ठाण्यात 16 ठिकाणी लॉकडाऊन, मुंबईत काय आहे स्थिती?
ठाण्यात 16 ठिकाणी लॉकडाऊन, मुंबईतील वाढत्या रुग्ण संख्येवर पालकमंत्री अस्लम शेख यांचा सूचक इशारा...;
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेल्या भागात लॉकडाऊन लावण्यात येत आहे.
अमरावती, नाशिक, औरंगाबाद, पुणे, ठाणे या जिल्ह्यात आणि मुंबईतील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन लावले जात आहे. तर काही भागांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा विचार प्रशासन करत आहे.
ठाणे जिल्ह्यात 16 हॉटस्पॉट...
ठाणे जिल्ह्यातील 16 ठिकाणी कोरोना रुग्णाचे प्रमाण अधिक आढळून आल्यानं या सर्व ठिकाणी लॉकडाऊन लावल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. हा लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत असणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसात दररोज 7 ते 8 हजार रुग्ण आढळले असून राज्याचा मृत्यू दर 2.36 टक्क्यावर पोहोचला आहे.
मुंबईत काय?
मुंबईत गेल्या काही दिवसात सरासरी 1 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहे. गेल्या काही आठवड्यात दररोज सरासरी 500 कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र, सध्या कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशतः लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.