कल्याण खाडीतील प्रदुषणाला जबाबदार कोण? सामाजिक संस्थांचा स्वच्छतेसाठी पुढाकार
कल्याण खाडीमध्ये उद्योगांचे रसायन मिश्रित पाणी व घनकचरा फेकण्यात येत असल्याने खाडीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कल्याणच्या खाडीमधील जलप्रदूषण आता मत्सव्यवसायाच्या मुळावर उठले आहे. कल्याण खाडीमधील पाणी प्रदूषित होत असल्याने, शेकडो माशांचा दररोज मृत्यू होतोय. कल्याणच्या खाडीत मासेमारी करत खाडी लगत राहणारे कोळी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. मात्र खाडीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने खाडीमधील माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने कोळी बांधवांच्या व्यवसायावरदेखील गदा आली आहे.
तरीही याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी नदीत टाकलेले निर्माल्य,लाकडे,बांबू व इतर कचऱ्यामुळेसुद्धा नदीपात्र भयंकर दुषित होते आहे. यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याणमध्ये नदी बचाव समिती,छावा संघटना,पिवळं वादळ सामाजिक संघटना आणि पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्यावतीने स्वच्छ खाडी अभियानाला'सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत खाडी पात्रावर टाकण्यात आलेल्या कचरा निर्माल्य व अनेक वस्तू उचलून या सफाईची सुरुवात केली आहे. तसेच कचरा टाकू नये असे आवानही केले आहे.