Fact Check: पतंजलीचे आचार्य बालकृष्ण AIMS मध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ खरा आहे का?
पतंजलीचे ब्रॅन्ड अम्बेसिडर बाबा रामदेव हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा, वादाचा विषय बनले आहेत. रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' असं म्हणत आहेत. बाबांच्या या वक्तव्यावर देशभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या विरोधात आक्रमक भूमिका सुद्धा घेतली आहे.
मात्र, आता पतंजलीचे सीईओ बालकृष्ण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये बाळकृष्ण हॉस्पिटलच्या बेडवर असल्याचं दिसत. या व्हिडिओच्या शेवटला रामदेव बाबाही दिसत आहेत. Sonu Jangra INC नावाच्या एका ट्विटर युजरने ही व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये ते लिहितात...
पतंजलीच्या बालकृष्ण यांची तब्येत बिघडली. #बाबा_रामदेव त्यांना थेट रुग्णालयात घेऊन गेले, पतंजलीचे कोणतेही (औषध) त्यांना दिले नाही. तर तेच रामदेव बाबा सांगत होते की हवेमधून ऑक्सिजन घ्या आणि आज सहकाऱ्याला ऑक्सिजन लावलं आहे. कालपर्यंत रामदेव डॉक्टरांबद्दल काहीही बोलत होते, आज त्याचं डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथीला स्टुपिड म्हटल्यानंतर IMA कडून त्यांच्या या विधानाला जोरदार विरोध झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देखील बाबांना पत्र लिहत विधान मागे घेण्यासाठी सांगितलं. मात्र, बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथी आणि फार्मा इंडस्ट्री यांना २५ प्रश्न विचारले. यातील बरेचसे प्रश्न हे जीवनशैलीजन्य रोगांवर कायमस्वरूपी किंवा रोग पूर्ण बरे करणारे उपाय आहेत का? अशा धर्तीवर आहेत.
बाबांच्या या वक्तव्यानंतर IMA ने आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्रानुसार...
रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण हे स्वतः आजारी पडले की अॅलोपॅथीची औषधं घेतात, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या मान्यता प्राप्त नसलेल्या औषधींचा खप वाढेल म्हणून ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही वक्तव्य करत आहेत. रामदेव बाबा यांचा पतंजली आयुर्वेदिक औषधींच्या व्यवसाय आहे. त्याची कोट्यावधीची उलाढाल आहे. त्यामुळे एकप्रकारे ते अॅलोपॅथीला बदनाम करून, त्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण करून स्वतःच्या व्यवसायासाठी संधी साधत आहे. असं IMA ने पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान हा वाद सुरु असतांना आचार्य बाळकृष्ण यांचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. ट्विटर तसेच फेसबुकवरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
काय आहे व्हिडीओचं सत्य
या व्हिडीओमधील फोटो पाहिल्यानंतर एक बाब लक्षात येते. हा व्हिडिओ खरा आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या डॉक्टरांसह कोणीही मास्क लावलेला नाही. त्यामुळे कोरोना गाइडलाइन्सनुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. सध्या आपण कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहोत. त्यामुळे रुग्णालयातील कोणीही मास्क न घातल्याने हा व्हिडिओ आत्ताचा नसल्याची शक्यता निर्माण होते.
पुढे, कीवर्ड सर्च केल्याने 'वन इंडिया हिंदी' फेसबूक अकाउंट वर एक पोस्ट सापडली. ज्यामध्ये हा व्हिडिओ शेअर केला गेला होता. या पोस्टनुसार 'अॅलोपॅथीवर निवेदन दिल्यानंतर आचार्य बाळकृष्ण यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. बाळकृष्ण यांची तब्येत बिघडली असताना त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्या नंतरचा हा व्हिडिओ समोर आला आहे.
कीवर्ड सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ २०१९ चा असल्याचं समोर आलं आहे. ट्विटरवर सुद्धा हा व्हिडिओ तेव्हा शेअर केला गेला होता.
23 ऑगस्ट 2019 च्या कनक न्यूजच्या रिपोर्टनुसार -
बाबा रामदेव यांनी बालकृष्ण यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. जन्माष्टमीनिमित्त कोणीतरी प्रसाद आणला होता, आणि तो खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटातच बालकृष्ण यांची प्रकृती बिघडली होती. ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना भुमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात सुधारली होती.
दैनिक जागरणने सुद्धा बालकृष्ण यांची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती.
निष्कर्ष:
एकंदरीत, बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यात सुरू असलेल्या वादा दरम्यान बाळकृष्ण यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ खरा जरी असला तरी तो जुना आहे. सध्याच्या रामदेव बाबा यांच्या वक्तव्यामुळं तो व्हायरल होत आहे.