 स्वर्गीय साहेब असताना ह्यातील एकाची आवकात नव्हती मान वर करायची आज पंख फुटल्या सारख फड फड करत आहेत 😡
प्रतिक पाटील यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, गोपिनाथ मुंडेमुळे २०१४ साली भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली हे सत्य हे कुणी नाकारू शकत नाही.
मात्र परिस्थिती अशी आली आहे की पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर साधे बोलू दिले जात नाही आणि ताई मी भाजपमध्येच असल्याचे गर्वाने सांगतात.
सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांचा अवमान झाल्याचा दावा व्हायरल होत असल्याने अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
What is Fact
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा अवमान होत असल्याच्या दाव्याबाबत माध्यमांशी खुलासा केला. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, काही लोक जाणीवपुर्वक पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये घडवून आणतात आणि पंकजा मुंडे यांना Controversy मध्ये आणलं जातं. मी काल कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी शेवटी बोलायला पाहिजे. पण पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्या आधी बोलायला उभा राहिलो. मात्र पंकजा मुंडे म्हणाल्या मी आधी बोलते. त्यामागे त्यांची हीच भावना होती की, मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे मी शेवटी बोलावं. पण मी त्यांना सन्मानाने सांगितलं की, नाही तुम्ही शेवटी बोला. कारण त्या आमच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत. मात्र व्हिडीओ एडीट करून माध्यमांमध्ये चुकीच्या दाव्यासह हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.
निष्कर्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांचा अवमान केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र आमच्यातील संभाषणाचा चुकीचा अर्थ लावून आणि एडीट करून हा व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.